अग्रलेख : पंजाबचे ‘प्रकाश’पर्व

भक्कम जनाधार असलेले, जनतेची नस पुरती ओळखणारे आणि त्याचा कल लक्षात घेऊन राजकारण करणारे जे मोजके नेते देशात आहेत, त्यात शिरोमणी अकाली दलाचे नेते प्रकाशसिंग बादल यांचे नाव अग्रक्रमाने घेता येईल.
parkash singh badal
parkash singh badalsakal
Summary

भक्कम जनाधार असलेले, जनतेची नस पुरती ओळखणारे आणि त्याचा कल लक्षात घेऊन राजकारण करणारे जे मोजके नेते देशात आहेत, त्यात शिरोमणी अकाली दलाचे नेते प्रकाशसिंग बादल यांचे नाव अग्रक्रमाने घेता येईल.

प्रकाशसिंग बादल यांचे राजकारण सातत्याने बेरजेचे राहिले. दीर्घकाळ त्यांनी राज्याचे समर्थपणे नेतृत्व केले.

भक्कम जनाधार असलेले, जनतेची नस पुरती ओळखणारे आणि त्याचा कल लक्षात घेऊन राजकारण करणारे जे मोजके नेते देशात आहेत, त्यात शिरोमणी अकाली दलाचे नेते प्रकाशसिंग बादल यांचे नाव अग्रक्रमाने घेता येईल.

शेवटच्या श्‍वासापर्यंत जनसंपर्क असलेले, चोवीस तास राजकारण करणारे बादल अंथरुणाला खिळले होते, तेव्हाही त्यांनी कार्यकर्त्यांना पोटनिवडणुकीवर लक्ष द्या, असा सल्ला दिला होता. सात दशके राजकारण करणे आणि बदलत्या पिढीच्या आशा-आकांक्षा लक्षात घेत राजकारणाचा पोत बदलणे याची किमया बादल यांनी साधली होती. शेती, वस्तुनिर्माण उद्योग, सेवाक्षेत्र या सर्वच बाबतीत राज्याला पुढे नेणे ही कामगिरी लक्षणीय आहे. ग्रामीण भागात मुळे रुजलेली असली तरी शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांतील विकासाकडे बादल यांचे लक्ष होते. त्यांचे राजकारण कधीही कालबाह्य झाले नाही. पुत्र सुखबिरसिंग यांच्याकडे पक्षाची धुरा गेली तरी निवडणुकीची रणनीती तेच ठरवत होते.

हरचंदसिंग लोंगोवाल, गुरूचरणसिंग तोहरा, जगदेवसिंग तलवंडी, सुरजितसिंग बर्नाला अशा दिग्गजांचे नेतृत्व पंजाबला लाभले. त्यांच्यात बादल हे आपल्या वैशिष्ट्यांमुळे नेहेमी अग्रस्थानी राहिले. या राज्यात राजकारण करताना धर्म आणि राजकीय ध्येयधोरणे यातील सीमारेषा फारच धूसर आहे, या वास्तवाचे भान ठेवावे लागते. ते अर्थातच बादल यांना होते. शिरोमणी अकाली दल पंजाबात आपले वर्चस्व राखून आहे. तथापि, गेल्या दोन विधानसभा निवडणुकांत, २०१७ मध्ये पंधरा आणि २०२२ मध्ये केवळ तीनच जागा शिरोमणी अकाली दलाला मिळाल्या आहेत. यावरून पक्षाचा अस्तित्वासाठी संघर्ष सुरू असल्याचे लक्षात येते. पंजाब विधानसभेचे दहावेळा आमदार, पाच वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या प्रकाशसिंग बादल यांचे राजकारण सातत्याने बेरजेचे राहिले. पंजाबातील शांतता असो; नाहीतर दहशतवादी कारवायांनी निघणारा धूर या दोन्हीही काळात बादल यांनी जे मध्यममार्गी धोरण स्वीकारले ते खरे तर राज्याच्या आणि देशाच्याही हिताचे होते. दुर्दैवाने पुढे त्या मार्गावर त्यांना ठाम राहता आले नाही.

बादल यांच्या कार्याची २०१५मध्ये पद्मविभूषण देऊन दखल घेण्यात आली होती. मात्र शेतकरी आंदोलनाच्यावेळी शेतकऱ्यांशी बांधीलकी दाखवत बादल यांनी तो परतही केला होता. काँग्रेसमधून राजकारण सुरू केलेल्या बादल यांनी मोरारजी देसाईंच्या मंत्रिमंडळातही पद भूषवले होते. नंतर पंजाबात भाजप आणि शिरोमणी अकाली दल यांची महाराष्ट्रातील शिवसेनेइतकी घट्ट युती होती. सत्तेची फळेही उभयतांनी चाखली. भाजपशी युतीबाबत येणाऱ्या पक्षांतर्गत तक्रारी बादल कुशलतेने हाताळायचे. दहशतवाद्यांच्या कारवायांनी पंजाब त्रस्त असताना ऑपरेशन ब्लू स्टार झाले. त्यानंतर १९८४ मध्ये शिखांचे शिरकाण घडले. अशा घटनांवेळी बादल मध्यममार्गापासून काहीसे ढळले होते.

हिंदू-शीख सौहार्दाचे कट्टर पुरस्कर्ते असतानाही त्यांनी राज्यातील अन्य नेत्यांप्रमाणे बोटचेपी आणि नमतेपणाची भूमिका घेतली होती. त्यांनी शीख जवानांना बंडाचे आवाहन केले होते. त्याबद्दल त्यांना तुरुंगवासही झाला होता. पंजाब प्रश्‍नात संयुक्त राष्ट्रांच्या हस्तक्षेपाची आणि पंजाबींना स्वयंनिर्णयाची मागणीही त्यांनी केली होती. दहशतवादी जर्नेलसिंग भिंद्रनवालेसह अन्य दहशतवाद्यांचे स्मारक उभारण्याचेही प्रयत्न त्यांनी केले. डेरा सच्चा सौदाच्या रामरहिमबाबतही त्यांनी बोटचेपे धोरण स्वीकारले. त्याची किंमतही त्यांना मोजावी लागली. बादल यांच्या राजकारणाला या सगळ्या घटनांमुळे गालबोट लागले होते.

राजकारण आणि धर्म यांची सरमिसळ केली, की तो गुंता किती धोकादायक होऊ शकतो, याची जगभरात उदाहरणे आहेत. धार्मिक भावनांना आवाहन करून लोकप्रियता मिळाली तरी ते दुधारी हत्यार असते. बादल यांची वाटचाल पाहिली तर हे ठळकपणे जाणवते. खरे तर ‘मध्यममार्गी’ ही बादल यांची मूळ ओळख होती. ‘पंजाब, पंजाबी आणि पंजाबीयत’ हे त्यांचे धोरणसूत्र म्हणजे पंथिक राजकारणाकडून प्रादेशिकतेकडे जाण्याचा त्यांचा प्रयत्न होता. परंतु पुढे जसजसा कट्टरतावाद्यांचा जोर वाढत गेला, तसतसे ते सूत्र हरवत गेले. काही प्रमाणात त्यांची फरपटही झाली. अधिकाधिक कडव्या भूमिका घेतल्याशिवाय जनाधार टिकणार नाही, असे त्यांना वाटू लागले. त्यांचा हा अनुभव अशा प्रकारचे राजकारण करणाऱ्यांसाठी एक इशारा म्हणावा लागेल.

बादल यांनी पक्षात स्वतःचा आणि कुटुंबियांचा वरचष्मा राहील, हे पाहिले. पंजाबच्या राजकारणातील ‘बादल’ नावाचा ब्रँड निर्माण करत असताना अप्रत्यक्षरीत्या त्यांनी अकाली दलात घराणेशाहीचे राजकारण प्रस्थापित केले. ज्येष्ठ कार्यकर्ते त्यांच्यापासून दुरावले. संसदेने किमान आधारभूत किंमतीसह तीन शेतकरी आणि बाजारविषयक कायदे केल्यानंतर बादल यांचा पंजाबातील जनाधार तुटू लागल्याचे स्पष्ट झाले होते. तो टिकवण्यासाठी मोदींना त्यांनी कायदा मागे घेण्याचे आवाहन करूनही उपयोग न झाल्याने शिरोमणी अकाली दलाने भाजपशी काडीमोड घेतली. अकाली दलाच्या घसरणीमुळे निर्माण झालेली पोकळी ‘आम आदमी पक्षा’ने भरून काढल्याचे अलीकडच्या निवडणुकीत दिसले. तरीही लोकनेता ही बादल यांची प्रतिमा आणि कार्य देशवासीयांच्या कायम स्मरणात राहील, हे निश्‍चित.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com