अग्रलेख : एक धुरळा स्टोरी!

कलाक्षेत्रातील चित्रपटासारखे प्रभावी माध्यम राजकीय कारणांसाठी कसे वेठीला धरले जाते, याचे दर्शन सध्या घडते आहे. ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटावरुन सध्या देशभर जो राजकीय धुरळा उडाला आहे.
Movie
Moviesakal
Summary

कलाक्षेत्रातील चित्रपटासारखे प्रभावी माध्यम राजकीय कारणांसाठी कसे वेठीला धरले जाते, याचे दर्शन सध्या घडते आहे. ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटावरुन सध्या देशभर जो राजकीय धुरळा उडाला आहे.

कोणाच्या अभिव्यक्तीवर बंदीच्या मार्गाने गदा आणणे योग्य नाही. मात्र चित्रपटातील ज्या गोष्टी अवास्तव असतील, त्याबाबत समाजाला जागरूक करीत राहणे आवश्यक आहे.

कलाक्षेत्रातील चित्रपटासारखे प्रभावी माध्यम राजकीय कारणांसाठी कसे वेठीला धरले जाते, याचे दर्शन सध्या घडते आहे. ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटावरुन सध्या देशभर जो राजकीय धुरळा उडाला आहे, तो इतक्यात खाली बसण्याची काही चिन्हे नाहीत. गेल्या आठवड्यात रीलीज झालेल्या या वादग्रस्त चित्रपटावर पश्विम बंगालमध्ये सरसकट बंदी घालण्यात आली असून तमिळनाडूत प्रदर्शन रोखण्यात आले आहे. खुद्द केरळात या चित्रपटाच्या विरोधात चौकशी सुरु झाली आहे.

धार्मिक तेढीला कारणीभूत ठरु पाहणाऱ्या या चित्रपटावर देशातच बंदी घातली जावी, अशी मागणी न्यायालयात याचिकांद्वारे झाली आहेच. याउलट जिथे भारतीय जनता पक्षाची सरकारे आहेत, तिथे मात्र या चित्रपटाचा उदो उदो चालला असून उत्तर प्रदेशात हा चित्रपट करमुक्त करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी मंगळवारी केली. दिल्लीपासून मुंबईपर्यंत अनेक ठिकाणी हा ‘प्रत्ययकारी’ आणि ‘वास्तवाचे भान आणणारा’ चित्रपट खास खेळ लावून लोकांना फुकट दाखवण्याचे कार्यक्रम भाजपने सुरु केले आहेत. असे होणे स्वाभाविकच आहे, कारण खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच या चित्रपटाचे जाहीर कौतुक केले आहे.

या राजकीय धुरळ्यात सर्वाधिक लाभ पदरात पडला तो अर्थातच निर्मात्यांचा. अवघ्या पाच दिवसात या चित्रपटाने पन्नास कोटींचा गल्ला गोळा करुन दाखवला आहे! एकेक चित्रपट स्वत:चे नशीब घेऊन येतो, हे खरेच. केरळातील काही महिलांचे धर्मांतर करुन त्यांना ‘इसिस’ या दहशतवाद्यांच्या सेवेत कसे जुंपले जाते, याचे वास्तववादी चित्रण या चित्रपटात असल्याचा निर्मात्यांचा दावा आहे. या कथानकाला ‘लव-जिहाद’ चाही एक बदनाम कंगोरा आहे.

केरळातील हिंदू आणि ख्रिस्ती युवतींच्या वाट्याला येणारे हे भयानक जिणे कोणाच्याही हृदयाला पीळ पाडेल, यात शंका नाही. पण तसा पीळ पडण्यासाठी कथानकात काही तथ्य असणे आवश्यक असते. ‘द केरला स्टोरी’ची कलात्मक समीक्षा जशी व्हायची तशी होईल. चित्रपटाच्या निर्मितीमागचा हेतूही लक्षात घेणे कधी कधी आवश्यक ठरते. ‘द केरला स्टोरी’ च्या शीर्षकापासूनच हा हेतू उघड होतो. ज्या चित्रपटाची निर्मिती, प्रसिद्धी आणि प्रदर्शन सारेच राजकीय हेतूने प्रेरित असेल, तर त्याचा समाचारही राजकीय अंगानेच घेतला जाणार, यात शंका नाही.

‘द केरला स्टोरी’ ही केरळातील जवळपास ३२ हजार युवतींच्या वाट्याला आलेली कहाणी आहे, असे या चित्रपटाच्या टीझरमध्येच सुचवण्यात आले होते. नंतर कोर्टकज्जे झाल्यानंतर हा आकडा अवघ्या तीनवर येऊन ठेपला. त्यातल्या एकीची जरी ही खरी कहाणी असती, तरी त्यावर चित्रकथा साकारणे न्याय्य ठरले असते. रसिकांनी तो विषण्ण मनाने पाहिलाही असता. पण चित्रपटाच्या हाताळणीलाच राजकीय वास आल्याने एक महत्त्वाचा कथाविषय मारला गेला, असेच मग म्हणावे लागेल. चित्रपटाच्या शीर्षकात केलेल्या सरसकटीकरणामुळे देशातील एका प्रगत राज्याच्या प्रतिमाच आपण कलंकित करीत आहोत, याचे भान निर्माता-दिग्दर्शकांना राहिलेले नाही.

आपल्याकडे एखादा चित्रपट वादग्रस्त कां ठरतो किंवा त्यावर बंदी लादण्याची भाषा का केली जाते, याची वेगवेगळी कारणे आहेत. काही वर्षांपूर्वी संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावत’वरुन रणकंदन झाले होते. सैफ अली खानला रावणाच्या भूमिकेत पाहून एका आगामी चित्रपटाच्या नुसत्या ट्रेलरवर टीकेची झोड उठली होती. आमीर खानच्या ‘लालसिंग चढ्ढा’वरही बंदी घालण्याची मागणी जोराने झाली. नुकत्याच सुपरहिट झालेल्या शाहरुख खानच्या ‘पठान’मध्ये अभिनेत्री दीपिका पडुकोणची भगव्या रंगातली बिकिनी पाहून काही जणांचे डोळे तांबारले होते. अशी डझनावारी उदाहरणे देता येतील.

‘काश्मीर फाइल्स’ हा जवळपास ‘द केरळा स्टोरी’च्याच माळेतला मणी होता, तो वादग्रस्त ठरला, आणि तितकाच गल्लाही कमावून गेला. परंतु, या सगळ्या चित्रपटांवर बंदी घालण्याची मागणी जशी चूक होती, तशीच ‘केरला स्टोरी’ या चित्रपटावरही बंदीचा उपाय योजणे योग्य नाही. कोणाच्या अभिव्यक्तीवर बंदीच्या मार्गाने गदा आणणे योग्य ठरणार नाही. मात्र चित्रपटातील ज्या गोष्टी अवास्तव असतील, त्याबाबत समाजाला जागरूक करीत राहणे आवश्यक आहे. असे चित्रपट केवळ गल्ला ठेवून निर्माण केलेले नसतात, हेच तर खरे दुखणे आहे.

गोव्यात झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात परदेशी परीक्षकांनी ‘काश्मीर फाइल्स’चा गौरव करण्याचे नाकारले, कारण त्यामागचा प्रपोगंडाचा दर्प त्यांनाही आलाच. अशा चित्रपटांमध्ये बव्हंशी कलात्मकता शोधण्यास जाऊ नये, तशी ती दुय्यमच असते. परंतु, अशावेळी रसिकांचे चित्रपट पाहण्याचे तारतम्य अनन्यसाधारण महत्त्वाचे ठरते. आपण पैसे खर्चून काय पाहायला चाललो आहोत? त्यात कल्पनाविलास किती? वास्तवाचे माप किती? याचे भान ठेवून चित्रपटाला जायला हवे. ‘प्रत्यक्षाहुनि प्रतिमा उत्कट’ असावी, हे तर चित्रपटकलेचे ब्रीदच आहे. पडद्यावर दाखवले जाणारे सत्याचा आभास निर्माण करते, पण सत्य नसते. सरतेशेवटी हा कलात्मक निखारा सामान्य चित्रपटवेड्या रसिकांच्याच पदरात येतो. चित्रपट दूर राहातो, आणि धार्मिक तेढीचे एक जुनेपुराणे कथानक तेवढे पुढे सुरु राहाते. हे थांबवणे, रसिकांच्याच हातात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com