शब्द आणि शब्दांच्या पलीकडले

शब्द आणि शब्दांच्या पलीकडले

आपण ज्या दिवशी या जगात प्रवेश करतो, त्याच दिवशी भाषाही आपल्या जगात अवतरते. नुकत्याच जन्मलेल्या बाळाला माणसांनी उच्चारलेले जे वेगवेगळे ध्वनी ऐकू येतात, ती त्या बाळाची भाषेशी झालेली तोंडओळख असते. सुरवातीला गोंगाट किंवा कोलाहल असे स्वरूप असलेल्या त्या ध्वनींना, बाळ  वाढते, तसतसे जणू एक रंग-रूप प्राप्त होते. त्यातून भोवतालची माणसे, त्यांच्या भावना याचा अंदाज येऊ लागतो. त्याला योग्य प्रतिसाद देता येऊ लागतो. अपरिचित चेहऱ्यांमुळे बावचळलेले बाळ, आईचा परिचित आवाज कानी पडला की शांत होते. अंगाईचे बोट धरून सूर आणि शब्द बाळाच्या भावविश्‍वात प्रवेश करतात आणि त्यांची साथसंगत नंतर कायमची राहते. ध्वनीला हळूहळू शब्दांचा आकार येतो आणि शब्दांच्या मागून अर्थ डोकावू लागतात. बाळाच्या नकळत ‘भाषा’ नावाच्या जादुई, अद्भुत खजिन्याच्या किल्ल्या त्याच्या हाती लागतात. इथून पुढे बाळाच्या बुद्धीचा, विचारांचा, भावनांचा विकास भाषेच्या साथीने होतो. भाषा जेवढी अधिक विकसित, तेवढे व्यक्तीचे आंतरविश्‍व अधिक समृद्ध, अधिक संपन्न!

पण भाषा फक्त शब्दांचीच असते असे नाही. शब्द म्हणजे तोंडाने उच्चारला जाणारा, अर्थपूर्ण ध्वनी असतो. संस्कृतीच्या विकासाच्या खूप पुढच्या टप्प्यावर शब्द लिहिला जाऊ लागला. लिपीबद्ध झाला. लिहिता- वाचता न येणारेही भाषा वापरतच असतात. एवढेच नव्हे तर त्यांचा शब्दसंग्रह, भाषेबद्दलची जाण कित्येकदा साक्षरांपेक्षाही चांगली असते. ज्यांना काही कारणांनी ऐकता- बोलता येत नाही, ते भाषा समजू शकत नाहीत किंवा वापरू शकत नाहीत, असे नसते. त्यांची स्वतंत्र अशी खाणाखुणांची भाषा असते. त्यामधून ते एकमेकांशी आणि ऐकू, बोलू शकणाऱ्यांशीही संवाद साधू शकतात. याचे कारण बोलणे किंवा लिहिणे, या माणसाच्या मेंदूच्या क्षमतांवर आधारित बाह्य क्रिया असतात. ज्यांना बोलता येत नाही, तेही लिखित भाषा शिकू शकतात, ते याच क्षमतांच्या आधारावर. बोललेला किंवा लिहिलेला शब्द हा एक चिन्ह असतो. चिन्हे नेहमी कुठल्या तरी गोष्टीकडे आपले लक्ष वेधत असतात. काळ्या ढगांनी ओथंबलेले आभाळ हे येणाऱ्या पावसाचे चिन्ह असते. अचानक आलेला थकवा हे आजाराचे चिन्ह असते. ढग आणि पाऊस, थकवा आणि आजार यांच्यातील संबंध नैसर्गिक असतात; पण भाषा ज्या चिन्हांची बनते ती चिन्हे आणि त्यांचे अर्थ यांचे नाते मात्र माणूस निर्माण करत असतो. अमुक एका शब्दाचा अर्थ असाच का, या प्रश्‍नाचे उत्तर तसा भाषिक संकेत आहे, म्हणून एवढेच असते. हे संकेत निसर्ग नाही, तर समाज तयार करतो. तोही खूप जाणीवपूर्वक नाही. चिन्हे आणि अर्थाचे नाते समाज व्यवहारातून तयार होते. ही चिन्हे शब्द असू शकतात. हावभाव आणि नृत्यासारख्या हालचाली असू शकतात. चित्रे किंवा सुरावटी असू शकतात किंवा स्पर्शही असू शकतात. या सर्वामध्ये समान असते ती चिन्हांमधून व्यक्त होण्याची क्षमता आणि प्रेरणा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com