अग्रलेख : सुरक्षेचेही राजकारण! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul Gandhi

राहुल गांधी यांची ‘भारत जोडो यात्रा’ नऊ दिवसांच्या विरामानंतर देशाच्या राजधानीतून पंजाबमार्गे काश्मीरच्या दिशेने कूच करणार असतानाच, राहुल यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

अग्रलेख : सुरक्षेचेही राजकारण!

राहुल गांधी यांची ‘भारत जोडो यात्रा’ नऊ दिवसांच्या विरामानंतर देशाच्या राजधानीतून पंजाबमार्गे काश्मीरच्या दिशेने कूच करणार असतानाच, राहुल यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पंजाब तसेच काश्मीर ही दोन्ही अत्यंत संवेदनशील राज्ये म्हणून ओळखली जातात. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या अखत्यारीतील सुरक्षा यंत्रणांच्या दिल्लीत ही यात्रा आली, तेव्हाच्या गृहखात्याच्या वर्तनाबद्दल काँग्रेसने चिंता व्यक्त केली आणि हा विषय चर्चेत आला. खरे तर दिल्लीत यात्रा प्रवेशण्यापूर्वीच कोरोनाच्या वाढत्या सावटाचा विषय भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी उपस्थित करून, ‘यात्रेकरूं’नी निर्बंध न पाळल्यास ती रोखण्याचा गर्भित इशारा दिला होता. या यात्रेने राजधानीत प्रवेश केला तेव्हा भरभरून प्रतिसाद मिळाला. दिल्लीतील सातही खासदार भाजपचे आहेत.

नुकत्याच झालेल्या दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचे झालेले ‘पानिपत’ या पार्श्वभूमीवरचा हा प्रतिसाद अचंबित करणारा होता. मात्र, त्यानंतर काँग्रेसने दिल्लीत राहुल यांच्या सुरक्षेबाबत केंद्रीय यंत्रणांनी दाखवलेल्या बेफिकिरीबद्दल थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून चिंता व्यक्त केली. केंद्र सरकाराच्या अखत्यारीतील दिल्ली पोलिस तर निव्वळ बघ्याच्या भमिकेत होते, असेही पत्रात नमूद केले आहे. काँग्रेसच्या या पत्रास अवघ्या २४ तासांत केंद्रीय राखीव पोलिस दलाने उत्तर दिले आहे. खुद्द राहुल गांधी हेच सुरक्षाविषयक नियमांचा भंग करत असल्याचा त्यांचा प्रत्यारोप आहे. या आरोपास बळकटीसाठी गेल्या दोन वर्षांत राहुल यांनी किती वेळा सुरक्षाविषयक नियमांचे उल्लंघन केले, त्याची आकडेवारीही दिली आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या या खेळामुळे भारत जोडो यात्रेबद्दल वेगळेच प्रश्न सामोरे आले आहेत, त्याचाही गांभीर्याने विचार करायला लागतो.

गेल्या सात सप्टेंबर रोजी देशाच्या दक्षिण टोकावरील कन्याकुमारी येथून प्रस्थान ठेवलेल्या या यात्रेने आतापावेतो २८०० किलोमीटर अंतर कापून, राजधानीत विराम घेतला आहे. यात्रेच्या सुरुवातीच्या काळातला प्रतिसाद बघून, देशाच्या राजकारणाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न यात्रेद्वारे होत असल्याचे दिसू लागले होते. तेव्हा भाजपचे काही भक्तगण समाजमाध्यमांवरून यात्रेची खिल्ली उडवण्यात दंग होते; तर बडे नेते गुजरात तसेच हिमाचल प्रदेश यांच्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात दंग होते. यात्रेबद्दल प्रचारातही त्यांनी ‘मौनराग’ आळवला होता. दक्षिणेकडील राज्यांत भाजपला फारसे स्थान नाही हे खरेच; मात्र आजमितीला काँग्रेसही बलवान नाही. या पार्श्वभूमीवर कर्नाटक या भाजपची सत्ता असलेल्या राज्यातच यात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला. तेव्हापासून यात्रेविषयीचे भाजपचे आकलन बदलू लागले, असे म्हणावे लागते. आता ही यात्रा पंजाबमार्गे काश्मिरात प्रवेशण्यापूर्वी उत्तर प्रदेशच्या काही भागांतून जाणार आहे.

तेथील प्रमुख विरोधी नेते, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव तसेच अन्य काहींनी यात्रेकडे पाठ फिरवली आहे. तथापि, देशातले एकुणात चित्र पाहता सर्वसामान्य जनता आणि सामाजिक तसेच स्वयंसेवी संघटनांचे कार्यकर्ते या यात्रेत उत्स्फूर्तपणे सहभागी होतील, असा अंदाज आहे. काश्मीरात तर नॅशनल कॉन्फरन्सचे फारूक तसेच ओमर अब्दुल्ला यांच्या बरोबरच ‘पीडीपी’च्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनीही काँग्रेसच्या आमंत्रणाला मान देत, या यात्रेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. काही वर्षांपूर्वीच भाजपशी हातमिळवणी करून मुख्यमंत्री झालेल्या मेहबुबा यांची यात्रेसंबंधातील भूमिका भाजपला अस्वस्थ करून गेली असणार. ‘देशात फॅसिस्ट शक्ती थैमान घालत असताना कोणी समन्वयाची आणि सर्वसमावेशक भूमिका घेत असेल, तर त्यासोबत जायलाच हवे,’ असे मेहबूबा यांनी म्हटले आहे. त्यामुळेच या यात्रेने कोरोनाच्या सावटातून यशस्वी मार्ग काढल्यानंतर आता सुरक्षाविषयक नियमांचा राहुल गांधी स्वत:च भंग करत असल्याचे कारण सांगत, केंद्र सरकार यात्रेला रोखू तर पाहत नाही ना, असा प्रश्न आहे. याचे आणखी कारण म्हणजे काँग्रेसला काश्मिरातील वातावरण बिघडवायचे आहे, असा आरोप केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनीच केला आहे.

‘भारत जोडो यात्रा’ काश्मीरच्या दिशेने प्रयाण करणार असतानाच, जम्मूत चार दहशतवाद्यांचा खातमा करण्यात भारतीय सुरक्षा दलांना यश आले हे जवानांचे यश निश्चितच स्पृहणीय आहे. खरे तर दहशतवादी कारवाया प्रामुख्याने काश्मीर खोऱ्यात होत असतात. जम्मूत आजवर अपवादानेच अशा घटना घडल्या आहेत. हे लक्षात घेता मग नेमक्या या यात्रेच्या काश्मीर प्रवेशाच्या मुहूर्तावरच जम्मूत दहशतवाद्यांशी चकमक होणे आणि मोठा शस्त्रास्त्र साठा ताब्यात येणे, हा योगायोगच म्हणावा लागेल. एकूण सगळा घटनाक्रम पाहता या यात्रेला देशभरातून मिळणारा प्रतिसाद बघून भाजप नेते हादरून तर गेले नाहीत ना, असा प्रश्नही केंद्र सरकार या यात्रेसंबंधात घेत असलेल्या भूमिकेमुळे निर्माण झाला आहे. अर्थात, याचे उत्तर काळच देईल.