अग्रलेख : हाक सावधगिरीची

उत्पन्नाचे स्रोत आणि गुंतवणुकीचे स्रोत यांत फरक असतो. याची गल्लत केली तर आपली स्वप्ने पूर्ण होणे तर दूरच; परंतु जे आपण कष्टाने कमावलेले आहे, तेही धुळीस मिळण्याचा धोका असतो.
Share Market
Share MarketSakal
Summary

उत्पन्नाचे स्रोत आणि गुंतवणुकीचे स्रोत यांत फरक असतो. याची गल्लत केली तर आपली स्वप्ने पूर्ण होणे तर दूरच; परंतु जे आपण कष्टाने कमावलेले आहे, तेही धुळीस मिळण्याचा धोका असतो.

उत्पन्नाचे स्रोत आणि गुंतवणुकीचे स्रोत यांत फरक असतो. याची गल्लत केली तर आपली स्वप्ने पूर्ण होणे तर दूरच; परंतु जे आपण कष्टाने कमावलेले आहे, तेही धुळीस मिळण्याचा धोका असतो. समाजातील अनेक घटकांना याविषयी सावध करण्याची वेळ आली आहे. आर्थिक साक्षरता आपल्याकडे बेतास बात असल्याने शेअर बाजारातून आपल्याला झटपट श्रीमंत होता येईल, असे अनेकांना वाटू लागले आहे. या क्षेत्राचा पूर्ण अभ्यास करून आणि त्यातून मिळणाऱ्या परताव्याविषयी योग्य तो दृष्टिकोन असेल, तर या बाजारात प्रवेश करण्यास काहीच हरकत नाही. पण या गुंतवणुकीत संयम महत्त्वाचा असतो आणि आपल्या गुंतवणुकीतून परतावा मिळण्यासाठी थांबण्याची तयारी असावी लागते, हे विसरून जे या बाजारामागे बेभान धावत सुटतात, त्यांना पुढच्या धोक्याची जाणीव करून देणे आवश्यक आहे. कोविडच्या काळात ठाणबंदीमुळे अनेकांना घरात बसावे लागले. त्यापैकी काहींना ‘घरबसल्या कमवा लाखो रुपये’ यांसारख्या जाहिरातींची भुरळ पडायला लागली. ‘झिरो ब्रोकरेज’च्या आमिषाला अनेक व्यक्ती बळी पडल्या. पैसे टाकायचे आणि काही दिवसांतच दामदुपट मिळवायचे, अशा भाबड्या कल्पना घेऊन काही जण या बाजारात उतरले.

गेल्या काही दिवसांत या बाजारात तेजीची जी झगमगाटी दिवाळी सुरू आहे, त्यामुळे या प्रकारच्या उत्साहाला आणखीनच ऊत आला. आपली अर्थव्यवस्था आता जगाशी बऱ्याच प्रमाणात जोडली गेली आहे. भारतातीलच नव्हे तर जगातील घटनांचा परिणाम शेअर बाजारावर होत असतो. अमेरिकेतील व्याजदर कमी असल्याने जो गुंतवणूकदार वर्ग भारतातील भांडवली बाजारात गुंतवणूक करतो, त्याचा तेजीत महत्त्वाचा वाटा असतो. तो टेकू जरा जरी ढिला पडला तरी इकडे हलकल्लोळ होऊ शकतो. अमेरिकेतही आता महागाईचा प्रश्न तीव्र होत असल्याने त्या देशाचे सरकारही आता चलनविषयक धोरण कठोर करण्याची शक्यता आहे. तसे झाले तर तिकडचे व्याजदर वाढतील. जर तेथेच चांगला परतावा मिळतोय असे लक्षात आले, तर भारतातील गुंतवणूक कमी होऊ शकते. अर्थात, सावधानतेचा बावटा दाखविण्यासाठी तेवढेच एक कारण आहे, असे नाही. भारतातही शेअर बाजारातील तेजीची मुळातली कारणे तपासायला हवीत.

वेगवेगळ्या कारणांनी आणि विशेषतः कोविडमुळे लागू कराव्या लागलेल्या ठाणबंदीमुळे आर्थिक विकासाच्या गाड्याला खीळ बसली. त्याला त्या अवस्थेतून बाहेर काढून गती द्यायची असेल तर पैसा खेळता रहायला हवा. त्यातून नवे उद्योग उभे राहावेत. जेणेकरून एकीकडे रोजगार वाढेल आणि क्रयशक्ती सुधारल्याने मागणीलाही उठाव येईल. या साखळी परिणामातून अर्थव्यवस्थेला बळ मिळेल, असा विचार करूनच रिझर्व्ह बॅंकेने चलनविषयक धोरण सैल, उदार ठेवले आहे. पण त्या मूळ हेतूच्या दिशेने काही होते आहे का, की हा सगळा पैसा शेअर बाजाराकडे वळतो आहे, याचा आढावा घ्यायला हवा. रोखतेच्या पुरवठ्यावर अंकुश आला तर सध्याचा शेअर बाजाराचा झोका खाली येईल. या करेक्शनला तोंड देण्याची, त्यातही तगून राहण्याची तयारी आहे का, हे पाहायला हवे. हे सगळे बदलून मोठे करेक्शन येऊ शकते. त्याची कल्पना नसलेल्यांवर अक्षरशः गटांगळ्या खाण्याची वेळ येऊ शकते. क्रिप्टो करन्सीच्या बाबतीतही अनेकांनी झटपट श्रीमंत होण्याच्या इच्छेने पैसे गुंतवून हात भाजून घेतले.

अर्थव्यवस्था आमूलाग्र बदलत असताना या स्थित्यंतराच्या काळात बचत आणि गुंतवणुकीच्या पारंपरिक मार्गांतच अडकून पडणे योग्य नाही. थोडा धोका पत्करून अधिक परतावा मिळविण्याची आकांक्षा योग्यच आहे. सावधगिरी बाळगा याचा अर्थ या पर्यायावर फुली मारा, असा नसून डोळसपणे या क्षेत्राकडे पाहा, असा त्याचा अर्थ आहे. सुदैवाने या शेअर बाजाराचे नियमन आपल्याकडे चांगल्या रीतीने होते. ‘सिक्युरिटी एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया’ (सेबी) यासारख्या यंत्रणांमुळे काही मूठभर लोकांना बाजाराला आपल्याला हवे तसे वळण देण्याचा प्रयत्न करणे तितके सोपे राहिलेले नाही. त्यामुळे भांडवली बाजारात जरूर गुंतवणूक करावी, परंतु त्यातून मिळणाऱ्या परतव्याविषयीचा अंदाज वास्तवाधिष्ठित असावा. आपल्याकडची अर्थसाक्षरता यादृष्टीने वाढविण्यासाठी सरकार, स्वयंसेवी संस्था आदींनी खास प्रयत्न करण्याची गरज आहे. प्रशिक्षणाच्या सुविधा व्यापक प्रमाणात निर्माण केल्या आणि प्रसारमाध्यमांनीही लोकांना याविषयी अधिक जागरूक करण्याचा प्रयत्न केला, तर परिस्थिती बरीच सुधारू शकते. भारतीय अर्थव्यवस्थेतेचे मूळ घटक मजबूत आहेत, त्यात वाढीच्या सुप्त क्षमता आहेत, याविषयी दुमत होण्याचे कारण नाही. पण त्याचे परिणाम दिसायला, जाणवायला आणि शेअर बाजारात त्यांचे प्रतिबिंब पडायला अवधी लागतो. याविषयी तार्किक विचार करून भांडवली बाजारात सर्वसामान्यांनी पैसे जरूर ठेवावेत; पण ते नियमित उत्पन्नाचे साधन नाही, तर गुंतवणुकीचे आहे, याचे भान ठेवून.

अपयश म्हणजे दुसरे तिसरे काही नसून अधिक चातुर्याने प्रयत्न करण्याची नवी संधी असते.

- हेन्री फोर्ड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com