अग्रलेख : रस्त्यावरचे घातचक्र

उद्योगजगतात आपल्या शैलीची छाप उमटवणारे आणि मोठ्या अपेक्षा निर्माण करणारे सायरस मिस्त्री यांचे अपघाती निधन ही केवळ या क्षेत्राचीच नव्हे तर देशाचीच हानी म्हणावी लागेल.
sayras mistri
sayras mistrisakal
Summary

उद्योगजगतात आपल्या शैलीची छाप उमटवणारे आणि मोठ्या अपेक्षा निर्माण करणारे सायरस मिस्त्री यांचे अपघाती निधन ही केवळ या क्षेत्राचीच नव्हे तर देशाचीच हानी म्हणावी लागेल.

उद्योगजगतात आपल्या शैलीची छाप उमटवणारे आणि मोठ्या अपेक्षा निर्माण करणारे सायरस मिस्त्री यांचे अपघाती निधन ही केवळ या क्षेत्राचीच नव्हे तर देशाचीच हानी म्हणावी लागेल. दहा वर्षांपूर्वी ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांनी टाटा समुहाची धुरा कोणाकडे सोपवावी, यासाठी राबवलेल्या आणि बराच काळ चाललेल्या शोधप्रक्रियेतून एकमताने जे नाव पुढे आले, ते सायरस मिस्त्री यांचे होते. त्यांच्या उद्योजकीय क्षमतेची कल्पना येण्यासाठी एवढी एक बाबही पुरेशी आहे. खरे तर ते मितभाषी. मुलाखती देऊन आर्थिक-औद्योगिक विषयांवर मतप्रदर्शन करीत राहण्याची त्यांना आवड नव्हती. शापूरजी पालनजी समुहातील बांधकाम व रिअल इस्टेट उद्योगाचा कारभार निष्ठेने सांभाळणारे प्रांजळ वारसदार अशी त्यांची ओळख.

पण २०१२ मध्ये ‘टाटा सन्स’चे अध्यक्ष झाल्यानंतर ते साहजिकच प्रकाशझोतात आले. देशाच्या उभारणीशी ज्या उद्योगाचे नाव अभिन्नपणे जोडले गेले आहे, अशा या औद्योगिक साम्राज्याचे प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळताना कार्यशैलीतील अनेक बदलांना त्यांनी हात घातला. समुहात वेगवेगळ्या पातळ्यांवर काम करणाऱ्यांशी व्यापक संपर्क-संवाद साधायला त्यांनी सुरवात केली. पण चार वर्षांतच त्यांचे रतन टाटांशी खटके उडू लागले. सायरस मिस्त्री यांच्या उद्योजकीय क्षमतेबाबत शंका नसली तरी शेवटी व्यवस्थापन कौशल्यालाही प्रबळ असे मानवी भावभावनांचे एक अंग असते. त्यातून संघर्षाला तोंड फुटू शकते. असेच काही येथे घडले असावे. टाटा समूह हा प्रामुख्याने कुटुंबामार्फत चालवला जाणारा उद्योग.

पण अनेक बाहेरच्या तज्ज्ञांना पाचारण करून त्यात व्यावसायिक गुणवत्ता व कौशल्य याला सर्वोच्च प्राधान्य दिले गेले. जेआरडी टाटांच्यानंतर रतन टाटांचेही धोरण तसेच राहिले. किंबहुना त्यामुळेच हा उद्योग बहरला. परिवारातील एक घटक असणे आणि व्यावसायिक कौशल्य बाळगणे या दोन्ही बाबतीत सायरस मिस्त्री नव्या भूमिकेत अगदी चपखल बसत होते. प्रश्न आला असू शकतो तो ‘टाटा व्हॅल्यूज’च्या बाबतीत. त्या चौकटीशी त्यांचे कदाचित जुळले नसावे. त्यांना चार वर्षांत पदावरून तर दूर व्हावे लागलेच; परंतु त्यानंतर झालेल्या कोर्टबाजीने ते आणि रतन टाटा यांच्यातील मतभेदांना कटूतेची धार येणे स्वाभाविक होते. थोडक्यात त्यांची नेमणूक आणि त्यांचे बाहेर पडणे या दोन्ही घटना केवळ या उद्योगांतच नव्हे तर देशांतच चर्चेच्या बनल्या आणि उद्योगक्षेत्रातील व्यवस्थापनाच्या संदर्भात काही धडे देऊन गेल्या. शापूरजी पालनजी समुहदेखील संक्रमणावस्थेतून जात आहे. व्यावसायिक आव्हाने आणि ताणतणाव आहेत; त्यातून समुहाला बाहेर काढण्यात अलीकडे मिस्त्री यांना बऱ्यापैकी यश आले होते. झपाट्याने बदलणाऱ्या जागतिक परिस्थितीने पुढ्यात आणलेल्या अनेक संधी भारतातील उद्योजकतेला साद घालत आहेत. अशा परिस्थितीत सायरस मिस्त्रींसारख्या एका उमद्या उद्योगपतीचे आणि त्यांच्याबरोबरच त्यांचे मित्र व उद्योजक जहांगीर पंडोल यांचे अचानक आपल्यातून जाणे कमालीचे वेदनादायक आहे.

देशातील रस्ते अपघातबळींच्या संख्येचे आकडे नित्यनेमाने वाढत असल्याचे वेगवेगळे अहवाल प्रसिद्ध होत असले तरी आपल्याकडे ‘कानठळ्या बसविणाऱ्या शांतते’चा भंग होत नाही. २०२१ मध्ये देशातील दीड लाख लोक रस्ता अपघातात गेल्याचे ‘एनसीआरबी’च्या अहवालात म्हटले आहे. अपघातात गेलेल्या व्यक्तीविषयी तात्कालिक अश्रुपात, श्रद्धांजली, चौकशी समितीच्या नियुक्त्या हे उपचार आणि सोपस्कार पार पडतात. पण त्या पलीकडे व्यवस्थात्मक सुधारणा नावाची गोष्ट दूरच राहते. मग त्या सुधारणा रस्तेबांधणीच्या असोत, वा कायदेकानूंच्या अंमलबजावणीच्या असोत. मुळात या गोष्टी वेगवेगळ्या नाहीतच. खरे तर रस्ते आणि त्यावरील वाहतूक हा त्या त्या समाजाचा आरसाच असतो. एकूण समाजात बजबजपुरी, विस्कळितपणा असेल तर रस्त्यावर अचानक शिस्तपालनाचा आदर्श कसा पाहायला मिळणार? थोडक्यात, हा विषय अत्यंत महत्त्वाचा असूनही तिकडे संवेदनशीलतेने पुरेसे लक्ष दिले जात आहे, असे दिसत नाही.

अपघात प्रतिबंधासाठी केलेल्या उपाययोजनांना ग्लॅमर नसणे हे तर याचे कारण नाही ना? पण हे दुर्लक्ष फार काळ परवडणारे नाही. अपघातांमध्ये होणारी मनुष्यहानी हे देशाचे सर्वार्थाने फार मोठे नुकसान असते. परदेशात तयार झालेल्या मोटारी या तिथले रस्ते, तिथली वाहतूक संस्कृती यांना अनुसरून तयार केलेल्या असतात. त्या इथे वापरताना कमालीची काळजी घ्यावी लागतेच. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचा प्रश्न आहे तो ती संस्कृती आपल्याकडे का तयार होत नाही हा! पालघरजवळ झालेल्या अपघातात मागे बसलेल्या दोघांनी सीट बेल्ट लावले नव्हते, असे पोलिसांनी म्हटले आहे. तसे ते नसल्याने एअरबॅग उघडल्या नाहीत, त्यामुळे हे दोघे वाचण्याची शक्यता नष्ट झाली. गाडीचा वेगही इतका होता, की तो आटोक्यात आला नाही. अलीकडे पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर विनायक मेटे यांच्या मोटारीला झालेला अपघात अशाच स्वरुपाचा होता. वाहनचालकांच्या प्रशिक्षणापासून सुरक्षित रस्त्यांच्या आराखड्यांपर्यंत आणि परवाना वितरणाच्या काटेकोर कार्यपद्धतीपासून ते वाहतूक नियमन अद्ययावत करण्यापर्यंत सर्वांगीण सुधारणांची खरे तर देशाला गरज आहे. महासत्ता होण्यासाठी या गोष्टीही आवश्यक असतात, याचे भान सर्वांनीच राखलेले बरे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com