अग्रलेख : संयुक्त प्रयत्नांची उभारू गुढी

Editorial
Editorial

गुढी पाडवा हा खरेतर आनंदाने भारतात साजरा होणारा सोहळा. त्या दिवशी अनेक नव्या संकल्पनांची गुढी उभारून नव्या निर्धाराने आणि निश्चयाने नवनवीन कामांचा शुभारंभ होत असतो. मात्र, गेल्या वर्षी याच सणाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अवघ्या चार तासांच्या अंतराने २१ दिवसांची ठाणबंदी जाहीर केली, तेव्हा पुढचा पाडवाही आपल्याला अशाच भयावह सावटाखाली घरातच बसून साजरा करावा लागणार आहे, असे कोणाच्याही मनात आले नसणार. प्रत्यक्षात कोरोना नामक विषाणूने चढवलेला हा दुसरा हल्ला इतका भयावह आहे, की गेल्या वर्षभरातील प्रदीर्घ अनुभवानंतरही आपण त्यास तोंड देण्यास कमी पडत आहोत. खरेतर साधारणपणे तीन-साडेतीन महिन्यांच्या ठाणबंदीनंतर आपले व्यवहार पूर्ववत होऊ घातले होते आणि या विषाणूचा प्रतिबंध करणारी लसही उपलब्ध झाली होती. आजपर्यंत देशातील जवळपास दहा कोटी लोकांचे लसीकरण पारही पडले आहे. तरीही कोरोनाबाधितांचे आकडे वाढताहेत. मृत्युदरही वाढताना दिसतो आहे. संकटाच्या या काळात अधिक भयावह वाटते आहे ते राजकारण. लशीचे वाटप; तसेच आरोग्यसुविधा यावरून सुरू असलेले राजकारण उबग आणणारे आहे. अवघ्या देशाने संसर्गाच्या या समान संकटात तरी एकत्र येण्याची गरज असताना तसे घडत नाही. आरोग्य सुविधा जनसामान्यांपर्यंत नीट पोचताहेत की नाही, हे पाहण्यासाठी जर विविध पक्षांचे कार्यकर्ते कामाला लागले, तर सर्वसामान्यांना केवढा मोठा दिलासा मिळेल! पण इतर पक्ष कसे चुकले, हे ओरडून सांगण्यातच बऱ्याच जणांची ऊर्जा खर्च होत आहे. राजकारणी एकदिलाने महासाथीच्या विरोधात उभे राहिलेले दिसत नाहीत. उलट केंद्र विरुद्ध राज्ये, भाजपशासित राज्ये विरुद्ध बिगर-भाजपशासित राज्ये अशी दुही माजवली जात आहे. हे सारेच सर्वसामान्यांचे मन विषण्ण करून सोडणारे आहे.

- पुणे शहर आणि जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्याराज्यांतील कोरोनाविषयक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आपली पथके पाठवणे गरजेचेच होते आणि तशी ती पाठवलीही गेली. या पथकांचा अहवाल आता आला असून, त्यानुसार महाराष्ट्र, पंजाब तसेच छत्तीसगड या तीन राज्यांतील परिस्थिती ही गंभीर नि भयावह आहे. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर यांचा या राज्यांत मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे. महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांमध्ये रुग्णालयांची व्यवस्था पुरेशी नसल्याचे समितीने म्हटले आहे.  एवढेच नव्हे, तर बाधितांच्या चाचण्यांसंबंधातही याच तीन राज्यांत बराच गोंधळ आहे. हे सारे वास्तवाला धरून असू शकेलही; पण या अहवालातील एक योगायोग असा, की या तीनही राज्यांत बिगर-भाजप सरकारे आहेत. त्यामुळेच हा अहवाल एक मोठे प्रश्नचिन्ह उभे करू पाहत आहे. सध्या देशातील उत्तर प्रदेश आणि बंगाल तसेच राजधानी दिल्लीतही बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे, गुजरातमध्येही परिस्थिती नियंत्रणाखाली नाही.

- राज्यभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यापैकी उत्तर प्रदेश, तसेच गुजरात या दोन राज्यांत भाजपचे सरकार आहे, तर बंगालचे राज्य काबीज करण्यासाठी तेथे सुरू असलेल्या रणकंदनात कोरोना विषाणू जणू बंगालच्या उपसागरावरून दूरदेशी उडून गेला आहे! दुसरीकडे हरिद्वारच्या कुंभमेळ्यात शाही स्नान केल्याने या विषाणूचे गंगेत विसर्जन होईल, या श्रद्धेपोटी बहुधा तेथे हजारोंनी गर्दी केली आहे. काही तथाकथित संत-महंतांना तेथेच या विषाणूने ग्रासले असले, तरी हा कुंभ उत्साहाने आणि विशेषतः सरकारी इतमामात सुरू आहे. त्यातच ‘रेमडेसिव्हिर’ या औषधाच्या राज्याराज्यांना होत असलेल्या वाटपावरून आरोप-प्रत्यारोपांचे मोहोळ उठले आहे. ठिकठिकाणी या औषधाची साठेबाजी तसेच काळाबाजार सुरू असल्याची वृत्ते झळकत आहेत. त्यामुळे या औषधाच्या निर्यातीवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. मात्र, त्याचवेळी गुजरात या भाजपशासित राज्यातील सुरतेत हीच ‘रेमडेसिव्हिर’ इंजक्शने थेट भाजपच्याच कार्यालयात ठेवण्यात आली होती आणि लोकांनीही ती घेण्यासाठी या कार्यालयासमोर रांग लावली होती. केंद्र सरकार या इंजेक्शनच्या वितरणात भेदभाव करत असल्याच्या शंकेला त्यामुळे पुष्टी मिळाली आहे. त्याचवेळी महाराष्ट्रातील काही बड्या राजकारण्यांनी आपल्या प्रभावाचा वापर करून, आपापल्या वर्चस्वक्षेत्रांत हेच आज देवदुर्लभ झालेले इंजेक्शन मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून दिल्याचे बघायला मिळत आहे. त्यामुळे तेथील जनतेला दिलासा मिळालाही असेल; पण राज्याच्या कोणत्या भागात या औषधाची निकड आहे, याकडे किमान यावेळी तरी दुर्लक्ष करणे, अक्षम्यच म्हणावे लागेल.

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
पुनश्च एकवार ठाणबंदी लागो अगर न लागो; आपल्याला या विषाणूशी लढा देणे क्रमप्राप्त आहे. त्यासाठी ‘दो गज की दुरी है जरुरी!’ हे तर खरेच! मात्र, तेवढ्याने भागणार नाही. मास्क हा वापरायलाच लागेल; कारण त्यावर केवळ आपले स्वत:चेच नव्हे, तर इतरांचेही आरोग्य आणि आयुष्यही अवलंबून आहे. स्वतःला शिस्त लावून घ्यावी लागते, हा गतवर्षाने आपल्याला दिलेला सर्वांत मोठा धडा आहे. ती शिस्त जशी वैयक्तिक आयुष्यात पाळावी लागते, तसेच सार्वजनिक जीवनातही. त्याचवेळी सर्वपक्षीय राजकारण्यांनी सत्ता हेच अंतिम उद्दिष्ट न मानता सार्वजनिक कल्याणाचाही विचार करायला हवा, तरच पुढचा गुढी पाडवा आपण आनंदाने आणि मुक्त वातावरणात साजरा करू शकू.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com