अग्रलेख : काठ्या आणि करंगळी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अग्रलेख : काठ्या आणि करंगळी

विविध आर्थिक प्रश्नांच्या आवर्तात जग सापडले असताना त्यावरील उपाययोजनांचा मार्ग कोणता याचा साहजिकच शोध घेतला जात आहे.

अग्रलेख : काठ्या आणि करंगळी

विविध आर्थिक प्रश्नांच्या आवर्तात जग सापडले असताना त्यावरील उपाययोजनांचा मार्ग कोणता याचा साहजिकच शोध घेतला जात आहे. त्यामागची चिंता आणि धडपड याचेच प्रतिबिंब यंदाच्या अर्थशास्त्राच्या ‘नोबेल’मध्येही पडले असल्यास आश्चर्य नाही. अर्थव्यवस्थेत काही पेचप्रसंग निर्माण झाला तर त्याचा बॅंकिंग यंत्रणेवर ताण येतो, असे नेहेमीच मानले जाते. त्यात तथ्यही आहे; परंतु बॅंका, वित्तसंस्थांमधील गुंतागुंतीच्या प्रश्नांचा परिणामही अर्थव्यवस्थेवर गंभीररीत्या होऊ शकतो.

म्हणजेच बॅंकिंग यंत्रणा कोलमडणे हा अर्थव्यवस्थेतील पेचप्रसंगांचा केवळ परिणाम नसतो, तर बऱ्याचदा ते कारणही असते. अमेरिकी मध्यवर्ती बॅंकेचे माजी प्रमुख बेन बर्नांके यांनी १९८३ मध्येच लिहिलेल्या शोधनिबंधात या वास्तवावर बोट ठेवले होते. पुढे २००८मध्ये अमेरिकेत सबप्राईम पेचप्रसंगाच्या संकटाने मंदीचा फेरा आला. त्याचा मोठा फटका अमेरिकी व्यवस्थेला, जनतेला बसला होता. बर्नांके हेच त्यावेळी अमेरिकी फेडरल बॅंकेचे प्रमुख होते. बॅंका, वित्तसंस्थांना सावरण्यासाठी त्यांनी उपाय योजले. तसेच मंदीच्या तडाख्यातून अर्थव्यवस्थेला बाहेर काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसा ओतला. त्या मंदीच्या संकटातून जग पूर्ववत होऊ पाहत असतानाच कोविडचे संकट जगावर आदळले आणि त्यातून मोकळा श्वास घेण्याची स्थिती निर्माण होतेय असे वाटत असतानाच रशिया-युक्रेन युद्धाने नवा पेच उभा केला. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या संकटांत ज्या देशांतील बॅंकिंग यंत्रणा सुदृढ ते तग धरून राहू शकले, असे दिसून आले आहे. बेन बर्नांके, डग्लस डायमंड, फिलिप्स डिब्विग तीन अर्थतज्ज्ञांना यंदाचे अर्थशास्त्राचे ‘नोबेल’ जाहीर करताना नोबेल कमिटीने नेमके हेच वास्तव विचारात घेतलेले दिसते.

या तीनही अर्थतज्ज्ञांनी बॅंकिंग प्रणालीच्या सुदृढतेविषयी अभ्यास करून निष्कर्ष मांडले. बर्नांकेंनी १९२९च्या महामंदीचा अभ्यास केला होता, त्यामुळे मंदीच्या संकटाचा सामना करण्यासाठी त्यांना त्याचा उपयोग झाला. त्या तिघांनीही बॅंकांवरील विश्वास टिकून राहण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. बचत करणारा आणि कर्ज घेणारा या दोहोंमधला दुवा म्हणजे बॅंका. पण या दोन्ही घटकांचा बॅंकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे वेगळा असतो. ठेवीदार फार थोड्या कालावधीचा विचार करून तर कर्ज घेणारे दूरच्या पल्ल्याचा विचार करून बॅंकांशी व्यवहार करीत असतात. बॅंकांची कार्यपद्धती हा कळीचा मुद्दा असतो. संपादन केलेल्या विश्वासार्हतेमुळे बॅंका आपली भूमिका बजावू शकतात. पण कोणत्याही कारणांमुळे, एखाद्या अफवेमुळेही जर या विश्वासाला तडा गेला; तर एकाचवेळी पैसे काढून घेण्यासाठी ठेवीदारांची झुंबड उडते. अशा संकटात बॅंकांची अवस्था दयनीय बनते. त्यामुळे ठेवीदारांच्या पैशाची सुरक्षाहमी विश्वासार्हता अतूट ठेवण्यासाठी उपयोगी ठरते, यावर डग्लस डायमंड, फिलिप्स डिब्विग यांनी भर दिला. त्यांच्या या कामाची दखल घेतली गेली आणि त्यांचा वैयक्तिक सन्मान झाला, हे तर या पुरस्काराने साधलेच; पण त्यानिमित्ताने जगभरातील बॅंकिंग यंत्रणांच्या सुदृढतेची आवश्यकता स्पष्ट झाली, हे महत्त्वाचे.

कर्जतारण बाजारपेठेचा फुगा फुटल्यानंतर ‘लेहमन ब्रदर्स’ने दिवाळखोरी जाहीर केली. या आर्थिक भूकंपाचा केंद्रबिंदू अमेरिका होता; पण त्याचे धक्के ब्रिटनसह अनेक देशांना, तेथील बॅंकांना बसले. भारतातील बॅंकांना वाचविण्यात यश आले, ते चांगल्या नियमनामुळे हेच खरे. विशेषतः रिझर्व्ह बॅंकेचे तत्कालिन गव्हर्नर वाय.व्ही. रेड्डी यांनी योग्य ती पावले उचलून महागाई वाढणार नाही आणि आर्थिक विकासाला खीळही बसणार नाही, हे पाहिले. या नियमनाला श्रेय द्यायला हवेच; परंतु त्याचबरोबर ‘अंथरूण पाहूनच पाय पसरणे’ या भारतातील सर्वसामान्यांवरील पारंपरिक संस्कारांचाही त्यात वाटा आहे. दुसऱ्याच्या बचतीचा पैसा वापरून चैन-चंगळ करण्याच्या प्रवृत्तीच्या आड हे संस्कार येत असल्याने येथील बॅंकांची मोठी पडझड टळली, हेही लक्षात घ्यावे. अमेरिकेतील पेचप्रसंगाचे मूळ हे अतिरिक्त उपभोगवादात होते. आत्ताच्या घडीला कर्ज काढा, उपभोग घ्या; पुढचे पुढे पाहू, या बेदरकार वृत्तीमुळे बॅंकांवर आघात झाला. त्यापासून धडा घेत बॅंकांना कार्यपद्धतीबाबत सतत सजग राहावे लागेल. गरजांचा नीट विचार करून कर्ज देणे, ते देताना परतफेडीच्या क्षमतेचा बारकाईने आढावा घेणे हे यापुढेही सातत्याने करावे लागणार आहे.

खुद्द अमेरिकेत आता कर्ज काढण्याबाबत लोक अधिक सावध झाले आहेत. ऋण काढून सण साजरे करण्यातील धोके त्यांना समजले आहेत. भारतातील लोकांनीही आपल्या सांस्कृतिक धारणा सोडता कामा नयेत. भलत्याच गोष्टींना भुलून आणि अनुकरणाच्या लाटेत वाहत जाऊन आपली जीवनशैली बदलण्याने जी संकटे कोसळतात, त्याने व्यक्तिगत नुकसान होते, त्याचप्रमाणे व्यवस्थेचे आणि देशाचेही नुकसान होते. आर्थिक शिस्त आणि त्यामागचा असा विचार जिथे रुजलेला असतो, तिथल्या संस्थाही आपोआप सुविहीत काम करण्याची शक्यता नेहेमीच जास्त असते. अर्थव्यवस्थेचा गोवर्धन उचलण्यासाठी उत्तम धोरणे, गुंतवणुकीचे वातावरण, कायदेकानू या सगळ्या ‘काठ्या’ आवश्यक असतातच; परंतु अशा रुजलेल्या सामाजिक-सांस्कृतिक धारणांची ‘करंगळी’ही अधिक महत्त्वाची असते. आधुनिक तंत्रज्ञानाच्या वेगवान प्रगतीमुळे इतर क्षेत्रांप्रमाणेच बॅंकिंग क्षेत्रही कूस बदलत असले तरी या मूलतत्त्वांचे अधिष्ठान कायमच राहणार आहे. बॅंकिंगप्रणालीचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या अर्थतज्ज्ञांना जाहीर झालेल्या ‘नोबेल’मुळे त्याचीच पुन्हा एकदा जाणीव झाली आहे.