esakal | अग्रलेख : टेनिस कोर्टावरील फ्रेंच क्रांती!
sakal

बोलून बातमी शोधा

Novak Djokovic

अग्रलेख : टेनिस कोर्टावरील फ्रेंच क्रांती!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

टेनिस हा खेळच असा की, तेथे बौद्धिक क्षमतेबरोबरच शारीरिक बळही क्षणाक्षणाला पणाला लागलेले असते. त्याचा थरार पाहणे हा विलक्षण अनुभव असतो. यंदा टेनिसविश्वातील एका पिढीचे स्थित्यंतरच अधोरेखित झाले.

नोवाक जोकोविचने रविवारी झालेल्या सुप्रतिष्ठित फ्रेंच ओपन टेनिसची अंतिम स्पर्धा अत्यंत चुरशीच्या लढतीनंतर जिंकत अनेक विक्रमांवर आपले नाव कोरले! तेव्हा ३४ वर्षांच्या नोवाकला तो विजयाचा चषक जुन्या पिढीतील ६५ वर्षीय ख्यातकीर्त टेनिसपटू ब्युऑन बोर्ग याच्या हस्ते स्वीकारताना झालेला आनंद त्याच्या चेहऱ्यावर फुलून आला होता, तर शनिवारी महिलांची अंतिम स्पर्धा जिंकणारी २५ वर्षांची बार्बोरा क्रेजिकोव्हाने चषक स्वीकारला तो मार्टिना नवरातिलोवा या साठी उलटलेल्या विक्रमवीर टेनिसपटूच्या हस्ते. ‘फ्रेंच ओपन’च्या आयोजकांनी आणलेल्या या पाहुण्यांमुळे यंदा टेनिसविश्वातील एका पिढीचे स्थित्यंतरच अधोरेखित केले आहे. भले जोकोविच आता ३४ वर्षांचा असो, तो काय आणि ३५ वर्षांचा राफेल नदाल असो... की याच स्पर्धेतून प्रकृतीच्या कारणास्तव माघार घेणारा ३९ वर्षांचा रॉजर फेडरर असो... हे झुंजार खेळाडू आता हळूहळू टेनिस कोर्टावरून बाहेर पडून यापुढे आपल्याला प्रेक्षकांमध्येच बसलेले बघायला मिळणार, याचीच साक्ष यंदा बघायला मिळाली. जोकोविचला अवघ्या २२ वर्षांच्या स्टेफानिस स्तित्सिपासने ज्या पद्धतीने चार तास झुंज दिली, ती बघितल्यावर आता टेनिसविश्वात, कोर्ट मातीचे असो की गवताचे... त्यावर नवी पिढी उदयास येणार, हेच त्याच्या प्रत्येक झंझावाती फटक्यातून दिसून येत होते. अर्थात, क्षेत्र कोणतेही असो; स्थित्यंतर हा सृष्टीचा नियमच आहे.

एखादाच सचिन तेंडुलकर हा जवळपास अडीच दशके खेळत राहू शकतो आणि त्याच नियमानुसार जोकोविच-फेडरर आणि नदाल हेही गेली अनेक वर्षे सातत्याने विविध स्पर्धा जिंकत आले आहेत. मात्र, टेनिस हा खेळच असा की, तेथे तुमच्या बौद्धिक क्षमतेबरोबरच शारीरिक बळही क्षणाक्षणाला पणाला लागलेले असते. त्यामुळे साहजिकच टेनिस कोर्टावरील आयुष्य हे क्रिकेटसारख्या खेळापेक्षा हे कमी असणार, हेही उघडच आहे. त्यामुळेच जोकोविच, फेडरर, नदाल या तीन अव्वल खेळाडूंना सलाम करतानाच उगवत्या पिढीला दाद देणे, हेही तितकेच महत्त्वाचे आहे.

जोकोविचने ही स्पर्धा जिंकताना यंदा अनेक विक्रमांवर नाव कोरले आणि आता विंबल्डनची चाहूल लागत आहे, शिवाय ‘अमेरिकन ओपन’ स्पर्धाही बाकी आहे, हे लक्षात घेतले की तो आणखी काही विक्रम करण्याचीही शक्यता त्याचा रविवारचा खेळ बघता दिसत आहे. यंदाची ही स्पर्धा आणखी एका गोष्टीमुळे लक्षात राहील आणि ती म्हणजे जोकोविच तसेच नदाल समोरासमोर आले तेच उपांत्य फेरीत!... आणि जोकोविचने पहिले दोन सेट्‍स गमावल्यानंतरही मन विचलित न होऊ देता नदालसारख्या खमक्या प्रतिस्पर्ध्याला धूळ चारली! खरे तर नदाल हा ‘क्ले कोर्ट’चा म्हणजेच ‘लाल मातीवरचा राजा’ म्हणूनच प्रसिद्ध आहे. तरीही जोकोविचने त्याला नमवले. फेडरर हा आधीच विंबल्डनवर आपल्याला लक्ष केंद्रित करावयाचे आहे, असे कारण देऊन या स्पर्धेत सामील होऊनही नंतर बाहेर पडला होता. त्यामुळे एका अर्थाने जोकोविचला अंतिम सामना सोपा ठरणार, अशीच भाकिते केली जात होती. प्रत्यक्षात अंतिम सामन्यात पहिले दोन सेट जिंकून आपला पहिलाच ‘ग्रॅण्ड स्लॅम’ सामना खेळणाऱ्या स्तित्सिपासने कमालीची उत्कंठा निर्माण केली होती. मात्र, नंतर त्याला विलक्षण अशा पाठदुखीने घेरले आणि अखेर अनुभव हीच विजयाची कळ आहे, हे जोकोविचने दाखवून दिले. तरीही अनेकांच्या मनातील भावना स्तित्सिपास या ग्रीक खेळाडूनेच हा सामना जिंकावा आणि ग्रीसला टेनिस विश्वात मानाचे स्थान प्राप्त करून द्यावे, अशीच होती.

महिलांच्या अंतिम स्पर्धेत तर क्रेजिकोव्हाने कमालच केली आणि तब्बल चार दशकांनंतर चेक प्रजासत्ताकात हा ‘फ्रेंच ओपन’चा चषक नेला. हा सामनाही चुरशीचाच झाला, कारण पहिला सेट अवघ्या सात गेममध्ये जिंकल्यानंतर तो एकतर्फी होणार, असेच वाटू लागले होते. मात्र, त्यानंतर रशियाच्या अनास्तासिया पावलोचेन्कोवियानेही दुसरा सेट ६-२ असाच एकतर्फी जिंकला होता. परंतु, पुरुषांच्या अंतिम सामन्यात स्तित्सिपासला पाठदुखीने घेरले होते, तर इथे अनास्तासियाच्या मांडीचा स्नायू दुखावला. यामुळे या झंझावाती खेळात तंदुरुस्तीचे महत्त्व किती मोलाचे असते, त्यावरच शिक्कामोर्तब झाले.

आता अर्थातच जगभरातील टेनिसप्रेमींचे लक्ष हे इंग्लंडमध्ये होऊ घातलेल्या विंबल्डनकडे लागलेले असणार!... आणि ‘फ्रेंच ओपन’मधील अपयशाचा बदला घेण्यासाठी फेडरर तसेच नदालही आता तेथे नव्या जोमाने उतरणार. त्याचवेळी ‘फ्रेंच ओपन’मध्ये उपांत्यपूर्व स्पर्धेतही न पोचू शकलेली सेरेना विल्यम्सही सुडाने पेटलेली असणार. त्यामुळे विंबल्डन स्पर्धा ही टेनिसप्रेमींसाठी एक मोठी मेजवानीच ठरणार, यात शंका नाही. मात्र, क्रेजिकोव्हा असो की अनास्तासिया... यांनी टेनिसचे कोर्ट; मग ते लाल मातीचे असो की हिरव्याकंच हिरवळीचे... तेथे नवी पिढी आता येऊ घातली आहे, हेच या ‘फ्रेंच ओपन’ स्पर्धेत दाखवून दिले आहे. अर्थात, हिरवळीवर होणाऱ्या विंबल्डनमध्ये सर्वांत मोठे आकर्षण असणार आहे तो ‘ग्रास कोर्ट’चा राजा म्हणून ख्यातकीर्त असलेला रॉजर फेडरर हाच! जोकोविच वा नदाल हे या ‘राजा’स जबरे उत्तर देतात की तेथेही नव्या पिढीचा आणखी कोणी प्रतिनिधी पुढे येतो, ते बघणे कमालीचे उत्कंठावर्धक ठरणार आहे.

loading image