अग्रलेख : क्षेपणास्त्रे आणि शब्दास्त्रे

कोणत्याही युद्धात गुंतलेल्या दोन्हीही छावण्या ज्याप्रमाणे एकमेकांच्या विरोधात वेगवेगळ्या प्रत्यक्ष शस्त्रास्त्रांचा वापर करीत असतात, त्याचप्रमाणे आणखी एका अस्त्राचा वापर करीत असतात.
Joe-Biden
Joe-Bidensakal
Summary

कोणत्याही युद्धात गुंतलेल्या दोन्हीही छावण्या ज्याप्रमाणे एकमेकांच्या विरोधात वेगवेगळ्या प्रत्यक्ष शस्त्रास्त्रांचा वापर करीत असतात, त्याचप्रमाणे आणखी एका अस्त्राचा वापर करीत असतात.

कोणत्याही युद्धात गुंतलेल्या दोन्हीही छावण्या ज्याप्रमाणे एकमेकांच्या विरोधात वेगवेगळ्या प्रत्यक्ष शस्त्रास्त्रांचा वापर करीत असतात, त्याचप्रमाणे आणखी एका अस्त्राचा वापर करीत असतात. ते म्हणजे अर्थातच वाणीचे अस्त्र. याचे कारण प्रत्यक्ष युद्धाइतकेच महत्त्व असते, ते माहितीयुद्धाला. आधुनिक काळातही माणसांची, समाजांची आणि राष्ट्रांची युद्धखोर प्रवृत्ती पूर्णपणे नष्ट झालेली नसली तरी आपल्या धोरणांना, कृतींना काही ना काही तात्त्विक मुलामा देण्याचा खटाटोप त्यांच्याकडून हमखास केला जातो. केवळ प्रतिपक्षाच्या हेकेखोरपणामुळे हिंसा, रक्तपात आणि विध्वंस होत आहे, असा दावा दोन्हीकडून केला जातो. रशिया-युक्रेन संघर्षही त्याला अपवाद नाही. मुळात राजनैतिक पातळीवरील संवाद नेहेमीच्या सामान्य परिस्थितीतदेखील खूप सावधपणे केला जाते; करावा लागतो. युद्धासारखी घटना घडत असेल तर ही काटाकाळजी आणखीनच वाढते. एखादा चुकून सुटलेला वाक्बाण आपल्याच छावणीचे नुकसान करू शकतो अन् अप्रत्यक्षपणे शत्रूचा फायदा.

रशियाने युक्रेनवर हल्ला सुरू केला, त्याला एक महिना उलटून गेला; परंतु अद्याप त्यात कोणताही खंड नाही. युक्रेनच्या बचावासाठी अमेरिका आणि नाटो सैन्य प्रत्यक्षात उतरले नाही त्यामुळे ही युक्रेनची एकाकी लढाई ठरल्याचे चित्र सुरुवातीला निर्माण झाले. अमेरिकेची नेमकी व्यूहनीती काय, असा प्रश्न निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी पोलंडमध्ये येऊन युद्धग्रस्त निर्वासितांसमोर भाषण करणे ही निश्चितच एक महत्त्वाची कृती. परंतु तेथील भाषणात बायडेन यांनी पुतीन यांना वैयक्तिकरीत्या लक्ष्य केले. ‘पुतीन हे कसायासारखे माणसांना मारत सुटले आहेत’ असा शाब्दिक हल्ला त्यांनी चढवला. पुतीन यांची हुकूमशाही वृत्ती, त्यांची युद्धखोरी, बेदरकार वृत्ती वगैरे अनेक गोष्टींबद्दल चर्चा होऊ शकते आणि ती पूर्णपणे खोटी आहे, असेही मानण्याचे कारण नाही. परंतु व्यूहनीती म्हणून पुतीन यांना लक्ष्य करण्याचा अमेरिकेचे अध्यक्ष प्रयत्न करीत असतील तर ती त्यांच्यावरच उलटू शकते.

आंतरराष्ट्रीय राजकारणात गेल्या काही दशकांत अमेरिकेने जगात ज्या पद्धतीने आपले वर्चस्व प्रस्थापित केले, त्यात आपल्या कह्यात राहणारे सत्ताधीश त्या त्या देशांत आणणे हे एक धोरण असायचे. अनेक प्रकारच्या क्लृप्त्या, कारस्थाने करून आपल्याला अनुकूल असा सत्ताबदल त्या त्या देशांत घडवायचा, अशा प्रकारचे डावपेच या महासत्तेने केले आहेत. मुळातच अस्थिरता, असंतोष आणि विस्कळितपणा असलेल्या देशांत ते साध्यही व्हायचे. पण असे डावपेच रशियासारख्या तुलनेने प्रगत आणि राष्ट्रवादाची भावना बळकट असलेल्या देशात यशस्वी होतील, असे मानणे फारच धाडसाचे ठरेल. त्यामुळेच बायडेन यांच्या तोंडून सुटलेल्या वाक्बाणांचा खुलासा करण्याची वेळ ‘व्हाइट हाऊस’वर आली. रशियामधील विद्यमान सत्ता हटविण्याची म्हणजेच सत्तांतर घडविण्याची अमेरिकेची कोणतीही योजना नाही, असे स्पष्टीकरण लगेचच देण्यात आले. पुतीन यांच्याविषयी रशियात असंतोष असेलही;पण जेव्हा एखादी बाहेरची सत्ता त्यांना लक्ष्य करू पाहात आहे, असे दिसते, तेव्हा त्याची प्रतिक्रिया वेगळी उमटते. देशाची फळी अधिक एकसंध बनते.

बायडेन यांच्या बाबतीत अशी चूक पहिल्यांदाच घडते आहे, असे नाही. रशियाचा हल्ल्याबद्दल निषेध करणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीतील ठरावावर भारताने तटस्थ भूमिका घेतली. एकूणच भारताच्या या संदर्भातील भूमिकेविषयी बायडेन यांनी केलेले विधान असेच त्यांच्या अंगाशी आले. भारताची भूमिका डळमळीत असल्याचे सांगत त्यांनी नापसंती व्यक्त केली. पण नंतर अमेरिकी परराष्ट्र खात्याला सारवासारव करावी लागली आणि भारतासारख्या देशांना आपले जुने संबंध एकदम तोडणे शक्य नाही, हे आम्ही समजू शकतो, असे विधान उपपरराष्ट्रमंत्र्यांनी केली. रशिया-युक्रेन संघर्षाच्या निमित्ताने सुरू झालेल्या ‘कथन’युद्धात पुतीनही मागे नाहीत, हे ओघानेच आले. आपल्या हल्ल्याच्या कृतीला समर्थन मिळवून देण्यासाठी त्यांचा आटापिटा सुरू आहे. युक्रेनला ‘नाझीमुक्त’ करण्याचा विडा उचलला असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. दुसऱ्या महायुद्धाची होरपळ, त्यात ज्यू समाजाचा झालेला भीषण नरसंहार यामुळे नाझी आणि नाझीवाद याविषयी युरोपातच नव्हे तर जगात कमालीचा तिटकारा निर्माण झाला आहे आणि हे स्वाभाविक आहे. परंतु या जनभावनेचा उपयोग आपल्या आक्रमणासाठी करण्यातील पुतीन यांचा धूर्तपणा लपून राहात नाही. खुद्द युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की हे ज्यू आहेत आणि त्यांच्या वाडवडिलांना नाझींकडून झालेले अत्याचार सहन करावे लागले होते. तेव्हा पुतीन यांची ही शेरेबाजी किती विपर्यस्त आहे, हे वेगळे सांगायला नको. असे म्हणतात की युद्ध भडकले की पहिला बळी जातो, तो सत्याचा. त्याची प्रचिती युक्रेनच्या विरोधात रशियाने आरंभलेल्या युद्धाने हरघडी येत आहे. संघर्ष जसा चिघळत आहे, तशी या प्रकारच्या बळींची संख्याही वाढत आहे.

हिंसाचार खोटेपणाच्या आवरणाखाली दडवला जाऊ शकतो आणि खोटेपणा उघड होऊ नये म्हणूनही हिंसेचा वापर केला जातो.

- अलेक्झांडर सोल्झेनित्सिन, साहित्यिक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com