अग्रलेख : झुंज एका वादळाशी...

‘तौक्ते’ चक्रीवादळाने आक्रमण करुनही मोठी जीवितहानी टाळण्यात आपण यशस्वी ठरलो, ही उल्लेखनीय बाब आहे.
Keral
KeralSakal

‘तौक्ते’ चक्रीवादळाने आक्रमण करुनही मोठी जीवितहानी टाळण्यात आपण यशस्वी ठरलो, ही उल्लेखनीय बाब आहे. प्रशासन आणि एनडीआरएफ तसेच यंत्रणेतील अन्य घटकांनी समन्वय साधत केलेल्या कामामुळे हे साध्य झाले. तथापि, आंबा उत्पादक व अन्य शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, पडललेली घरे आणि सार्वजनिक मालमत्तांचे झालेले नुकसान यांचे पंचनामे करणे आणि त्यानंतर डागडुजी, दुरुस्ती या कामांना गती दिली पाहिजे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने ग्रासलेले असताना, त्यापेक्षाही अधिक वेगाने केरळपासून गुजरातपर्यंतच्या पश्‍चिम किनारपट्टीवर चाल करून आलेल्या ‘तौक्ते’ चक्रीवादळाशी झुंजण्यात आपण यशस्वी झालो आहोत, असे आता हे वादळ विरल्यानंतरच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर म्हणता येते. या झुंजीची सर्वात सुखद परिणती म्हणजे आपण मोठ्या प्रमाणावर जीवितहानी टाळू शकलो. गोवा-कोकण आणि दीव-दमण तसंच सौराष्ट्र या किनारपट्टीला या वादळाने तडाखा दिला. वादळाबरोबरच्या सोसाट्याच्या वाऱ्याने महाराष्ट्रात सहा जणांचा बळी घेतला, त्याआधी कर्नाटकातही आठ बळी घेतले होते. मात्र, आपल्या हवामानविषयक यंत्रणांना या वादळाचा अंदाज वेळीच आला होता आणि एवढेच नव्हे तर त्याचे स्वरूप नेमके किती रौद्र असू शकेल, याचीही पूर्वसूचना आपल्याला मिळाली होती. त्यामुळे आपण आपत्तीस समर्थपणे तोंड देऊ शकलो. गुजरातमध्येच आपल्या यंत्रणा दोन लाख लोकांचे सुरक्षित जागी स्थलांतर करू शकल्या. मोठ्या प्रमाणावर जीवितहानी टळू शकली, ती त्यामुळेच. ही जी काही झुंज आपण वादळाशी दिली, त्यात स्थानिक प्रशासनाबरोबरच नॅशनल डिझाझस्टर रिस्पॉन्स फोर्स (एनडीआरएफ) या केंद्रीय यंत्रणेचा वाटा मोलाचा आहे. लष्कर आणि विशेषत: नौदलाने मदत तसेच बचाव कार्यात बजावलेली कामगिरीही उल्लेखनीय आहे. पण आता प्रशासनासमोर आव्हान आहे, ते झालेल्या नुकसानीला तोड देण्याचे. या संपूर्ण परिसरातील पिके आणि कोकण किनारपट्टीवरील आंबे-काजू तसेच नारळी-पोफळींचे झालेले नुकसान मोठे आहे. आंब्याचा हंगामच हातचा गेला आहे. कोरोनाच्या सावटातच गेल्यावर्षी कोकणात `निसर्ग’ वादळाच्या थैमानाने लोकांची ससेहोलपट केली होती. मात्र, तेव्हा आपद्‌ग्रस्तांपर्यंत मदत पोचण्यात झालेल्या विलंबाने आरोप-प्रत्यारोपांचे धुमशान रंगले होते. त्यामुळे आता या नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे तातडीने होतील आणि मुख्य म्हणजे तेथे मदतही वेळेत पोहोचेल, याकडे सर्व राजकीय वितंडवाद बासनात बांधून उद्धव ठाकरे सरकारने प्राधान्याने लक्ष द्यायला हवे.

पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात उन्हाळी पिके, काही ठिकाणी बागा, भाजीपाला, ऊस यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतीच्या; तसेच घरे, आस्थापना यांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करून भरपाई शक्‍य तितक्‍या लवकर लाभार्थींना दिली पाहिजे. हानी झालेल्या सार्वजनिक मालमत्तांची डागडुजीही शक्‍य तितक्‍या लवकर करावी, कारण पावसाळा तोंडावर आहे. त्याने जोर पकडण्याआधी ही कामे झाली नाहीत,तर गैरसोयीत वाढ होऊ शकते.

खरे तर या वादळाचा जोर इतका होता, की सागर किनाऱ्यापासून शेकडो मैल दूरच्या पश्‍चिम तसेच उत्तर महाराष्ट्रातही त्यामुळे तुफानी वृष्टी आणि झाडे तसेच विजेचे खांब उन्मळून पडले. अरबी समुद्राच्या तटीच उभ्या असलेल्या राज्याच्या राजधानीत मग या ‘‘तौक्ते’ची शेपूट जोमाने वळवळणे, हे अपरिहार्यच होते. मात्र, त्याचा अंदाज घेऊनच सर्व यंत्रणा वेळेतच सजग झाल्या होत्या. मुंबापुरीबरोबरच ठाणे, नवी मुंबई या साऱ्या परिसराबरोबरच रायगडलाही हा तडाखा बसला. या परिसरातील सहा लाखांहून अधिक घरे आणि मुख्य म्हणजे कोरोना उपचारासाठी निश्‍चित केलेली ४० इस्पितळे यांचा वीज पुरवठा खंडित झाला; तर राज्यभरात वीज खंडित होण्याचा फटका जवळपास २४ लाख लोकांना बसला. मुंबईत कोरोनाबाधितांसाठी दहिसर, मुलुंड आणि मुख्य म्हणजे वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्‍स येथे मोठी फिल्ड हॉस्पिटल्स मैदानात उभारण्यात आली होती. मात्र, वेळीच मिळालेल्या इशाऱ्यामुळे तेथील रुग्णांना अन्यत्र सुरक्षित जागी हलवले होते आणि आता ही इस्पितळे पुन्हा सुरू करताना अधिक अद्ययावत करण्यासंबंधात घेतलेला निर्णय तर मोठाच दिलासा देणारा आहे. आपत्तीचे स्वरूप लक्षात घेता मुंबईबरोबरच कोकण आणि राज्याच्या अन्य भागांत झालेल्या नुकसानग्रस्तांना तातडीने मदतीचा हात देण्याकडे सरकारने प्राधान्य द्यायला हवे. शिवाय, विरोधकांनीही नुकसानग्रस्तांच्या आणि मुख्य म्हणजे कोकणवासीयांच्या पाठीवर हात ठेवून त्यांना धीर देण्याचे काम करायला हवे.

अवघ्या काही वर्षांपूर्वीपर्यंत अशी वादळे ही प्रामुख्याने देशाच्या पूर्व किनारपट्टीवर येऊन धडकत असत. मात्र, अलीकडे या वादळांनी आपली दिशा का बदलली, याचाही या निमित्ताने अभ्यास व्हायला हवा. तूर्तास तरी ओडिशातील वादळाप्रमाणेच या ‘‘तौक्ते’ला समर्थपणे तोंड देणाऱ्या एनडीआरएफ आणि अन्य लष्कर, नौदल आदी संबंधित यंत्रणांना, त्यांनी पावसा-पाण्याची तमा न बाळगता बजावलेल्या कामगिरीबद्दल धन्यवाद द्यायला हवेत. आता पुढची जबाबदारी ही मुलकी यंत्रणांची आणि मुख्यत्वे राज्याच्या महसूल खात्याचीच आहे. पंचनामे करण्यापासून ते मदत पुरवण्यापर्यंतची जबाबदारी ही याच खात्यावर असते. या वादळवाऱ्यात आपल्या सर्व यंत्रणा सक्षमपणे काम करू शकतात, याची साक्ष मिळाली आहे. आपली शासन व्यवस्था फक्त संकटकाळातच झडझडून काम करते, अशी प्रतिमा व्हायची नसेल तर या पुढच्या बाबींची कार्यवाही तातडीने व्हायला हवी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com