अग्रलेख : पुन्हा होऊ दे भिर्रर्र…! editorial article writes bullock cart race supreme court result farmer happy | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bullock Cart Race

अग्रलेख : पुन्हा होऊ दे भिर्रर्र…!

शर्यतींचा मार्ग मोकळा झाला असला तरी त्याला ‘अटी-नियम’ लागू आहेत, हे न विसरता पुन्हा मैदाने गजबजावीत, ही अपेक्षा.

ज्याच्या घरात मल्ल आणि दारी खिलार जोडी नाही, तो शेतकरीच नाही, अशा आशयाचे एक जुने वचन आहे. निसर्गावलंबी शेतीधंद्यात बैल हा शेतकऱ्याचा जीवाभावाचा पार्टनरच असतो. हाडाचा शेतकरी एकवेळ अस्तुरीची अबाळ करेल, पण गोठ्यातल्या बैलाचे हवेनको बघितल्याशिवाय राहायचा नाही. सुखदु:खाच्या सर्व प्रसंगांमध्ये बैल शेतकऱ्याच्या संगेच चालत असतो, जगत असतो.

बैल हा काही मोलाने आणलेला मजूर नव्हे. तो निव्वळ ओझ्यासाठी, आणि शेतकामासाठी उपयुक्त प्राणी आहे, असेही नव्हे. शेतकऱ्याचा संसार टुकीने चालावा, यासाठी तो आप्तेष्टासारखा राबतो. म्हणूनच बेंदराला, पोळ्याला, दसऱ्याला किंवा अन्य सणासुदीला त्याचाही गोडाधोडाचा वाटा ठेवला जातो. एखादा शेतकरी आपल्या बैलांची नावेही लाडाकोडाची ठेवतो, ती काही उगाच नव्हे. पोराबाळाइतकंच तो त्याच्यावर प्रेम करतो, त्याला जीव लावतो.

त्याच्यावर गाणी रचतो. मोट हाकताना, किंवा नांगर चालवताना ती गाणी गळ्यावर चढवतो. प्राचीन काळापासूनच या गोवंशाला धन मानण्याची आपली परंपरा आहे. दारचा बैल हा शेतकऱ्याच्या भावविश्वाचा अविभाज्य घटक असतो.

शिवारातले राबणे तर दोघांच्याही नशिबालाच चिकटून असते, पण विरंगुळ्याच्या क्षणीही शेतकरी कधी आपल्या बैलाला विसरु शकत नाही. बैलगाडा शर्यत हा असाच शेतकऱ्याच्या आयुष्यातला हौसमोजेचा प्रसंग. थोडीथोडकी गंमत करावी, पैजेचा थरार अनुभवावा, त्याच्यासोबतच आपल्या बैलजोडीचा कस लावून पाहावा, थोडा पैका गमवावा, किंवा जमलेच तर गाठीला लावावा, एकंदरित आपल्या वाट्याला आलेले कास्तकाराचे आयुष्य घासूनपुसून तपासून पाहावे, हा बैलगाड्याच्या शर्यतींचा उपयोग होता व आहे.

कैक शतकांची ही बैलगाडा शर्यतीची परंपरा, गेल्या दशकभरात मात्र अनेक अडथळ्यांपुढे नेस्तनाबूत झाली. २०११ मध्ये काही प्राणीप्रेमींच्या आग्रहामुळे बैलाचा राजपत्रित प्रजातींमध्ये समावेश झाल्याने त्याला बैलगाड्याला जुंपणे अमानुष ठरले, आणि गावोगावच्या मैदानातल्या बैलगाडा शर्यती, शंकरपट, शेंबी गोंडा (बैल-घोडा शर्यत), छकडी शर्यत, अरत परत, सगळे काही ठप्प झाले. यानिमित्ताने होणारी ग्रामीण महाराष्ट्रातली महत्त्वाची आर्थिक उलाढाल थांबली. खातेफोडीनं शेतीचं क्षेत्र घटलं तसं बैलजोडी दारात उभी करणं आवाक्याबाहेर जायला लागलं.

ट्रॅक्टरच्या यांत्रिकीकरणानं अल्पभूधारकाकडे बैल असला तरी जोडी अपवादानं राहिली. पण बैलगाड्या शर्यतीची हौस असणाऱ्यानं बीएमडब्ल्यू, मर्सिडिजशीही स्पर्धा करणारी खिलारजोडी जपली. शर्यतीचं मैदान रंगत नव्हतं तरी हौसेनं माती उधळत तो खिलारजोडी पळवत होता.अनेक प्रयत्नांनंतर, प्रदीर्घ काळ चाललेल्या कोर्टकज्जानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने गुरुवारी बैलगाडा शर्यत आणि तमिळनाडूतला जल्लिकट्टू या खेळांना वैध ठरवून मार्ग मोकळा केला.

तमिळनाडूसारख्या राज्यांनी बंदीचा कायदा झुगारुन आपापल्या विधीमंडळात नवे कायदे मंजूर करुन घेतले आणि काही प्रमाणात तरी का होईना, जलिकट्टूची परंपरा जपली. महाराष्ट्र सरकारने २०१७ मध्ये उचल खाल्ली, आणि बैलाच्या शारीरिक क्षमतेची तपासणी करण्यासाठी एक पशूतज्ज्ञांची समिती नेमली. बैल हा आपल्या क्षमतेनुसार धावणारा प्राणी आहे, असा निर्वाळा या समितीने दिल्यानंतर बैलगाडा शर्यतींचा मार्ग सुकर झाला, असे म्हणावे लागेल.

अशी समिती नेमणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. या समितीचा अहवाल देशभरातील शेतकऱ्यांसाठी मोलाचा ठरणार आहे. प्राणीप्रेमींना बैलांना होणारी मारहाण आणि त्यांचा छळ छळत होता. त्यांच्या आरोपातही तथ्य नव्हते, असे नाही. काही अतिउत्साही लोक बैलगाडा शर्यतीच्या वेळी बैलांना पराण्या टोचत. चाबकाचे फटकारे लगावत. चाबकाला खिळेही लावलेले असायचे. प्रसंगी वेगाने धावावं म्हणून बैलांना दारुही पाजत! हे सगळे निश्चितच आक्षेपार्ह होते. बैलजोडीला त्रास होणार नाही, अशा प्रकारे शर्यती घेण्याला आक्षेप तसा नव्हताच.

पण पैजेसाठी आंधळ्या झालेल्या काही कंटकांना अटकाव करायचा तर बंदी हेच हत्यार तेव्हाच्या सरकारला सुचले. आता हे थोडे अन्यायाचेच झाले. मॅच-फिक्सिंगचे आरोप होतात, म्हणून वन डे क्रिकेट किंवा आयपीएल बंद करण्याची कुणाची टाप आहे का? मग बैलगाडा शर्यतींनी काय घोडे मारले होते? पण सुदैवाने विलंबाने का होईना, हा अन्याय आता दूर झाला आहे. अर्थात, आत्ताही घटनापीठाने बैलगाडा शर्यतीला मान्यता दिली असली तरी ती सशर्त आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.

जर बैलाशी जीवाभावाचं नातं आहे तर त्याला शर्यतीत पळवताना अमानुषपणे वागवणे, त्याला शारीरिक इजा करणेही गैर आहे. त्याची दक्षता बैलगाडा शर्यतीवेळी किंवा शंकरपटावेळी आवर्जून घेतली पाहिजे. नियमांचे पालन करूनच या शर्यती झाल्या पाहिजेत. न्यायालयाने परवानगीची मोहर उमटवताना परंपरेला अधिक महत्त्व दिले आहे, हे विसरता कामा नये. पूर्वसूरींनी हौसेला कधी हिंस्त्र होऊ दिले नाही, हे लक्षात घ्यावे.

न्यायालयाने हिरवा बावटा दाखवल्यामुळे बैलगाडा शर्यतींनी पुन्हा एकदा मैदाने गजबजतील. ‘भिर्रर्र…’ च्या ललकाऱ्यांनी आसमंत दुमदुमेल. देशी खिलार वंश पुन्हा एकदा जतन केला जाईल. आर्थिक उलाढालीला चालना मिळेल. बैलगाडा शर्यत पुन्हा सुरु होण्याने एक रुतलेले चाक वर निघाले आहे. शेतकऱ्याचा गाडा चालला, तर देशाचा गाडा चालणार. शर्यतींचा मार्ग मोकळा झाला असला तरी त्याला ‘अटी लागू’ आहेत, हे न विसरता पुन्हा मैदाने गजबजावीत, ही अपेक्षा.