अग्रलेख : झुंडशाहीची लक्षणे

समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर यांनी ‘विचारकलहास का भिता?’ असा प्रश्न आपल्या लेखातून तत्कालीन समाजाला केला होता.
Mob Rule
Mob RuleSakal

आर्थिक शिस्तीपासून वैचारिक जागृतीपर्यंत अनेक क्षेत्रांत प्रगत राज्य अशी महाराष्ट्राची प्रतिमा तयार झाली, त्यात इतर क्षेत्रांप्रमाणेच येथील राजकारण्यांचाही वाटा होता; पण आता मात्र ती धुळीला मिळणार की काय, अशी भीती निर्माण झाली आहे.

समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर यांनी ‘विचारकलहास का भिता?’ असा प्रश्न आपल्या लेखातून तत्कालीन समाजाला केला होता. मात्र, त्यांच्या निधनानंतर सव्वाशे वर्षांनीदेखील आपल्याला विचारकलह रुचत नाही, याचाच पुनःपुन्हा प्रत्यय येत आहे. त्या वेळी गतानुगतिकतेच्या मानसिकतेवर आगरकर प्रहार करीत होते. आज अनेक संदर्भ बदलले असूनही विचारकलहाकडे पाठ फिरविण्याची प्रवृत्ती कायम आहे. त्याऐवजी आपण हातात जोडे घेणे पसंत करतो, हेच आगरकरांच्या पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येस शिवसेना आणि भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी दाखवून दिले. मुंबईत शिवसेना भवनासमोर अक्षरशः ‘राडा’ घातला गेला आणि या राज्याची राजकीय संस्कृती कोणता तळ गाठू पाहात आहे, असा प्रश्न निर्माण झाला. आर्थिक शिस्तीपासून वैचारिक जागृतीपर्यंत अनेक क्षेत्रांत प्रगत राज्य अशी प्रतिमा तयार झालेल्या राज्याचा लौकिक सर्वच अर्थांनी धुळीला मिळविण्याचा चंग काही राजकारण्यांनी बांधला आहे की काय, असे वाटण्याजोग्या घटना घडत आहेत.

उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राची सत्ता मिळू न दिल्यापासून भाजपमध्ये जी काही खदखद सुरू आहे, तीच या भरचौकात झालेली धक्काबुक्की, हाणामारी आणि लाथाळ्या यामुळे जाहीर झाली आहे. मुंबई महापालिका निवडणुका आता जेमतेम सहा-सात महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत आणि शिवसेनेचे गेल्या दोन-अडीच दशकांचे या पालिकेवरील राज्य हिसकावून घेण्यासाठी भाजप कमालीचा उतावीळ झाला आहे. त्यातून निर्माण झालेला संघर्ष किती विकोपाला आणि कोणत्या थराला जाऊ शकतो, याची झलकच या वेळी पाहायला मिळाली. खरे तर हातात हात घालून राज्य सरकार चालवत असतानाही २०१७ मध्ये झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत हेच दोन पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले होते. तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘वाघाच्या जबड्यात घालूनी हात, मोजतो दात, अशी ही जात, आमुची!’ अशा शब्दांत शिवसेनेला बोचकारण्यापुरतीच आपली लढाई मर्यादित ठेवली होती. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या खेळीमुळे २०१९मध्ये राज्याची सत्ता गेली आणि त्यामुळे कमालीचे अस्वस्थ झालेले भाजप कार्यकर्ते आता मात्र हातघाईवर आलेले दिसतात. भाजपच्या एका महिला कार्यकर्तीने पायातली चप्पल हातात घेऊन शिवसेनेच्या महिलांवर चाल करून जाणे ही धक्कादायक बाब म्हटली पाहिजे.

वाचाळवीरांचे वाग्‍युद्ध

हा ‘राडा’ होण्यास निमित्त होते ते मुंबईपासून दीड हजार किलोमीटरवर असलेल्या अयोध्येतील राम मंदिराचे! खरे तर हे मंदिर हा भाजपपेक्षा काकणभर अधिकच प्रतिष्ठेचा मुद्दा १९८० आणि ९० या दशकांत शिवसेनेने केला होता. बाबरी मशीद जमीनदोस्त झाल्यावर त्याचे ‘श्रेय’ वा ‘अपश्रेय’ घेण्यास भाजप नेते कचरू लागले, तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी ‘होय! बाबरी शिवसैनिकांनीच पाडली!’ असे जाज्ज्वल्य उद्‍गारही काढले होते. मात्र, याच मंदिराच्या भूखंड व्यवहारात गैरव्यवहार तसेच आर्थिक गफलती झाल्याचे आरोप झाले आणि शिवसेनेच्या मुखपत्रातून बुधवारी या कथित गैरव्यवहारावर अत्यंत तिखट टीका झाल्यावर मग भाजपच्या नाकाला मिरच्या झोंबल्या. त्यातूनच ‘शिवसेना भवन’वर मोर्चा नेण्याचा निर्णय मुंबई भाजप युवा मोर्चाने घेतला. मग, शिवसैनिक आपल्या या ‘श्रद्धास्थाना’च्या रक्षणासाठी पुढे सरसावणे, हेही अपेक्षितच होते. त्यातही भाजप कार्यकर्त्याच्या हातातील ‘सोनिया सेना’ असा उल्लेख असणारे फलक आणि शिवसेनेच्या मुखपत्राचे नाव ‘बाबरनामा’ करा, अशा भाजपच्या मागण्या, यामुळे शिवसैनिकांना इंगळ्या डसल्या. मग बघता बघता दादरमधील या भागाला रणमैदानाचे स्वरूप आले. ही हाणामारी नियंत्रणात आणताना खरी कसोटी लागली ती नेहमीप्रमाणे पोलिसांचीच. मात्र परिस्थिती आटोक्यात आल्यानंतरही दोन्ही बाजूच्या वाचाळवीरांचे वाग्‍युद्ध सुरूच राहिले. एकमेकांना धमक्या दिल्या गेल्या. ‘दिल्लीचे भाजप मुख्यालय उद्‍ध्वस्त करू’ अशी धमकी देण्यापर्यंत मजल गेली.

अर्थात शिवसेनेची वाढ ही अशा प्रकारच्या आक्रमक तसेच राडेबाज आंदोलनांतून झाली आहे. मात्र, ३५-४० हजार कोटींचा अर्थसंकल्प असलेली मुंबई महापालिका ताब्यात घेऊन शिवसेनेचे पंख कापण्यास कमालीचा उतावीळ झालेला भाजपही आता तोच मार्ग स्वीकारत असेल, तर भविष्यात काय वाढून ठेवले आहे, असाच प्रश्न कोणाच्याही मनात आल्याशिवाय राहणार नाही. या सगळ्यातून आपल्या खालावलेल्या राजकीय संस्कृतीचे दर्शन घडत आहे. राम मंदिराच्या भूखंडाबाबत काही आरोप झाले असतील, तर त्यांचे निराकरण हे प्रशासकीय तसेच न्यायालयीन पातळीवरून करता येऊ शकते. पक्षीय संघर्षासाठी निवडणुकांचे ‘मैदान’ आहेच. हे सगळे मार्ग उपलब्ध असतानाही जर कार्यकर्ते हमरीतुमरीवर येत असतील तर कसल्या प्रकारचे राजकीय शिक्षण त्यांना दिले जाते, असाही प्रश्न निर्माण होतो. राजकीय प्रक्रिया ही अहिंसक असली पाहिजे, हेच तर या लोकशाही व्यवस्थेचे वैशिष्ट्य असते. पण, संस्कृतीचा उठताबसता जप करणारे आणि ‘रामराज्या’ची भाषा करणारे पक्ष प्रत्यक्षात सगळ्या जनतेला हिंस्रतेचे दर्शन घडविणार असतील, तर ती चिंतेची बाब ठरते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com