esakal | अग्रलेख : संशयकल्लोळ!
sakal

बोलून बातमी शोधा

Mahavikasaghadi

ज्या वेळी आव्हान उभे राहाते, त्याच वेळेस परस्पर विश्वासाची आणि एकजुटीच्या प्रयत्नांची कसोटी लागते. पण राज्यातील सत्ताधारी ‘महाविकास आघाडी’समोर तसे आव्हान उभे राहूनही परस्परविश्वासाचे वातावरण दिसत नाही.​

अग्रलेख : संशयकल्लोळ!

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

होळीच्या मुहूर्तावर या महाराष्ट्रदेशी कोरोना विषाणूची दुसरी लाट पहिल्यापेक्षाही अधिक आक्रमक चाल करून आलेली असतानाच, राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी मात्र आपापसातच कुरघोडीच्या राजकारणात दंग असल्याचे चित्र विषण्ण करणारे आहे. हे सरकार १६ महिन्यांपूर्वी स्थापन झाले, तेव्हाच खरे तर त्यातील विसंगती समोर आल्या होत्या. मात्र, त्यांवर मात करून या सरकारने पहिल्या काही महिन्यांत उत्तम कामगिरी बजावली होती आणि कोरोनाच्या पहिल्या लाटेस खंबीरपणे तोंड दिले होते. मात्र उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ या निवासस्थानाबाहेर जिलेटिनच्या कांड्या असलेली एक मोटार सापडल्यापासून चित्र बिनसू लागले. या सरकारच्या विश्वासार्हतेला तडे जाऊ लागले आहेत. या परिस्थितीचा फायदा विरोधकानी उठवला नसता तरच नवल. हे सरकार स्थापन झाल्यापासूनच त्यातील विसंगतींकडे भारतीय जनता पक्ष लक्ष वेधत होता. किंबहुना हे सरकार फार काळ टिकणार नाही, असाच धोशा या पक्षाचे नेते सातत्याने लावत होते. असे असताना महाविकास आघाडीतील संवाद उत्तम ठेवणे हाच त्याला उत्तर देण्याचा योग्य मार्ग होता. परंतु ते झाले नाही. आरोपांच्या फैरी विरोधक झाडत असताना महाविकास आघाडीतील घटकपक्ष आपापल्या दृष्टिकोनातून त्याकडे पाहत होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

एकूणच या सर्व घडामोडींमध्ये वेगवेगळ्या पातळ्यांवरील विसंवाद समोर आला. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात ज्या पातळीवरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या ती पातळीही काही दर्जा,सभ्यता राखणारी होती असे नाही. परंतु सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील संघर्षाचा भाग म्हणून त्याकडे पाहता येते. परंतु हा विसंवाद प्रशासन आणि सरकार यांच्यातही  दिसून आला. महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील लाथाळ्याही उफाळून आल्या. त्यामुळे राज्याच्या कायदा-सुव्यवस्थेच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा निसंदिग्ध निर्वाळा देऊन जनतेला आश्वस्त करण्यापेक्षा आरोपांची राळ आपल्यावर उडू नये, असा कातडीबचावू पवित्रा घेतला गेल्याचे जे चित्र निर्माण झाले आहे, ते सरकारच्या प्रतिमेच्या दृष्टीने चांगले नव्हते. `सध्याचे गृहमंत्री अपघातानेच या पदावर आले,` असा शेरा शिवसेनेच्या प्रवक्त्याने लेखातून मारणे आणि मग तेवढ्याच आवेशाने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी त्याला उत्तर देणे, यातून लोकांसमोर या सरकारविषयी नेमका कोणता संदेश जात आहे, याचाही या नेतेमंडळींनी विचार करायला हवा.       

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महाविकास आघाडी’च्या या सरकारने राज्याची सूत्रे हाती घेतली तेव्हा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात पक्की मैत्री झाली आहे आणि काँग्रेस या सरकारात दुय्यम भूमिका पार पाडत असल्याचे चित्र उभे राहिले होते. मात्र, अलीकडच्या काळातील काही घटनांमुळे आधी बसलेल्या घडीला धक्के बसू लागले. समझोत्यानुसार कॉंग्रेसकडे विधानसभा अध्यक्षपद आहे. त्याचा राजीनामा देण्यापूर्वी घटकपक्षांना विश्वासात घेणे, आवश्यक होते. तसे घेतले गेले नाही. गंभीर आरोप असलेल्या शिवसेनेच्या मंत्र्याला पायउतार व्हावे लागल्यापासून शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात धुसफूस सुरु झाली. माजी पोलीस आयुक्तांनी केलेल्या गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी राज्याचे गृहमंत्री अपघातानेच या पदावर आल्याची शेरेबाजी करणे म्हणजे त्या अंतर्गत वादांचा कडेलोट म्हणायला हवा. यातून नुकसान होईल ते या सरकारचेच, एवढेही भान वाचाळ नेत्यांना राहिलेले नाही.

खरे तर या सरकारने माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या १०० कोटींच्या आरोपानंतर, त्याबाबत दूध का दूध... पानी का पानी... अशी भूमिका घ्यायला हवी होती. त्या अनुषंगाने आदेश द्यायला हवे होते. त्यामुळे या सरकारवर आलेले संशयाचे मळभ दूर होण्यास मदतच झाली असती. एकंदरीत परमबीर सिंग यांनी केलेला हा गंभीर आरोप, त्यानंतर उभे राहिलेले फोन टॅपिंगचे प्रकरण, तसेच भाजप नेते रोजच्या रोज करत असलेले घणाघाती आरोप, यांमुळे या सरकारच्या विश्वासार्हतेवर मोठाच ओरखडा उमटला आहे. संशयाच्या या भोवऱ्यातून बाहेर येण्याऐवजी प्रत्यक्षात सत्ताधारी आघाडीत एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न सुरू झाल्याचे दिसू लागले आहे. या नाट्यात भर पडली,  ती शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कथित भेटीच्या वृत्तामुळे. राज्यातील राजकीय स्थिरतेविषयी संशयकल्लोळ वाढवण्याच्या प्रयत्नांना मग आणखीनच ऊत आला. मात्र, जनतेला या राजकीय साठमारीत बिलकूलच रस नाही. लोकांभोवती कोरोना विषाणू भिरभिरत असताना, चाललेल्या या पोरखेळापेक्षा त्यांना सरकार या स्थितीला तोंड देण्यासाठी नेमके काय उपाय योजणार, या प्रश्नाचे ठोस उत्तर हवे आहे. त्याऐवजी महाराष्ट्रदेशी सुरू आहे ते ‘लॉकडाउन’ची भीती दाखवण्याचे कातडीबचावू राजकारण. त्यामुळे या सरकारविषयी लोकांच्या मनात संताप निर्माण होऊ शकतो, एवढेही या आघाडीचे  तथाकथित नेते समजून घ्यायला तयार नाहीत, असे दिसते. सरकारला हे सगळे मुळीच शोभणारे नाही.

Edited By - Prashant Patil