अग्रलेख : ‘महाशक्ती’चे वास्तव!

महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर चाळीस दिवसांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारच्या दिमतीला मंत्री मिळाले होते आणि आता या सरकारचे खातेवाटपही झाले.
politics
politicssakal
Summary

महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर चाळीस दिवसांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारच्या दिमतीला मंत्री मिळाले होते आणि आता या सरकारचे खातेवाटपही झाले.

महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर चाळीस दिवसांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारच्या दिमतीला मंत्री मिळाले होते आणि आता या सरकारचे खातेवाटपही झाले आहे! मात्र, या खातेवाटपात फडणवीस यांनी मारलेल्या बाजीनंतर शिवसेनेतून बाहेर पडलेल्या या ४० जणांच्या हाती मुख्यमंत्री पदाशिवाय आले तरी काय, असा प्रश्न समोर येतो. खातेवाटपावर भारतीय जनता पक्षाचा वरचष्मा दिसतो. शिवाय, शपथविधी सोहळ्यात मंत्र्यांचा जो काही क्रम लावण्यात आला होता, त्यावर नजर टाकली तर फडणवीस यांचे प्रदेश भाजपवरील अधिराज्य ठळकपणे समोर येते. मुख्यमंत्रिपद भले शिंदे गटाकडे गेले असले, तरी सरकारवर फडणवीस नि भाजप यांची मोठी छाप आहे. भाजपचे स्वतःचेच १०५ आमदार आहेत, ही बाब खरीच. तरीदेखील खातेवाटप जाहीर झाल्यानंतर आवळा देऊन कोहळा काढणे, या म्हणीची आठवण होते. गुवाहाटीत असताना शिंदे यांनी आमच्या पाठीशी ‘महाशक्ती’ आहे, असा उल्लेख केला होता.

त्या ‘महाशक्ती’चे वास्तव या निमित्ताने त्यांना चांगलेच जाणवले असेल! पूर्वीचीच म्हणजे उद्धव ठाकरे सरकारातील नगरविकास आणि अन्य काही खाती आपल्याकडे राखण्यात मुख्यमंत्री शिंदे यांना यश आले आहे. मात्र, फडणवीस यांच्याकडे अत्यंत महत्त्वाची गृह आणि अर्थ अशी खाती आहेत. ऊर्जा, जलसंपदा आणि गृहनिर्माण अशी कळीची खातीही भाजपकडे आहेत. गृह आणि अर्थ या दोन खात्यांचा एकूणातील व्याप बघता, ही एका अर्थाने फडणवीस यांची कसोटी असली तरी यापूर्वी ही दोन खाती एकाच मंत्र्याकडे सोपवण्याची घटना अपवादानेच घडली असेल. अर्थात, या मंत्रिमंडळाचा विस्तार अजूनही बाकी असून, तो झाल्यावर काही खाती इतरांकडे जाऊ शकतात, असे सांगितले जात आहे. मात्र, आता सत्तारूढ झालेले सर्वच्या सर्व म्हणजे २० मंत्री हे कॅबिनेट दर्जाचे असल्याने या विस्तारात समावेश होणारे बहुतेक मंत्री हे राज्यमंत्रीच असणार, याबाबत शंका नसावी. त्यामुळे फडणवीस यांच्या हातातच गृह तसेच अर्थ ही दोन कळीची खाती कायम राहतील, अशी चिन्हे आहेत.

या खातेवाटपाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पूर्वीच्या महाविकास आघाडी सरकारात जी बलदंड खाती राष्ट्रवादी काँग्रेसकडे होती, त्यांचा कारभार आता भाजपने आपल्या हातात घेतला आहे! महाविकास आघाडी सरकारचे खातेवाटप झाले तेव्हाच आपल्या हाती कमी दर्जाची खाती आल्याची तक्रार शिवसेना आणि मुख्यत्वे काँग्रेसचे नेते खाजगीत करत होते. तीच खाती आता शिंदे गटाला मिळाली आहेत. त्यामुळे या गटातील आमदारांनी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या नाराजीचा राग आळवणे सुरू केले असले, तरी त्यातून फार काही निष्पन्न होईल, असे वाटत नाही. सत्तांतरानंतर शिंदे यांचे नाव मुख्यमंत्रिदासाठी मुक्रर करण्यात आले, तेव्हा फडणवीस यांनी प्रथम मंत्रिमंडळात सामील न होण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र, अखेरीस भाजपच्या दिल्लीतील श्रेष्ठींनी त्यांना उपमुख्यमंत्रिपद स्वीकारायला लावले, तेव्हा त्यांना जाणीवपूर्वक अवमानित केले गेल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, खातेवाटपात फडणवीस यांना अनेक बाबतीत झुकते माप मिळाल्याचे स्पष्ट होते.

फडणवीस यांचे निकटवर्ती राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाहिल्यांदा शपथ घेतली. त्यांच्याकडे महसूल तसेच दुग्धविकास अशी ‘अर्थपूर्ण’ खाती देण्यात आली आहेत. विखे-पाटील यांच्याबरोबरच फडणवीस यांचे निकवर्ती म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन, रविंद्र चव्हाण यांच्या हातीही महत्त्वाची खाती आली आहेत. त्या तुलनेत, फडणवीस यांचे पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी ठरू शकतील अशा चंद्रकांतदादा आणि मुनगुंटीवार यांना कमी महत्त्वाची खाती मिळाली आहेत. हे सारे संकेत महाराष्ट्र भाजपचे सर्वेसर्वा हे फडणवीस असतील, यावर शिक्कामोर्तब करणारे आहेत. दादा भुसे या शिंदे गटातील नेत्याला गेल्या मंत्रिमंडळातील कृषी खाते गमवावे लागले. त्यांच्या वाट्याला बंदरे आणि खाणकाम ही खाती आली आहेत. शिंदे गटातही या खातेवाटपात बरीच रस्सीखेच झाल्याचे दिसते. उदय सामंत यांच्या वाट्याला उद्योग खाते आले आहे; कारण या उठावानंतर काही काळाने शिंदे गटात सामील होताना त्यांनी तशी अट घातली होती, असे सांगण्यात येते.

विधिमंडळ अधिवेशनात शिंदे-फडणवीस यांच्या दिमतीला आणखी दीड डझन मंत्री आले असले, तरी विरोधी बाकांवर आता सरकार चालवण्याचा मोठा अनुभव असलेले अजित पवार, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ, जयंत पाटील अशा अनेक नेत्यांची फौज आहे. ते सरकारला कोंडीत पकडण्याचा जोरदार प्रयत्न करतील. एकमात्र खरे. शिवसेनेत मोठी फूट पाडून ‘ठाकरे’ हा ‘ब्रॅण्ड’ दुबळा करून दाखवण्यात यशस्वी झाल्यानंतर आता या फुटीरांच्या गटालाही होता होईल तेवढे शक्तिहीन करण्याचा भाजपचा कावा यशस्वी झाल्याचे शपथविधी सोहळा तसेच नंतरचे खातेवाटप यावरून दिसत आहे! आता फडणवीस यांना याच गटाला सोबत घेऊन तोंडावर येऊन ठेपलेल्या महापालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरे जायचे आहे. त्यात मुंबई महापालिका हे भाजपचे पहिले लक्ष्य असणार. त्या निवडणुकांत मोठे यश मिळाले, तर फडणवीस यांच्या नेतृत्वाला महाराष्ट्र भाजपमध्ये कोणीच प्रतिस्पर्धी उरणार नाही. मात्र, भाजपच्या या डावपेचांना उत्तर देण्यासाठी शरद पवार यांनी मोठ्या चलाखीने उभी केलेली महाविकास आघाडी एकसंध राहते काय, ही आता राज्याच्या राजकारणातील औत्सुक्याची बाब उरली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com