अग्रलेख : फेडररचे निरोपपत्र!

आल्प्सच्या कुशीतल्या स्वित्झर्लंडमधला एक चिमखडा बॉलबॉय अनिमिष नेत्रांनी मोठ्या लोकांचा टेनिसचा खेळ बघत राहायचा.
roger federer
roger federersakal
Summary

आल्प्सच्या कुशीतल्या स्वित्झर्लंडमधला एक चिमखडा बॉलबॉय अनिमिष नेत्रांनी मोठ्या लोकांचा टेनिसचा खेळ बघत राहायचा.

आल्प्सच्या कुशीतल्या स्वित्झर्लंडमधला एक चिमखडा बॉलबॉय अनिमिष नेत्रांनी मोठ्या लोकांचा टेनिसचा खेळ बघत राहायचा. त्याच्या डोळ्यात कसले स्वप्न साकळत होते? हाच बॉलबॉय पुढे रॉजर फेडरर नावाचे आल्प्समधल्या गिरीशिखरांच्या तोडीचे, टेनिसमधले दुर्लंघ्य शिखर बनून गेला. वयाची चाळीशी ओलांडल्यावर त्याने अखेर आपल्या हातातली रॅकेट खाली ठेवली आहे. थकलेल्या पायातले बूट काढून खुंटीला टांगले आहेत. फेडरर, राफाल नदाल आणि नोवाक जोकोविच हे टेनिसच्या नभांगणातले तीन तेजस्वी, स्वयंप्रकाशी तारे. त्यातला फेडरर हा सर्वात जुनाजाणता. गुरुवारी त्याने ट्विटर हँडलवर आपले निरोपपत्र प्रसारित केले. ‘‘माझा टेनिस परिवार आणि पलिकडल्यांनो…’ अशा मायन्याचे त्याचे पत्र वाचता वाचता जगभरातल्या टेनिस चाहत्यांचे डोळे पाणावल्याशिवाय राहिले नसतील. तब्बल दोन तपांचा एक महाचित्रपट डोळ्यांसमोरुन उलगडला गेला असेल. रॉजर फेडरर नावाची एक चालती बोलती दंतकथा आपण आपल्या आयुष्यात पाहिली, अनुभवली या भावनेनेच टेनिस चाहत्यांची हृदये ओथंबून आली असतील. या भावभावनांच्या कल्लोळाला फेडररचे कर्तृत्त्व कारणीभूत आहेच, पण त्याने लिहिलेले चार पानी निरोपाचे पत्र आणि त्यातील वेचक शब्ददेखील तितकेच परिणामकारक आहेत. जिज्ञासूंनी हे पत्र मुळातून वाचायला हवे. शाळेतल्या विद्यार्थ्यांकडून ते आवर्जून वाचून घ्यायला हवे. त्यात व्यक्त झालेली प्रामाणिक भावना, वास्तव स्वीकारण्याची तयारी, संयमी वृत्ती हे गुण ग्रहण करण्याजोगे आहेत. तो निव्वळ एक सुंदर मजकूर नव्हे, तर खरा चँपियन कसा असतो, याचे एक मनोज्ञ शब्दचित्र आहे.

वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी फेडररने २००३ मध्ये विम्बल्डन स्पर्धेचे एकेरीतले पहिले जेतेपद पटकावले, तेव्हापासून त्याचा तोफखाना धडाडत होता. तब्बल आठ विम्बल्डन जेतेपदे, सहा ऑस्ट्रेलियन जेतेपदे, पाच अमेरिकन जेतेपदे आणि एक फ्रेंच खुल्या स्पर्धेचे जेतेपद अशी वीस ग्रँड स्लॅम जेतेपदांची लयलूट त्याने केली. त्याच्या झगझगीत कारकीर्दीची गोळाबेरीज येथे देण्याची गरज नाही. ती तर जगभरातल्या टेनिस चाहत्यांना मुखोद्गत आहे. परंतु, हा एकमेवाद्वितीय असा असामान्य प्रतिभेचा विजेता घडला तरी कसा? हे जाणून घेणे येथे इष्ट ठरावे. लहान वयापासूनच टेनिसकडे वळलेल्या फेडररने त्याच्या निरोपपत्रात आपल्या जडणघडणीचे सार अवघ्या पाच-सहा ओळीत लिहिले आहे. तो लिहितो : ‘‘ एका बॉलबॉयच्या डोळ्यात स्वप्न होती, त्या स्वप्नांनीच त्याला पुढे जाण्याची प्रेरणा दिली. त्या प्रेरणेने त्याच्याकडून कष्ट करविले, आणि थोड्याशा यशाने आत्मविश्वास दिला. हे सारे मला आजच्या दिवसापर्यंत घेऊन आले आहे…’ ज्युनियर गटातून खेळताना रॉजर फेडररचे आत्मसंयम फारसे नसे. चिडचीड होई. नैराश्यदेखील येई. पण उत्तम प्रशिक्षकांच्या मदतीने फेडररने स्वत:चे व्यक्तिमत्त्व डोळसपणाने घडवले.

टेनिसच्या कोर्टात घाम गाळणे पुरेसे नाही, जगात वावरतानाही आपली प्रतिमा चांगलीच असली पाहिजे, याकडे त्याने विशेष लक्ष दिले. स्विस जर्मन, जर्मन, इटालियन, स्पॅनिश, इंग्लिश आणि फ्रेंच अशा सहा भाषा फेडरर आरामात बोलू शकतो, ते यामुळेच. त्याच्या निरोपपत्रातली परिपक्वताही त्याचे अजेय असणेच अधोरेखित करते. स्विस कायद्यानुसार जीवनातली काही वर्षे स्विस लष्करात तरुणांना काढावीच लागतात.

तशी ती फेडररनेही काढली. लष्करी शिस्तही त्याने अंगी पुरेपूर बाणवली. टेनिसमधून मिळणारा पैसा त्याने सढळ हस्ते आफ्रिकेतील भुकेल्या मुलांसाठी खर्च केला. फेडररने टेनिसच्या वर्तुळात प्रवेश केला, तेव्हा हा खेळ जुना पेहराव टाकून नव्या ‘पॉवर गेम’ साठी कात टाकत होता. बेसलाइनवरुन खेळल्या जाणाऱ्या लांबलचक कंटाळवाण्या रॅलीजपेक्षा सणसणत जाणाऱ्या बिनतोड सर्विसेस आणि फटकारे प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव चुकवू लागले. खेळात नवी ऊर्जा, नवे रंग भरले जात होते. टेनिसमध्ये चिकाटी लागतेच, पण ताकदही लावावी लागते. फेडरर दोन्ही बाबतीत सर्वोत्तम ठरला. टेनिस कोर्टातही त्याचे सभ्य वर्तन उठून दिसायचे. व्यावसायिक टेनिसपटूंच्या उत्तम वर्तणुकीसाठी स्टीफन एडबर्ग पुरस्कार दिला जातो. तो फेडररला तेरा वेळा मिळालेला आहे.

गेली काही वर्षे फेडररला दुखापतींनी ग्रासले होते. गुडघ्यावर शस्त्रक्रियाही झाल्या होत्या. तरीही तो टेनिस कोर्टात आपल्यापेक्षा बऱ्याच लहान प्रतिस्पर्धी टेनिसपटूंना भारी ठरत असे. त्याचा फिटनेस, दमसास, आणि हात-डोळ्यांचा समन्वय याचा खरे तर रीतसर अभ्यास व्हायला हवा. कुणीतरी केलाही असेल! हात- डोळ्यांचा समन्वय हा टेनिसचा प्राण. तो टिकवण्यासाठी फेडरर बास्केटबॉल आणि बॅडमिंटनही खेळत असे. ‘गेली चोवीस वर्षें मी खेळतो आहे, हा काळ चोवीस तासासारखा वाटतो आहे,’ असे आपल्या पत्रात फेडरर भावूकपणाने म्हणतो. ते किती खरे आहे! फेडरर थकला आहे, त्याची चाळीशी उलटली आहे, हे साऱ्यांनाच दिसत होते. पण त्याचा खेळ अजूनही टवटवीतच होता. ‘टेनिसने मला सर्व काही दिले.

पृथ्वीतलावरचा सर्वात भाग्यवान मीच असेन,’ असे फेडरर म्हणतो. ते मात्र तितकेसे खरे नाही. ‘आमच्या काळात रॉजर फेडररचा खेळ आम्ही पाहिला होता’ हे ‘पुढीलां’ना सांगणारी टेनिस चाहत्यांची आपली पिढी त्याच्याइतकीच भाग्यवंत म्हणावी लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com