अग्रलेख : शहरांचे शहारे!

भाद्रपद लागता लागता पर्जन्यकाळाने असे काही रौद्र रुप दाखवले, की त्याच्या उग्र माऱ्यामुळे महाराष्ट्रातलीच नव्हे, तर संपूर्ण देशातील काही शहरगावे हवालदिल होऊन गेली.
Rain Water
Rain WaterSakal
Summary

भाद्रपद लागता लागता पर्जन्यकाळाने असे काही रौद्र रुप दाखवले, की त्याच्या उग्र माऱ्यामुळे महाराष्ट्रातलीच नव्हे, तर संपूर्ण देशातील काही शहरगावे हवालदिल होऊन गेली.

भाद्रपद लागता लागता पर्जन्यकाळाने असे काही रौद्र रुप दाखवले, की त्याच्या उग्र माऱ्यामुळे महाराष्ट्रातलीच नव्हे, तर संपूर्ण देशातील काही शहरगावे हवालदिल होऊन गेली. विजांचा धडकी भरवणारा कडकडाट, अंगठ्याएवढ्या जाडीच्या पाऊसधारा, रोरांवणारे वारे आणि अवघ्या काही मिनिटात परिसर जलमय करुन टाकण्याचा तो ढगांचा पवित्रा, या नागरी वस्त्यांची त्रेधातिरपीट उडवणारा होता. निसर्गाचे हे भयावह रुप लोकजीवनाला पार दिङमूढ करणारे. निसर्गाचा हा प्रकोप अजून आठवडाभर तरी राहील, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. नागपूरसह विदर्भात अतिवृष्टीचा लाल बावटा दाखवण्यात आला असून पुण्यानजीकच्या घाटमाथ्याच्या परिसरासाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

पावसाच्या माऱ्यामुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान झाले आहेच, हातातोंडाशी आलेले सोयाबीनसारखे पीक गमावण्यासारखी परिस्थिती आहे. परंतु, ग्रामीण भागासोबत यावेळी शहर भागांनाही फटका बसल्याचे चित्र दिसते. बुलढाणा, वर्धा भागात पावसाने इतका जोर धरला की जनजीवन पूर्णत: ठप्प झाले, संपूर्ण जिल्हाच विजेविना अंधारात बुडाला. नागपूरच्या विमानतळ परिसरात तर हमरस्त्यांवरुन अक्षरश: नद्यांचे पाट वाहावेत, तसे दृश्य दिसत होते. पुण्यात रविवारी सायंकाळी पावसाने दोनच तास अफाट बरसून संपूर्ण शहराची दैना उडवली. प्रचंड वाहतूक कोंड्या, सखल भागात साचलेले पाणी, वीज गायब आणि रहिवासी वस्त्यांमध्ये घुसलेले पुराचे पाणी, हे सारे नष्टचर्य पुणेकरांनी अनुभवले. तेथील काही सखल भागांमधले पाणी तर अद्यापही ओसरलेले नाही. शहरांचा स्मार्टनेस तर राहूद्यात, आहे ती रयाही गेल्याचे दृश्य राज्यातील अनेक शहरांमधून दिसले. निसर्गाच्या या चपेट्यांमधून यावेळी मुंबई काही प्रमाणात सुटली हे खरे, पण येत्या काही दिवसात तेथेही पाऊस धिंगाणा घालणार, अशी चिन्हे आहेत.

गेले काही दिवस पुण्या- मुंबईकडे तर रोज सायंकाळी घड्याळ लावावे, असे ढग जमून येत अपरंपार बरसत आहेत. भाद्रपदात पाऊस जरा जास्त जोमात पडतो हे खरे, पण त्या दणक्यामुळे शेतीच्या नुकसानापलिकडे, नागरी जीवनाचीही इतकी बिकट अवस्था होईल, हे काही जणांना काहीसे आश्चर्यकारक वाटेल. अपेक्षेपेक्षा अधिक पाऊस पडला की मानवी जीवनाचे इतके हाल का होतात, असा सवाल नेहमीच केला जातो. दुर्दैवाने त्याला उत्तर आणि उपाय शोधण्याच्या भानगडीत आपले राज्यकर्ते कधी पडलेले दिसलेले नाहीत! हवामानात होणारे बदल या भयंकर वृष्टीला कारणीभूत आहेत, हे तर शास्त्रच सांगते. तज्ज्ञ म्हणतात, त्याप्रमाणे ग्लोबल वॉर्मिंगचे हे दुष्परिणाम आहेत, यात शंकाच नाही. अमेरिका आणि युरोपातील काही नामांकित शहरांनाही या समस्येला तोंड द्यावे लागते. काही ठिकाणी अतिवृष्टी, तर काही ठिकाणी नद्या कोरड्या पडल्या आहेत. भारतात आधीच मूलभूत सुविधांची वानवा, त्यामुळे जास्तीच्या पावसाने दैना उडायला वेळही लागत नाही. त्यातून सावरण्यासाठीही दीर्घकाळ जावा लागतो. मोसमी पावसाचा प्रदेश असूनही निसर्गाचा मारा सहन करण्याची क्षमता असलेल्या सुनियोजित नागरी वस्त्या आपण आपल्या देशात का उभारु शकलो नाही, हा खरा सवाल आहे.

पावसाचा हा मारा फक्त महाराष्ट्रात नव्हे, तर कोलकात्यापासून तिरुवनंतपुरमपर्यंत सर्वच शहरांमध्ये त्राहीमाम करणारा ठरला आहे. बंगळूरसारख्या शहरात तसे पाहता वर्षभर पाऊस पडतो. पर्जन्यकाळ वगळता उरलेले काही महिने संध्याकाळच्या सरी तेथील नागरिकांच्या अंगवळणी पडल्या आहेत. पावसाळ्यात बंगळूर भागात सरासरी ९८६ मिमी इतका पाऊस पडतो. यंदा तो सप्टेंबरापर्यंतच १४०० मिमीपेक्षा जास्त पडून गेला आहे. यंदा मात्र बंगळूरवासीयांना पावसाळ्याने मेटाकुटीस आणले. तेथे वस्त्यांमध्ये साचलेले पाणी अजूनही धड ओसरलेले नाही. अगदी श्रीमंतांच्या वस्त्यांमध्येही, ज्यांच्या बंगल्यांच्या आवारात परदेशी गाड्यांचे ताफे होते, त्यांनाही ट्रॅक्टरवर बसून सुरक्षित आसरा घ्यावा लागला. गुजरातेतही हीच परिस्थिती दिसली.

मुंबईतही वेगळी अवस्था नसतेच. अपेक्षेपेक्षा पाऊस जास्त झाला की संपूर्ण नागरी व्यवस्थाच धापा टाकू लागते. याचे सगळे खापर निसर्ग आणि ग्लोबल वॉर्मिंगवर फोडणे आत्मवंचना ठरेल. या नुकसानाचे बरेचसे अपश्रेय बेसुमार शहरीकरण आणि वर्षानुवर्षांच्या नियोजनशून्य कारभाराला द्यावे लागेल! सांडपाण्याचा निचरा, ड्रेनेज आदी सुविधांचा किंचितही विचार न करता शहरे वाढताना दिसतात. वाढत्या लोकसंख्येसोबत शहरेही फुगत जाणार, हे खरेच. पण तो शहरीकरणाचा रेटा थोड्या डोळसपणे करुन मूलभूत संरचना उभी करण्याकडे प्रशासकांनी लक्ष दिले असते, तर आज ही वेळ आली नसती. शहरवस्त्यांचीसुद्धा गर्दी सामावून घेण्याची विशिष्ट मर्यादा असते. ती ओळखूनच नगरनियोजन व्हायला हवे. दुर्दैवाने मतांच्या राजकारणापायी, आणि भ्रष्टाचाराच्या दुर्धर रोगापायी नगर नियोजन नेहमीच कागदावर राहाते.

नागरी वस्त्या बेसुमार वाढत जातात. वस्त्यांची वाढ हा शहरीकरणाचा एक मुद्दा झाला. पण उड्डाणपुल, मेट्रो प्रकल्प आदी विकासकामांचा धडाका लावतानाही निसर्गाची पत्रास ठेवली जात नाही. गर्दीच्या नियोजनासाठी निसर्गाची हेळसांड केली तर त्याची कधी ना कधी किंमत मोजावी लागतेच, हा धडा यानिमित्ताने आपल्या राज्यकर्त्यांना पुन्हा एकदा मिळाला आहे. त्यातून आपण काही शिकणार का?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com