esakal | ढिंग टांग : चिपी आणि व्हीआयपी पाशिंजर!
sakal

बोलून बातमी शोधा

ढिंग टांग : चिपी आणि व्हीआयपी पाशिंजर!

ढिंग टांग : चिपी आणि व्हीआयपी पाशिंजर!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

‘‘खुर्चीचो पट्टो बांदून घेयात! मेल्यानो, आता इमान उतरताहा!,’’ असे सांगून हवाईसुंदरी विमानाच्या अंतर्भागात नष्ट झाली, तेव्हा एकच गडबड उडाली. विमानातील सर्व मेल्यांनी कुर्सी की पेटी बांधून घेतली.

‘‘आवशीक खाव, चिपी इला? इतक्यात कसा इला?’’ खडबडून जाग्या झालेल्या विंडोसीटमधल्या व्हीआयपी पाशिंजराने अचंब्याने विचारले. सगळे त्याला हसले! कारण विमान चिपीहूनच उडाले होते, आणि मुंबईकडे निघाले होते!! ‘कोकण एअरलाइन्स’च्या विमानात चहा, गुडीशेव, कोकम सरबत, आलेपाक असे काही काही वाटतात, अशी अफवा कुणीतरी पसरवली होती, त्यामुळे बरीच पाशिंजरे बराच काळ वाट पाहात होती. पण काहीही आले नाही!

...उड्डाण केल्यानंतर जवळपास लगेचच उतरण्याची वेळ झाली. आपले तिकिटीचे पैशे फुकट गेल्याची दुखरी जाणीव होऊन व्हीआयपी पाशिंजर हळहळला. यापेक्षा यष्टयेत बसलो असतो तर काय वायट झाले असते? असे त्याच्या मनात येऊन गेले. वास्तविक चिपीला विमानतळ व्हावे यासाठी व्हीआयपी पाशिंजराने किती कष्ट घेतले होते, याची इतर पाशिंजरांना कल्पना नसेल. कितीतरी जणांशी भांडणे काढली होती. कोकण एक्सप्रेस सुरु करण्याचे श्रेय दुसऱ्या कोणाला तरी मिळाले, पण ‘कोकण एअरलाइन’ सुरु करण्याचे कार्य आपल्याच खात्यात नोंदले गेले पाहिजे, असा व्हीआयपी पाशिंजराचा हट्ट होता. निसर्गरम्य कोकणात सुंदरसा, टुमदार विमानतळ असावा, हे त्याचे स्वप्न होते. त्यासाठी त्याने काय नाही केले? पक्ष बदलून पाहिले, भाषा बदलून पाहिली, खाती बदलून पाहिली, सरकारेही बदलून पाहिली! पण व्यर्थ!!

सहा-सात वर्षापूर्वीच विमानतळाची पायाभरणी झाली होती, नंतर कुणीसेसे इमारतीचे उद्घाटनही उरकून घेतले. एक-दोनदा धावपट्टीच्या चाचण्याही झाल्या. आता विमानतळ नक्की होणार असे वाटत असताना उद्घाटन कोणाच्या हस्ते करायचे असा प्रश्न उभा राहिला. व्हीआयपी पाशिंजराचे म्हणणे, विमानतळे केंद्र सरकारच्या अखत्यारीत असतंत, (आणि मी केंद्रात आसंय!) मगे राज्याच्या मुख्यमंत्र्याचो काय संबंध? आयत्यार कोयत्ये?

मुख्यमंत्र्याच्या पक्षाचे म्हणणे असे की, केंद्राचा काय संबंध असेल तो असेल, या उपऱ्या पाशिंजराचा काय संबंध? (याला धरुन ‘अंदर’ टाका!) एकंदरित, विमानतळ उभारणीपेक्षा अधिक वेळ उद्घाटनालाच लागला, हे बरीक सत्य होते...

‘त्या’ सुप्रसिध्द व्हीआयपी पाशिंजराच्या पायाशी ठेवलेल्या केबिन लगेजमधून केरसुणीचा हीर बाहेर डोकावत होता. पिशवीतून कोकमाच्या आगळाचे जांभळे ओहळ वाहात होते. फणसाच्या गऱ्यांचा घमघमाट सुटला होता. विमानाच्या अंतर्भागात कोकणी मेव्याचा गंध भरलेला होता. तरीही चिपी विमानतळ हा अतिशय गैरसोयीचा असून साधी मासळी नेता येत नाही, याबद्दल अनेक पाशिंजरे एकमेकांकडे तक्रार करत होती. कोकणातून येणाऱ्या प्रवाशांना किमान घरचे चार-चार नारळ तरी केबिन सामानात आणू द्यावेत, अशी मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली होती. पण सुरक्षिततेच्या कारणास्तव नारळाला ‘डीजीसीआय’ची परवानगी मिळत नव्हती.

‘‘ ह्या:, शिरा पडो मेल्यांच्या तोंडार...ओरोसच्या येष्टयेत बसल्यासारका वाटताहा! खंयचो विमान नि कसला काय! ‘आकाडता बापडा, सात माझी कापडा,’ असा झालाहा!’’ व्हीआयपी पाशिंजर करवादला.

...मुंबईचा विमानतळ दिसू लागताच, कोकणी वैमानिकाने हवाई वाहतूक नियंत्रण मनोऱ्याशी संपर्क करुन ‘‘डुलक्या काढतंस काय? चिपीची फ्लाइट इली!...माका उतरायची परमिशन दे, नायतर दादाक नाव सांगतलंय!’’ असे बजावले.

विमान उतरले. व्हीआयपी पाशिंजराने मग चिपी विमानतळाचे अधिकृत उद्घाटन झाल्याचे मनातल्या मनात जाहीर केले.

loading image
go to top