अग्रलेख : वाघ, गाणे आणि भोंगे! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tiger

‘वाघ-बिबट्यांना दूर ठेवण्यासाठी मोठ्या आवाजात गाणी लावा’, असे वनविभागाचे अधिकारी गावकऱ्यांना सांगतात.

अग्रलेख : वाघ, गाणे आणि भोंगे!

पर्यावरणाशी जुळवून घेण्याची धडपड प्रत्येक प्राणीमात्राची असते. त्यामुळेच वाघ-बिबट आणि माणसाने एकमेकांचे सहअस्तित्व मान्य करुन जगले पाहिजे.

पूर्वीच्या काळी गाण्याच्या तबकड्या असत, आणि त्या तबकडीवर ग्रामोफोनच्या कर्ण्यासमोर कुतूहलाने बसलेल्या एका निरागस श्वानाचे लोभस चित्र असे. ‘हिज मास्टर्स व्हॉइस’ या कंपनीचे ते बोधचिन्ह होते. श्वानमार्जारादी मंडळी खरोखर सुरांचे भोक्ते असतात की हाडूक आणि माशांच्या काट्यांवर त्यांचे भागते हा प्रश्न तेव्हा फारसा कुणाला पडत नसे. कालौघात समाजमाध्यमांचे धरण फुटल्यानंतर, पियानो वाजवणारा कुत्रा, जलतरंग वाजवणारा पोपट, गिटार वाजवणारा गोरिला असल्या चित्रफितींचा सुकाळु झाला खरा; पण वन्यजीवांना गाण्याबिण्यात खरोखर कितपत गम्य असते, हा प्रश्न तूर्त अनुत्तरितच आहे.

वाघ-बिबट्यांना गाणी अजिबात आवडत नाहीत, हे आपल्या वनखात्याचे निरीक्षण मात्र कुठेतरी निसर्ग अभ्यासकांच्या प्रतिष्ठित नियतकालिकात नोंदवून ठेवायला हवे. कारण तुमच्या गावात वाघ-बिबट येऊ नये, असे वाटत असेल तर मोठ्या आवाजात गाणी लावा, असे वनाधिकारी सांगत असल्याचे विधिमंडळातल्या चर्चेतून कळले! ‘असल्या सूचना करणाऱ्या वनअधिकाऱ्यांच्या तक्रारी करा, त्यांना भरपूर गाणी ऐकण्यासाठी वेळ मिळेल, अशा ठिकाणी पाठवून देऊ’, असे आश्वासन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले, ते बरे झाले. विधिमंडळात गुरुवारी झालेल्या चर्चेदरम्यान ही रंगतदार माहिती कळली, तेव्हा वनमंत्री हेच सांस्कृतिक खात्याचेही मंत्री आहेत, त्यामुळे असे घडते, याकडे जयंत पाटील यांनी लक्ष वेधले.

‘वाघ-बिबट्यांना दूर ठेवण्यासाठी मोठ्या आवाजात गाणी लावा’, असे वनविभागाचे अधिकारी गावकऱ्यांना सांगतात. नशीब, व्याघ्रकुळासाठी कुठली गाणी लावावीत, आणि मृग-हरीणशावकांसाठी कुठल्या राग-रागिण्या लावाव्यात, हे वनविभागाने अजून जाहीर केलेले नाही! किंवा उगीचच सुरेल गोंगाट करणाऱ्या पक्षीगणासाठी कुठली सुरावट वाजवावी, हेही ठरलेले नाही. पर्जन्यकाळाच्या प्रारंभी मेघमल्हाराची धून ध्वनिवर्धकावर लावल्यास मोरासारख्या लडिवाळ पक्षीगणांना नाचकाम सोपे जाईल का, याचाही अभ्यास बहुधा व्हायचा बाकी आहे. वानरकुळासाठी एखादे दिलखेचक फिल्मी ठेकेबाज गाणे चालून जाईल असे वाटते. पण वाघांना गाणीबिणी आवडत नाहीत, हे निश्चित. एखाद्याला नसतो गाण्याचा कान! त्याला काय करावे? तथापि, वनअधिकाऱ्यांच्या संगीत-सल्ल्यात एक मेख आहे. वाघ-बिबट्याचा फेरा आपल्या गावात येऊच नये, म्हणून एखाद्या गावाने ध्वनिवर्धकावर गाणी लावलीच, तरी रात्री साडेदहा-अकरा वाजता ती बंद करावी लागणार. कारण रात्री उशीरा ध्वनिक्षेपक चालू ठेवण्यास न्यायालयाचीच बंदी आहे. वाघांचा संचार हा प्राय: रात्रीच्या काळोखातच होत असतो. गाणीबिणी बंद केली की स्वारी दबक्या पावलांनी येणारच. अशा परिस्थितीत काय करावे?

विनोदाचा भाग सोडला तर मानव आणि वन्यप्राणी यांच्यातील संघर्ष टाळण्यासाठी जे उपाय खरोखर योजले गेले पाहिजेत, त्याकडे कुणाचे लक्ष नाही, असे वाटते. वन्यप्राण्यांचे संवर्धन हे फक्त पर्यटन किंवा छायाचित्रांसाठी नाही. निसर्गचक्रात वाघ-सिंहांचे स्थान अनन्यसाधारण आहे. वाघ आणि माणसातला संघर्ष काही नवा नाही. परंतु, त्यात अंतिमत: बिचारा वाघच हरणार, हे सत्य आहे. वाघांच्या हल्ल्यांमुळे अनेकदा दुर्धर प्रसंग शेतकऱ्यांना, आदिवासींना भोगावे लागत असतात. हातातोंडाशी आलेले पीक जेव्हा रानडुकरांचा,हरणांचा कळप किंवा हत्ती वा गवे उद्ध्वस्त करतात, तेव्हा त्या कास्तकाराला होणाऱ्या वेदनेची कल्पना, पर्यटनापुरता वाघ बघणाऱ्या शहरीबाबूंना येणे कठीण आहे. वन्यजीवांनी पिकाची नासाडी केल्यास सरकार संबंधित शेतकऱ्याला जी नुकसानभरपाई देते, ती इतकी तुटपुंजी किंवा विलंबाने मिळते की, त्याला भरपाई तरी कसे म्हणावे, असा प्रश्न पडावा. तथापि, एक लाख शेतकऱ्यांना शेतकुंपणासाठी साह्य दिले जाईल, अशी घोषणा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे, तसेच नुकसानभरपाईला विलंब झाला तर त्या पैशावरील व्याज संबंधित अधिकाऱ्याकडून वसूल करण्यासाठी नवा कायदा करणार असल्याचे जाहीर केले आहे.

बिबट्यांचा मानवी वस्तीतला संचार ही काही आता चांगला ‘टीआरपी’ मिळवणारी बातमी उरलेली नाही. शहरभागातल्या सोसायट्या आणि बंगल्यांच्या आवारात अपरात्री शिरुन भोभोत्कार करुन आळी जागवणाऱ्या ग्रामसिंहांना उचलून नेण्याचे प्रकार ही बिबटेमंडळी नेहमीच करतात. मानवी वस्तीत शिरुन धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याबद्दल लोकांच्या मनात एकच भावना असते- याला यमसदनी धाडावे! महाराष्ट्रापुरते बोलायचे तर १९९४पासून आजपर्यंत माणसांनी वस्तीत शिरलेले असे साडेपाच हजार बिबटे टिपून मारले आहेत, असे आकडेवारी सांगते. वन्यजीवांना जपले, तर निसर्गचक्र सुरक्षित राहील, पर्यायाने माणूसही सुखात जगेल, असे आग्रहपूर्वक सांगितले जाते.

वनसंपदेवर होणारे अतिक्रमण वाढल्याने वाघ-बिबट्यांचे अधिवास नष्ट होत गेले. वन्यसृष्टीवरचे हे अतिक्रमण आपण मानवांनीच केले आणि आपणच एकीकडे वन्यजीवांच्या संवर्धनाचे पाढे वाचतो आणि दुसरीकडे त्यांचेच अधिवास गिळंकृत करत जातो. वाघ आणि माणसाने एकमेकांचे सहअस्तित्व मान्य करुन जगले पाहिजे, हाच त्यावरचा उपाय. मानवाचे सहअस्तित्व वाघाने स्वीकारले आहे, हेच त्याच्या वस्त्यांमधल्या संचारावरुन दिसून येते. पर्यावरणाशी जुळवून घेण्याची धडपड प्रत्येक प्राणीमात्राची असते. उद्या एखाद्या गावात गाणे वाजवणाऱ्या भोंग्याखाली येऊन वाघ- बिबटे आस्वाद घेत बसलेले दिसले तर? कल्पना करा! कुठले भोंगे कुणाला खटकतील, आणि कुणाला प्यार होतील, कसे सांगावे?