वादळ विसावलं

asma jahangir pakistan
asma jahangir pakistan

पाकिस्तानच्या कसूर जिल्ह्यातील सात वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिचा खून केल्याच्या प्रकरणातील आरोपीला अटक व्हावी म्हणून लोकांना अलीकडेच रस्त्यावर यावे लागले. पोलिसांच्या निष्क्रियतमुळे ते संतप्त झाले आहेत. वास्तविक स्त्रियांचे शोषण, त्यांच्यावरील लैंगिक अत्याचार अशी प्रकरणे हाताळण्यातील तिथल्या पोलिस यंत्रणेची उदासीनता काही नवी नाही. मुळात स्त्रियांच्या संरक्षणासाठी पुरेसे कायदेच नाहीत, जे आहेत त्याच्या अंमलबजावणीचा पत्ता नसतो आणि न्यायालयात खटले उभे राहिले तर पीडित महिलांच्या बाजूने लढायला वकीलही पुढे येत नाहीत, अशी सर्वव्यापी दुर्दशा असलेल्या पाकिस्तानात अस्मा जहांगीर नावाची ज्योत तेवत होती; तो बहुधा एकूणच पीडितांचा एकुलता एक आधार होता. परंतु, आता तीही निमाल्याने तिथला काळोख आणखी गडद झाला, असे म्हणावे लागेल. अस्मा जहांगीर यांना रविवारी (ता.११) हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले. त्यांना नैसर्गिक मरण आले, ही एका अर्थाने नवलाची बाब, याचे कारण महिलांच्या हक्कांसाठी कायदेशीर आणि सामाजिक पातळीवर संघर्ष करताना अनेकदा मूलतत्त्ववाद्यांनी त्यांना जिवे मारण्याच्या धमक्‍या दिल्या. एकदा त्यांच्यावर घरात घुसून हल्लाही झाला होता; पण त्यांची आपल्या कामाप्रती एवढी जबर निष्ठा होती, की त्या जराही विचलित झाल्या नाहीत.

कायद्याची पदवी घेतल्यानंतर अमेरिका आणि कॅनडात उच्च शिक्षण घेतल्यानंतरही केवळ करिअर, पैसा यात मश्‍गुल होण्याची मळलेली वाट सोडून त्या पाकिस्तानात मानवी हक्‍कांसाठी कार्य करीत राहिल्या. कट्टर धर्मवादाचे प्राबल्य असलेल्या व्यवस्थेत विवेकाचा आवाज सतत उठवत राहाणे, ही सोपी बाब नाही. तिथल्या कथित लोकशाहीला भक्कम संस्थात्मक आधार लाभलेला नसल्याने त्यांचे काम आणखीनच दुर्घट होते. परंतु, झिया ऊल हक असोत वा मुशर्रफ असोत, त्यांच्या हडेलहप्पी कारभाराच्या विरोधात आवाज उठवायला त्या कचरत नसत. अलीकडेच कुलभूषण जाधव यांना कायदेशीर मदत नाकारण्याच्या सध्याच्या सरकारच्या निर्णयावरही त्यांनी झोड उठविली होती. लष्कर, ‘आयएसआय’ आणि धर्मांध शक्तींमुळे आधीच आक्रसत चाललेले पाकिस्तानातील नागरी जनजीवन अस्मा जहांगीर यांच्या जाण्याने खरेच पोरके झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com