फोनकॉल! (ढिंग टांग)

- ब्रिटिश नंदी
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017

स्थळ : मातोश्री, वांदरे बुद्रुक. वेळ : लढाईची चढाई!
प्रसंग : बांका! पात्रे : आपले सर्वांचे लाडके उधोजीसाहेब आणि प्रिन्स विक्रमादित्य.

स्थळ : मातोश्री, वांदरे बुद्रुक. वेळ : लढाईची चढाई!
प्रसंग : बांका! पात्रे : आपले सर्वांचे लाडके उधोजीसाहेब आणि प्रिन्स विक्रमादित्य.

विक्रमादित्य : (दार ढकलून आत येत) हाय देअर...बॅब्स! मे आय कम इन?
उधोजीसाहेब : (घाईघाईने मोबाइल फोन उशीखाली ठेवत) नको! झोपायला जा!! मी कामात आहे!
विक्रमादित्य : (कुतूहलानं) काय करताय? मला सांगा ना!!
उधोजीसाहेब : (करारी चेहऱ्यानं) युद्धाची तयारी करतोय! 
विक्रमादित्य : (उत्साहानं वॉव!! युद्ध मीन्स वॉर ना?.. मी पण करणार वॉर!!
उधोजीसाहेब : (छद्मी हसत) पोराटोरांचं काम नाही ते! (छातीवर मूठ हापटत) तेथे पाहिजे जातीचे!! आता दाखवतोच ह्या उधोजीच्या तलवारीचा इंगा!! ज्या दिशेने ही तलवार फिरते, तिथं वडवानल पेटतो, वडवानल!! कधी एकदा बिगुल वाजतं आणि मी माझा घोडा रणांगणाच्या दिशेने पिटाळतो, असं झालं आहे..! हर हर हर हर महादेऽऽव!
विक्रमादित्य : (घाबरत त्यांच्या कपाळाला हात लावून) ताप आलाय का तुम्हाला बॅब्स?
उधोजीसाहेब : युद्धज्वर म्हंटात त्याला, युद्धज्वर!! 
विक्रमादित्य : (उजळलेल्या चेहऱ्यानं) ओके, ओके! आपण सर्जिकल स्ट्राइक करणार आहोत ना, बॅब्स?
उधोजीसाहेब : (एक बोट नाचवत) एक प्रकारचा सर्जिकल स्ट्राइकच! वी कॉल इट गनिमीकावा!!
विक्रमादित्य : (काहीतरी आठवून) गनिमीकाव्यावरून आठवलं! दादरच्या काकांचे सात फोन येऊन गेले!
उधोजीसाहेब : (खेकसून) तू कशाला घेतलेस? काय सांगितलंस त्यांना?
विक्रमादित्य : (मान हलवत) मी घेतले नाहीत! फोनची रिंग वाजली की मी उचलायचो! मी ‘‘जय महाराष्ट्र, मातोश्री!’’ असं म्हटलं रे म्हटलं की फोन ठेवला जायचा! सांगणार कसं?
उधोजीसाहेब : (उतावळेपणाने) मग तुला काय म्हाईत ते फोन दादरच्या काकांचे होते?
विक्रमादित्य : (गालातल्या गालात हसत) ते ब्लॅंक कॉल्स देण्यात एक्‍सपर्ट आहेत!! मी बरोब्बर ओळखलं की हे तेच असणार!!
उधोजीसाहेब : (स्वत:शीच पुटपुटत) मलाही त्यांनी फोन करून करून छळलंय!!
विक्रमादित्य : कशाला करत होते ते फोन बॅब्स?
उधोजीसाहेब : (त्रासिक स्वरात) कशाला म्हंजे? टाळी मागण्यासाठी... दुसरं काय!!
विक्रमादित्य : (भुणभूण करत) मग तुम्ही द्यायची ना...तुम्ही का नाही दिलीत टाळी?
उधोजीसाहेब : (कसनुसा चेहरा ) आम्ही मागितली तेव्हा हे हात बगलेत दाबून बसले होते! आता घ्या म्हणावं ठेंगा!! आता कुणाचेही कितीही फोन येवोत, ह्या उधोजीनं हाती तलवार घेतली आहे! ज्या हातात तलवार शोभते, त्या हातात फोन घेणार नाही!!
विक्रमादित्य : (उजळलेल्या चेहऱ्यानं) फडणवीस काकांचा फोन आला तरी?
उधोजीसाहेब : (संयम पाळून) तू झोपायला जा बरं! मला कामं आहेत!!
विक्रमादित्य : (निरागसपणाने) दादरच्या काकांचा फोन आला तर काय सांगू?
उधोजीसाहेब : (डोकं खाजवत) सांग काहीतरी... मी घरात नाहीए म्हणून सांग!! पण मी म्हंटो, घेतोसच कशाला त्याचे फोन? वाजेल वाजेल नि बंद पडेल!! 
विक्रमादित्य : ते करणार नाहीत म्हणा! माझ्यासाठी हा विषय संपलाय, असं कालच म्हणालेत ते!!
उधोजीसाहेब : (सुस्कारा टाकत) असं म्हणाले ते? खरंच? चला, सुटलो!! आता त्यांना उलटा फोन करतो!! (उशीखालचा फोन काढून फोनमध्ये) हल्लोऽऽ... अरे, मी... मी... दादू बोलतोय! तू फोन केला होतास? मला ऐकूच आला नाही! सायलेंट मोडवर होता ना... सॉरी सॉरी... काय काम काढलंस? सहजच ना? घरचे काय म्हणाताहेत? मुंबईत यंदा थंडी फारशी पडली नाही नै? अरे, हो हो... ये ना एकदा... बटाटेवडे खायला... हो हो... बरं बरं... अच्छा. जय महाराष्ट्र. हुश्‍श....

Web Title: editorial dhing tang