अग्रलेख : सामंजस्याचा सूर

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भाषणातील सामंजस्याचा सूर आणि हिंदू व मुस्लिम या समाजांना त्यांनी केलेले आवाहन दिलासादायक आहे.
Dr. Mohan Bhagwat
Dr. Mohan BhagwatSakal
Summary

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भाषणातील सामंजस्याचा सूर आणि हिंदू व मुस्लिम या समाजांना त्यांनी केलेले आवाहन दिलासादायक आहे.

सार्वजनिक जीवनातील दुभंगलेपण वाढत असताना, कट्टरतावादाचा कोलाहल अशांतता निर्माण करत असताना आणि एकूणच समाजातील ताणतणावांना धार येत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भाषणातील सामंजस्याचा सूर आणि हिंदू व मुस्लिम या समाजांना त्यांनी केलेले आवाहन दिलासादायक आहे. त्यातही हिंदू धर्माच्या सर्वसमावेशक परंपरेची त्यांनी आठवण करून दिली, हे बरे झाले. सध्या देशाच्या विविध भागांत घडत असलेल्या घडामोडींचा संदर्भ या भाषणाला आहेच. पण त्याचे नेमके महत्त्व समजण्यासाठी साधारणपणे गेल्या चार दशकांत देशाच्या राजकारणाने घेतलेले वेगळे वळण आणि त्याचे पडसाद यांवरही नजर टाकायला हवी. संघाच्या परिवारातील ‘विश्व हिंदू परिषदे’ने १९८०च्या दशकात अयोध्येतील रामजन्मभूमी मुक्ती आंदोलनाची हाक दिली, तेव्हा या परिवाराची घोषणा ‘रामलल्ला हम आयेंगे, मंदिर वही बनायेंगे!’ अशी होती. त्यावेळी दिली जात असलेली आणखी एक घोषणा होती ‘अयोध्या तो बस झांकी है; काशी-मथुरा बाकी है!’ पुढे काळाच्या ओघात शरयू नदीतील बरेच पाणी वाहून गेले आणि २०१४ तसेच २०१९ या दोन्ही निवडणुकांत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने लोकसभेत निखळ बहुमतासह मोठा विजय संपादन केला.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयानेही अयोध्येतील बाबरी मशीदीची जागा हीच ‘रामजन्मभूमी’ असल्याचा निर्वाळा दिला आणि आता तेथे राममंदिराच्या बांधकामास वेग आला आहे. मात्र, त्यानंतर गेल्या एप्रिलमध्ये अचानक वाराणसीतील काशीविश्वनाथाच्या ऐतिहासिक मंदिरास लागून असलेल्या ‘ज्ञानव्यापी मशिदी’च्या आवारात काहींना शिवलिंगसदृश एक वस्तू आढळून आली. त्यामुळे पुनश्च एकवार काही जण ‘मंदिर-मशीद’ लढ्याच्या घोषणा देऊ लागले असून त्यामुळे देशात निर्माण झालेली दुराव्याची दरी रुंदावण्याची शक्यता दिसू लागली आहे. या पार्श्वभूमीवर भागवत यांनी गुरुवारी नागपुरात संघाच्या तृतीय वर्ष शिक्षा वर्गाचा समारोप करताना केलेले वक्तव्य लक्ष वेधून घेते. ‘वाराणसी येथील ‘ग्यानव्यापी’बाबत आपल्या मनात आस्था आहे आणि जे योग्य आहे, ते आपण करतोच आहोत; पण प्रत्येक मशिदीत आपण शिवलिंग कशासाठी शोधत आहोत?’ हा भागवत यांचा सवाल सर्वांसाठीच, विशेषतः संघपरिवारातील सर्वांसाठी दिशादर्शक आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे ‘ज्ञानव्यापी’त सापडलेल्या शिवलिंगाचे प्रकरण कोर्टाच्या चावडीवर जाऊन उभे राहताच, या परिवारात देशातील शेकडो मशिदींच्या खाणा-खुणा शोधत तेथे काही हिंदू प्रतिमांचा शोध घेण्याची लाट उसळली आहे.

वाराणसीतील ‘ज्ञानव्यापी’पाठोपाठ मथुरेतील कृष्णजन्मस्थानाला लागून असलेल्या दर्ग्याचा विषयही न्यायालयापुढे उपस्थित करण्यात आला आहे. त्याचवेळी जगातील एक आश्चर्य मानल्या जाणाऱ्या आग्र्यातील ‘ताजमहाल’ हा ‘तेजोमहालय’ आहे, असे मानणाऱ्यांनी या महालाची दारे उघडण्याची मागणी केली आहे. एवढेच नव्हे तर कुतुबमिनारच्या मूळ स्वरुपाविषयीही देखील वेगळ्या गोष्टी मांडल्या जात आहेत. असे एकापाठोपाठ एक दावे करण्यातून नेमके काय साध्य होणार आहे, याचा विचार करायला नको का? जागतिक स्तरावर देशापुढे जी आव्हाने तयार झाली आहेत, त्यांना तोंड देण्यासाठी प्रगतीची कास धरायला हवी आहे. साऱ्या प्रयत्नांची दिशा भविष्याकडे वळवायला हवी. आर्थिक,सामाजिक, शैक्षणिक सुधारणांवर लक्ष केंद्रित करावे लागेल आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संस्था उभ्या कराव्या लागतील. भूतकाळातील वादविषयांच्या ‘उत्खनना’त रमलेल्यांना याचे भान नाही. ते आता तरी यावे, अशी अपेक्षा आहे.

वाराणसीतील वादावरही सामंजस्यातून तोडगा काढला जावा, ही डॉ. भागवत यांची सूचना आहे. या स्थानाबाबत आपण रोज बोलत असलो तरी आपण त्यात नवा मुद्दा आणू नयेच; शिवाय मुळात हा वाद आपण कशासाठी वाढवत आहोत, हा त्यांनी विचारलेला प्रश्न महत्त्वाचा. भाजपही हा वाद अधिक वाढवू इच्छित नाही, हे पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या परवाच्या वक्तव्यावरून स्पष्ट झाले आहे. नड्डा यांनी भाजपचा ठराव फक्त अयोध्येतील राममंदिरापुरताच मर्यादित आहे, असे नमूद केले आहे. वाराणसीतील ‘ज्ञानव्यापी’ वाद चव्हाट्यावर येताच, कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री के. ई. ईश्वरप्पा यांनी ‘३६ हजार मंदिरे तोडून तेथे मशिदी बांधण्यात आल्या होत्या आणि आता तेथे कायदेशीर मार्गाने पुन्हा मंदिरे उभारली जातील, असे तारे तोडले होते. नड्डा आणि आता डॉ. भागवत यांच्या वक्तव्यांमुळे त्यांचे कान उपटले गेले आहेत.अशा इतरांनीही योग्य संदेश घ्यावा, अशी अपेक्षा आहे.

‘ज्ञानव्यापी’ आता इतिहास झाला असून, तो आपण निर्माण केलेला नाही; शिवाय त्याच्याशी आजचे ‘हिंदू’ वा आजचे ‘मुस्लिम’ यांचा संबंध नाही, असेही त्यांनी चार समजुतीचे बोल ऐकवले आहेत. अशा शेकडो मंदिरांबाबत हिंदूंच्या मनात आस्था असली तरी ती जमीनदोस्त झालेली आहेत, असे त्यांचे प्रतिपादन आहे. अर्थात, हीच भूमिका संघपरिवाराला अयोध्येतील बाबरी मशिदीबाबतही घेता आली असती. मात्र, तेव्हा त्या विषयाचे माध्यम करून हिंदू मतपेढी मजबूत करण्याचा परिवाराचा इरादा होता. आता ते ध्येय दिल्लीचे तख्त लागोपाठ दोनदा काबीज केल्याने साध्य झाले आहे. या पार्श्वभूमीवर तरी देशात नवे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न व्हायला हवा होता. पण भाजपला मिळालेल्या जनादेशाचा वेगळाच अर्थ लावून काही व्यक्ती आणि गट अधिकाधिक आक्रमक भूमिका घेताना आढळतात. त्यांच्या उद्योगांना चाप बसायला हवा होता. सरसंघचालकांच्या सामंजस्याच्या भूमिकेमुळे त्याविषयीची आशा उंचावली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com