समाजव्यवस्थेतील कीड

doctor file photo
doctor file photo

गरीब, अत्याचारपीडित कुमारी मातांच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत, त्यांना आर्थिक आमिष दाखून अर्भकांची विक्री करण्याचा कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथे उघडकीस आलेला प्रकार म्हणजे माणुसकीला काळिमा तर आहेच; परंतु या प्रकारात एका डॉक्‍टरचाही हात असल्याचे उघड झाल्याने तो वैद्यकीय पेशालाही लाजिरवाणा आहे. भौतिक विकासाबाबतीत आजकाल मोठ्या गप्पा मारल्या जातात; पण सामाजिक पातळीवर काही बाबतीत वास्तवात काय स्थिती आहे हे अशा काही घटनांतून दिसून येत असते. काही महिन्यांपूर्वी सांगली जिल्ह्यात म्हैसाळ येथे बेकायदा गर्भपात व स्री-भूणहत्येचे प्रकरण उघडकीस आले होते. आता इचलकरंजीत उघड झालेला प्रकारही तितकाच गंभीर आहे. दिल्लीस्थित केंद्रीय पथकाच्या नेतृत्वाखाली इचलकरंजीतील कारवाई झाली असून, यामागे एखादे मोठे रॅकेट असण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे.

केंद्रीय महिला व बालविकास खात्याच्या अंतर्गत ‘सेंट्रल ॲडॉप्शन रिसोर्स ॲथॉरिटी’ (कारा) ही मुला-मुलींना दत्तक देण्याच्या प्रक्रियेचे नियमन करणारी देशपातळीवरील यंत्रणा आहे. त्यांच्याकडे दाखल झालेल्या निनावी तक्रारीवरून स्थानिक यंत्रणेच्या मदतीने संबंधित डॉक्‍टर व रुग्णालयावर कारवाई करण्यात आली आहे. तक्रारीची दखल घेतली गेली, यासाठीही दाद द्यावी, असा आजचा भवताल आहे.  समोर आलेली प्राथमिक माहितीच इतकी सुन्न करणारी असेल, तर अधिक तपासात यातून आणखी काय काय बाहेर येऊ शकेल याची कल्पना करता येते. तपास यंत्रणा आता तरी या प्रकरणाचा खोलात जाऊन योग्य तो छडा लावतील, अशी अपेक्षा आहे. कुमारी माता ही आपल्या समाजातील एक मोठी समस्या आहे. बहुतेक प्रकरणांत अत्याचार वा फसवणूक झाल्याने स्रीला कुमारी माता बनावे लागते. अब्रूला भिऊन अभागी मुलगी किंवा तिचे कुटुंबीय असे प्रकार चव्हाट्यावर येऊ नये असा प्रयत्न करतात. या त्यांच्या असहाय स्थितीचा फायदा दलाल घेतात आणि मग आर्थिक आमिष आणि थेट अर्भकांची विक्रीपर्यंत त्यांची मजल जाते. पांढरपेशा गुन्हेगारीचा हा एक वेगळा प्रकार आहे. अर्भकांचा मांडलेला हा बाजार म्हणजे समाजव्यवस्थेला लागलेली कीडच आहे. ती वेळीच नष्ट करण्यासाठी या संदर्भात असलेले कायदे आणखी कडक करण्याची गरज आहे. तसेच कुमारी माता किंवा त्यांच्या कुटुंबीयांमध्येही जागृती करण्याची आवश्‍यकता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com