अग्रलेख : धुमसते निखारे

गेली सुमारे सात दशकांहून अधिक काळ धुमसत असलेल्या इस्राईल-पॅलेस्टाइन संघर्षाला मिळालेल्या अल्पविरामाने बऱ्यापैकी शांततेचे वातावरण निर्माण होईल, असे काही महिन्यांपासून वाटू लागले होते.
Israel Attack on Gaza Patti
Israel Attack on Gaza PattiSakal

देशांतर्गत अस्थैर्य आणि समस्यांनी वेढलेल्या इस्राईलने गाझा पट्टी भागात जोरदार हल्ले चढविल्याने संघर्षाची तीव्रता वाढली आहे. हमास आणि इस्राईल यांच्यातील या धुमश्चक्रीला वेळीच आवर घातला नाही, तर पश्चिम आशिया क्षेत्राला त्याची झळ बसू शकेल.

गेली सुमारे सात दशकांहून अधिक काळ धुमसत असलेल्या इस्राईल-पॅलेस्टाइन संघर्षाला मिळालेल्या अल्पविरामाने बऱ्यापैकी शांततेचे वातावरण निर्माण होईल, असे काही महिन्यांपासून वाटू लागले होते. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीदेखील पुढाकार घेऊन त्या दिशेने पावले टाकली होती. काही अरब देशांनी इस्राईलशी संबंध प्रस्थापित करण्याच्या दिशेने राजनैतिक पातळीवर हालचालीही केल्या; पण या सगळ्या वातावरणाला तडा जाईल, अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे. रमजानचा पवित्र महिना सुरू असताना जेरुसलेममधल्या प्रसिद्ध अल-अक्‍सा मशिदीमध्ये इफ्तार पार्ट्या, प्रार्थना यांची लगबग असतानाच पुन्हा एकदा पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास आणि इस्राईल यांच्यातील संघर्षाचा उद्रेक झाला आहे. काही दिवसांपूर्वी येथे चेंगराचेंगरीही झाली होती. हमासने इस्राईलवर शेकडो रॉकेट डागली, तर त्याला इस्राईलनेही तितकेच जोरदार आणि तिखट प्रत्युत्तर गाझा, पश्‍चिम किनारपट्टी भागात दिले. परिणामी, पन्नासवर लोकांचा मृत्यू झाला, यात मुले आणि महिला यांची संख्या अधिक आहे. या घटनेने सुप्त निखारे चेतवले गेले असून, दोन्हीही बाजूंनी ठोशास ठोशाची भाषा होत आहे. कतार, इजिप्त, अमेरिका, भारत यांच्यासह जगातील प्रमुख देशांनी, तसेच संयुक्त राष्ट्रसंघाने दोन्हीही बाजूंना संयम आणि शांततेचे आणि समोपचाराने तोडग्यासाठी प्रयत्नांवर भर देण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला किती प्रतिसाद मिळतो, यावर पश्चिम आशियातील या संघर्षाची व्याप्ती आणि परिणाम अवलंबून असतील.

मुळात इस्राईलच्या निर्मितीपासून आणि पॅलेस्टिनी अरबांच्या विस्थापनापासून या भागात अस्वस्थता आहे. पॅलेस्टिनी नेते यासर अराफत यांच्या काळात आंतरराष्ट्रीय स्तरावरून तोडग्याचे प्रयत्न झाले, ते किती यशस्वी झाले, त्याने संघर्षरत पॅलेस्टिनींच्या पदरात काय पडले आणि इस्राईलमध्ये शाश्वत शांतता आली का, या प्रश्नांची उत्तरे संमिश्र आहेत. तथापि, १९४७-४८चा संघर्ष, १९६७चे युद्ध आणि अगदी अलीकडे २०१४मध्ये सात आठवडे चाललेला संघर्ष आणि मधूनअधून होणारी धुसफुस वगळता काहीसे बरे चालले होते. इस्राईलमध्येही स्थैर्य नांदत होते; पण गेली चार-पाच वर्षे इस्राईलमध्येच सगळे आलबेल आहे, अशी स्थिती नाही. इस्राईलचे काळजीवाहू पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचे आघाडी सरकारचे कडबोळे सातत्याने वादांच्या भोवऱ्यात सापडत आहे. भ्रष्टाचारासह विविध प्रकरणांत सरकारवर आरोप होत आहेत. नेतान्याहूंची लोकप्रियता हेलकावे खात आहे. गेल्या दोन वर्षांत चारवेळा सार्वत्रिक निवडणुका होऊनही त्यांच्या पक्षाला एकहाती सत्ता मिळालेली नाही. काही महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीनंतर २८ दिवसांच्या मुदतीत आघाडी सरकार स्थापण्यातही त्यांना यश आलेले नाही.

अध्यक्ष रूवेन रिलीन यांनी फ्युचर पक्षाचे येर लिपीद यांना सरकार स्थापण्यासाठी प्रयत्नांकरता संधी दिलेली आहे. त्यासाठी अरब पक्षांसह अन्य गटांशी चर्चा सुरू असतानाच संघर्षाची पडलेली ठिणगी इस्राईलअंतर्गत राजकारण आणि आंतरराष्ट्रीय प्रश्न यांची सांगड घालते की काय, हेही पाहावे लागेल. इस्राईलच्या पंतप्रधानपदी सर्वाधिक काळ, १५ वर्षे राहिलेले नेतान्याहू विरोधाची धार वाढत असल्याने बेजार आहेत. पंतप्रधानपदाची निवडणूक थेट घ्यावी, यासाठी त्यांचे वैधानिक प्रयत्न सुरू आहेत. ‘मजबूत इस्राईल’साठी कोणत्याही टोकाला जाण्याची त्यांची तयारी पाहता ते देशावर नागरी युद्ध लादतात की काय, अशी भीती व्यक्त होते. एखाद्या राज्यकर्त्याला अंतर्गत आघाडीवर अपयश येऊ लागले, की शत्रूशी चार हात करण्याच्या आणि कट्टर राष्ट्रवादाच्या भावनेला फुंकर घालण्याचा खटाटोप सुरू होतो. इस्राईलचा आर्थिक गाडा सरकारच्या स्थैर्याअभावी रडतखडत सुरू आहे. कोरोनाचे आव्हान तिथेही आहे. स्थिर सरकार जनता देऊ शकलेली नाही आणि विविध पक्षांच्या नेत्यांमध्ये वाटाघाटीच्या फेऱ्यांवर फेऱ्या होऊनही तोडगा दृष्टिपथात नाही. नेतान्याहूंची खुर्ची धोक्‍यात आहे. त्यामुळे पॅलेस्टिनींच्या विरोधातील आक्रमक पवित्र्याचे आश्चर्य वाटायला नको.

१९६७ मध्ये इस्राईलने जेरुसलेमवर मिळवलेल्या ताब्याच्या विजयोत्सवाचा ‘जेरुसलेम दिवस’ साजरा होत असतानाच ‘पूर्व जेरुसलेम आमचे’ असे सांगणाऱ्या पॅलेस्टिनी आणि इस्राईल यांच्यात युद्धजन्य स्थिती निर्माण झाली आहे. ‘हमास’ने इस्राईलच्या कोणत्याही कृतीला तोडीस तोड प्रत्युत्तराची तयारी सामरिक, राजनैतिक आणि मानसिकदृष्ट्या केल्याचे त्यांच्या भूमिकांवरून आणि कृतीतून दिसते आहे. जेरुसलेमजवळील ७७ हजार लोकसंख्येच्या लोड या शहरात इस्रायली ज्यू आणि त्यांच्या निम्म्याने असलेल्या इस्रायली अरब यांच्यात संघर्षानंतर मोठा हिंसाचार उसळला आहे. शहरावर नियंत्रण राहिले नाही, असे तेथील महापौर सांगतात. हा संघर्ष चिघळणे कोणाच्याच हिताचे नाही, याचे कारण तो केवळ या भागापुरता मर्यादित राहार नाही. साऱ्या पश्‍चिम आशिया क्षेत्राला वेढून टाकेल. इराणने लगेचच इस्राईलच्या ‘घुसखोरी’चा निषेध नोंदवला असून त्यातूनही या धोक्याचीच जाणीव होते. जेरुसलेमवर ताबा कोणाचा इथपासून ते इस्राईलशेजारी पॅलेस्टाइन होणार की नाही, झाल्यास त्यांच्यात कायमची शांतता नांदणार काय, अशा प्रश्नांचे मोहोळ पुन्हा उठले आहे. तथापि, संघर्षाचे युद्धात रूपांतर होणार नाही, याकडे आता तातडीने लक्ष दिले पाहिजे. ‘हमास’लाही आपणच पॅलेस्टिनींचे एकमेव रक्षणकर्ते असे दाखवण्याची आणि पॅलेस्टाइनचे अध्यक्ष मोहम्मद अब्बास यांच्यावर कुरघोडी करण्याची घाई आहे. एकमेकांचे हिशेब चुकते करणे आणि स्वतःचे स्थान बळकट करणे, या प्रयत्नांत हा भाग पुन्हा धगधगता राहू शकतो. त्यामुळेच तेथे पुन्हा वेगाने शांतता येण्यासाठी उभय बाजू तसेच अमेरिकेसह अन्य देशांकडून आणि राष्ट्रसंघाकडून प्रयत्नांची शिकस्त गरजेची आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com