अग्रलेख : वादंग आवडे सर्वांना! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav Thackeray

राज्याच्या राजकारणात अलीकडे अधूनमधून सलोख्याची, समन्वयाची भाषा केली जाताना कानावर पडते आणि ‘झाले, गेले विसरून जाऊ’ असाही सूर आळवला जातो.

अग्रलेख : वादंग आवडे सर्वांना!

राज्याच्या राजकारणात अलीकडे अधूनमधून सलोख्याची, समन्वयाची भाषा केली जाताना कानावर पडते आणि ‘झाले, गेले विसरून जाऊ’ असाही सूर आळवला जातो. एकीकडे असे बोलले जात असताना दुसरीकडे एकमेकांच्या पायात खोडे घालण्याचे राजकारण मात्र चालू आहे. किंबहुना त्याला ऊत आला आहे. शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या दहाव्या स्मृतिदिनाचा मुहूर्त साधत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकाश आंबेडकर यांची घेतलेली भेट; तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य हा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची होता होईल तेवढी कोंडी करण्याचा प्रयत्न होता. शिवाजी पार्क परिसरात होऊ घातलेल्या बाळासाहेबांच्या स्मारकाच्या कामास उद्धव ठाकरे यांनी वेग आणला असून, त्यासाठी काही बैठकीही घेतल्या आहेत. खरे तर या स्मारकास पुरातन वारसा म्हणून नोंदला गेलेला महापौर बंगला देण्यास अनेकांचा विरोध होता.

मात्र, तेव्हा फडणवीस यांचे सरकार शिवसेनेच्या पाठिंब्यावर उभे असल्याने, त्यांनी ठाकरे यांचा हट्ट पुरवला; शिवाय या स्मारकाच्या हाताळणीची सूत्रेही उद्धव यांच्याकडे सुपूर्द केली! अर्थात, हे स्मारक सरकारी म्हणजेच जनतेच्या पैशाने उभे राहणार असून, त्याची कार्यवाही ‘मुंबई महानगर विकास प्राधिकरणा’मार्फत होणार आहे. आता मात्र, तोंडावर आलेल्या मुंबई; तसेच राज्यातील अन्य महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी या कामास दिलेली गती बघता, शिंदे-फडणवीस यांना खडबडून जाग आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या कल्पनेतून हे स्मारक उभे राहिले तर त्याचा वापर ते निवडणुकीत करणार, हे लक्षात येताच, या स्मारकाचा वापर कोणीही खासगी बैठकींसाठी करता कामा नये, अशी तंबी फडणवीस यांनी नेमकी दिली. त्यांचा रोख अर्थातच या स्मारकात गेल्या महिनाभरात झालेल्या बैठकींवर होता.

याच मुहूर्तावर भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी ‘हे स्मारक सरकारने ताब्यात घ्यावे’ ही केलेली मागणी म्हणजे शिंदे-फडणवीस गटाचा उद्धव यांची कोंडी करण्याचाच आणखी एक प्रयत्न. या पार्श्वभूमीवर शिंदे-प्रकाश आंबेडकर भेटीस विशेष महत्त्व आहे. याचे कारण गेले काही दिवस उद्धव आणि आंबेडकर यांच्या आघाडीच्या बातम्या चर्चेत होत्या. शिवाय, येत्या रविवारीच ‘प्रबोधनकारांवरील नव्या स्वरूपातील संकेतस्थळाचा लोकार्पण समारंभ उद्धव यांनी आयोजित केला असून, त्याला आंबेडकर उपस्थित राहणार असल्याचे जाहीर झाले आहे. त्यापूर्वीच शिंदे यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेणे, हा योगायोग नाही. त्यामागे उद्धव-प्रकाश यांच्या संयुक्त कार्यक्रमाची हवा काढून घेणे, हाही हेतू आहे. ‘या भेटीत कोणतेही राजकारण झालेले नाही’, असे प्रकाश आंबेडकर सांगत आहेत. शिवाय, ‘भारतीय जनता पक्षाशी संबंध असलेल्यांबरोबर राजकारण शक्य नाही’, अशा आशयाचे त्यांचे उद्‍गारही प्रसिद्ध झाले आहेत. मात्र, राजकारणात कोणी कायमचे शत्रू नसते आणि मित्रही हे सूत्र कधी नाही इतके प्रतिष्ठित झाले असताना या भेटीगाठी लक्ष खेचणारच.

मात्र, मूळ मुद्दा हा बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा आहे. ते व्हायलाच हवे आणि ते त्यांच्या कार्यास शोभेसे हवे. मात्र, या स्मारकाची माहिती पत्रकार परिषदेत देताना उद्धव यांनी शिवसेनेचा उल्लेख करण्याची आवश्यकता नव्हती. याचे कारण बाळासाहेबांच्या वाटचालीचे दर्शन हाच शिवसेनेचा प्रवास आहे. शिवाय, त्यावेळी उद्धव यांनी ‘तोतया शिवसैनिक’ असे विशेषण शिंदे यांना त्यांचे नाव न घेता लावले. मग शिंदे-फडणवीस गटानेही या स्मारकावरून वादंग माजविण्याचा डाव टाकलेला दिसतो. स्मारकाचा विषय कोर्टाच्या चावडीवर जाण्याची नि परिणामी स्मारकाचे काम लांबणीवर पडण्याची चिन्हे त्यामुळे दिसताहेत.

या संघर्षास वादाची आणखी एक किनार नेमकी याच मुहूर्तावर येऊन मिळाली, ती मात्र राहुल गांधी यांच्या बॅरिस्टर सावरकरांवर टीका करणाऱ्या वक्तव्यामुळे. राहुल ‘भारत जोडो यात्रेत जे काही बोलताहेत ते यापूर्वीही बोलत आले आहेत. आता त्यावरुन रण माजवायची एक संधी तयार झाली तीही सध्याच्या राजकीय रुढीला धरुनच. त्यामुळे लगोलग ‘ही यात्रा रोखा’ येथपासून ‘राहुल यांना अटक करा’,असा घोष शिंदे गटातर्फे सुरू झाला हेही समजण्यासारखे. या सगळ्याचा वापरही उद्धव यांची कोंडी कऱण्यासाठी झाला. यात उद्धव यांची पंचाईत होणे, स्वाभाविक होते. त्यामुळे मग सावरकरांना ‘भारतरत्न’ द्या, अशी मागणी संजय राऊत यांनी करून, उद्धव गटाचे सावरकर प्रेम जाहीर केले.

तर खुद्द उद्धव यांनी याच मागणीचे समर्थन करताना, आज सावरकरांचे प्रेम ज्यांना आले आहे, ते स्वातंत्र्यलढ्यात कोठे होते, असा टोला लगावला. आता सावरकरांसंबंधातील या उद्‍गारांचा परिणाम म्हणून उद्धव ठाकरे हे राहुल यांच्या सभेत सहभागी होणार काय, असा प्रश्न उभा राहिला आहे. एकूणात, उद्धव तसेच महाविकास आघाडी यांची कोंडी करण्याचा आनंद बाळासाहेबांच्या स्मृतिदिनाच्या मुहूर्तावर शिंदे-फडणवीस गटाला मिळतो आहे. सर्वसामान्य जनतेला मात्र रोजच्या रोजीरोटीच्या प्रश्नांपलीकडले हे वाद एक तर सहन करणे वा त्यातून स्वत:ची करमणूक करून घेण्यापलीकडे काहीच उरलेले नाही. जोपर्यंत या पातळीवरचे डावपेच सुरू आहेत, तोपर्यंत तरी ‘प्रगल्भता’, ‘सामंजस्य’ वगैरे शब्ददेखील केविलवाणे आणि उपरे वाटायला लागतात!