‘टायगर’ अंदर है ! (अग्रलेख)

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

रुपेरी पडद्यावरील अभिनेता म्हणून लोक अक्षरशः डोक्‍यावर घेत असल्याने समाजात आपण काहीही करण्यास मुखत्यार आहोत, असा समज असलेल्यांना भानावर आणण्यास जोधपूर न्यायालयाचा निर्णय साह्यभूत ठरेल.

रुपेरी पडद्यावरील अभिनेता म्हणून लोक अक्षरशः डोक्‍यावर घेत असल्याने समाजात आपण काहीही करण्यास मुखत्यार आहोत, असा समज असलेल्यांना भानावर आणण्यास जोधपूर न्यायालयाचा निर्णय साह्यभूत ठरेल.

अभिनेता सलमान खान यास २० वर्षांपूर्वी राजस्थानात केलेल्या काळविटाच्या शिकारप्रकरणी जोधपूर न्यायालयाने पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावल्यामुळे कायद्याची बूज राखली गेली आणि या प्रकरणाचा चिकाटीने पाठपुरावा करणाऱ्या बिष्णोई समाजाला दिलासा मिळाला. दोन दशकांपूर्वी ‘हम साथ साथ हैं!’ या सिनेमाचे चित्रिकरण राजस्थानात सुरू असताना हे ‘भाईजान’ सैफ अली खान, दुष्यंत कुमार, नीलम, तब्बू आणि सोनाली बेंद्रे आदींना घेऊन शिकारीला निघाले आणि जोधपूरच्या जंगलात डौलदारपणे चालणाऱ्या एका काळविटावर त्यांनी गोळी झाडली. गोळीबाराचा आवाज ऐकताच आसपासच्या पाड्यांवर राहणारे हे बिष्णोई समाजाचे लोक बाहेर आले आणि त्यांना बघताच सलमान तसेच त्याचे हे सहकारी जीपमधून पसार झाले. हे बिष्णोई समाजाचे लोक काळविटांना पूज्य मानतात. ते या खटल्यातील मुख्य साक्षीदार ठरले. शेवटपर्यंत ते लढा देत राहिले आणि मुख्य म्हणजे त्या साक्षीदारांपैकी कोणीही फितूर झाला नाही. अर्थात, सलमानवरील हा काही पहिलाच खटला नव्हता आणि अभिनेता म्हणून तो लोकप्रिय असला तरी एकंदरित त्याची प्रतिमा बेदरकार अशी होती. सलमानवर असे शिकारीचे आणखीही काही खटले दाखल झाले होते. एक आणि दोन ऑक्‍टोबरच्या मध्यरात्री काळविटाची शिकार करण्याआधीच्या महिन्यात एका चिंकाऱ्याला ठार मारल्याबद्दल त्यास झालेल्या शिक्षेतून सर्वोच्च न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्‍तता केली होती. या आणि अशाच काही शिकारीच्या गुन्ह्यांमुळेच त्याला पाच वर्षांच्या तुरुंगवासाची तसेच १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावणाऱ्या न्यायाधीशांनी तो ‘सराईत गुन्हेगार’ - हॅबिच्युअल ऑफेंडर’ असल्याचे आपल्या निकालपत्रात नमूद केले आहे. आता या शिक्षेविरोधात सलमान उच्च न्यायालयात अपील करेल, त्यास बहुधा जामीनही मिळेल. बाकी कलाकारांची न्यायालयाने निर्दोष मुक्‍तता केली आहे. मात्र सलमान काय किंवा सैफ अली खानसारखे अन्य कलाकार काय, त्यांना लोक डोक्‍यावर घेत असल्यामुळे आपण काहीही करावयास मुखत्यार आहोत, अशा थाटात वावरत असतात. सैफ अली खानचे पिताश्री आणि भारतीय क्रिकेट संघाचे एकेकाळचे कर्णधार पतौडीचे नवाब यांच्यावरही अशाच एका बेकायदा शिकारप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता, याची आठवण होणे साहजिक आहे.

सलमानवरील हा खटला दोन दशके इतका लांबल्यामुळे काही मूलभूत प्रश्‍न उपस्थित झाले आहेत. बंदी असतानाही केवळ मौजमजेखातर बिनधास्त शिकार करणाऱ्यांमुळे तसेच वाघासारख्या दुर्मिळ प्राण्यांना ठार मारून त्यांची नखे, केस, कातडे यांचा व्यापार करणाऱ्यांमुळे अनेक वन्यजीव अस्तंगत होत चालले आहेत. त्यामुळेच त्यांचा सरकारने संरक्षित प्राणीजमातींमध्ये समावेश केला आहे. सिनेकलावंत, क्रिकेटपटू यांना देव मानण्याच्या आपल्याकडील प्रवृत्तीमुळे काहींच्या डोक्‍यात मस्ती गेली आहे. जोधपूर परिसरातील या शिकारप्रकरणावरून तेच दिसते. पण अशा सेलिब्रिटीपणाच्या आवरणाखाली काहीही खपून जाऊ शकते, असा जर कोणाचा समज असेल तर तो दूर होण्यास या निकालामुळे मदत होणार आहे. सध्याच्या पर्यावरण सजगतेच्या काळात त्यामुळे वन्य जिवांची हकनाक हत्या करण्यावरून भरण्यात आलेले खटले हे किती काळ चालवायचे, यावर काही निर्बंध घालायला हवेत आणि ते ‘फास्ट ट्रॅक’ पद्धतीनेच चालवायला हवेत. तसे करता येणार नसेल तर ‘राष्ट्रीय हरित लवादा’च्या धर्तीवर अशा शिकारखोरांना चाप लावण्यासाठी स्वतंत्र न्यायालये वा लवाद स्थापन करायला हवा. अन्यथा, आपण काहीही करू शकतो आणि पुढे वर्षानुवर्षे खटला चालणार असल्यामुळे आपण पुन्हा समाजात उजळ माथ्याने वावरू शकतो, अशी भावना डोक्‍यात हवा गेलेल्या या लोकांमध्ये निर्माण होऊ शकते. खरे तर सलमानवर या प्राणिमात्रांच्या शिकारीपेक्षाही अधिक गंभीर स्वरूपाचा आरोप हा मुंबईत वांद्रे येथील ‘हिट ॲण्ड रन’ प्रकरणात झाला होता. त्यात पदपथावर झोपणे भाग पडलेले काही जीव हकनाक बळी गेले होते. त्या खटल्यात मुंबई उच्च न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्‍तता केली असली तरी यासंबंधात सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहे. एकीकडे स्वत:ला ‘टायगर’ असे संबोधत ‘एक था टायगर’ आणि ‘टायगर जिंदा है’ अशा सिनेमात कामे करणारा हा कथित ‘टायगर’ अभी अंदर है, हेच खरे!

Web Title: editorial blackbuck poaching case salman khan gets 5 years jail jodhpur court