फ्रेंडली म्याच! (ढिंग टांग!)

ब्रिटिश नंदी 
सोमवार, 6 फेब्रुवारी 2017

प्रिय मित्रवर्य उधोजीसाहेब यांसी लाख लाख दंडवत आणि मानाचा मुजरा. अत्यंत खिलाडूवृत्तीने सदर पत्र लिहीत असून, आमच्या शुभेच्छांचा स्वीकार व्हावा, ही विनंती. आम्ही नागपूरकर स्वभावाने दिलदार असतो. (मुंबईकरांसारखे कद्रू नाही.) कुणी टाळीसाठी हात पुढे केला की मनगट ओढून खस्सदिशी खेचून गळामिठी मारणे हा आमचा धर्म. आमचे हे वागणे तुम्हाला पटले नाही. तुम्ही (वांदऱ्याचे) खिशात रुमालाची घडी ठेवणारे. कसे जमणार? जाऊ द्या. आज आपल्या फ्रेंडली म्याचला खऱ्या अर्थाने सुरवात होते आहे. दोन गल्ली टीममधल्या म्याचच्या सुरवातीला क्‍याप्टनलोकांनी शेकहॅंड करायचा असतो. ती प्रथा पाळण्यासाठीच सदरील पत्र लिहीत आहे. 

टॉस मी जिंकला, पण पहिले ब्याटिंग तुम्हाला दिली, कारण आपली पंचवीस वर्षांची मैत्री, आणि आमचा अघळपघळ विदर्भी स्वभाव. हे तुमचे होमपिच आहे. (म्याचही तुमच्याच गल्लीत!) ब्याट-बॉल तुमचा, त्यामुळे तुम्हाला एकदा औट म्हंजे नॉटाऊट!! शिवाय ओव्हरमध्ये एक बॉल सरपटी टाकणे मस्ट!! तुम्ही इथलेच रहिवासी असल्याने पहिल्या मजल्यावरच्या खिडकीची काच फुटली तरी भरुन द्यावी लागणार नाही. आम्हा लोकांना मात्र कडक नियम पाळावे लागणार आहेत. एकदा औट म्हंजे कायमचे औट. शिवाय एकटप्पी क्‍याचसुद्धा औट. पहिल्या मजल्यावरची खिडकी फुटली तर काच भरून द्यायचीच, शिवाय बॉल जप्त होणार...आणि औटसुद्धा. 
अशा परिस्थितीत आम्ही फ्रेंडली म्याचला "हो' म्हटले, कारण आपली पंचवीस वर्षांची मैत्री!! मी आमच्या लोकांना सांगून ठेवले आहे की, विकेट फेकायची नाही, पण रन्ससुद्धा ज्यास्त करायच्या नाहीत. मुख्य म्हंजे तुमचेच काही ब्याट्‌समन "आम्ही तुमच्याकडून खेळू का?' विचारायला आले. त्यांना आम्ही टीममध्ये घेतले आहे. अट एकच- ब्याटिंग मिळणार नाही. बॉलिंग करून विकेट काढा हव्या तितक्‍या! कशी आहे आयडिया? हरलो तर मुद्दाम हरलो, असे नंतर सांगायला स्कोप तर ऱ्हायला पाह्यजेल ना? किंवा जिंकलो तर फ्रेंडली जिंकलो, असेही म्हणता आले पाहिजे. आखिर दोस्ती दोस्ती होती है...है की नहीं? भेटू या मैदानातच. आपला जिवलग मित्र. नाना फडणवीस. 
* * * 
नानाऽऽऽ - 
तुमचे पत्र वाचून पित्त खवळले. आईशप्पत हातात ब्याट आहे, खोटे बोलणार नाही, पण समोर असतात तर बॉलऐवजी तुम्हालाच स्टेडियमभाएर फेकून दिले असते. कसली फ्रेंडली म्याच? हे आमच्या अस्मितेचे युद्ध आहे, युद्ध. इतने दिन दोस्ती देखी, अब हमारी दुश्‍मनी देखो. ऐसा हाल करुंगा की लहू कांप जायेगा! (अ...हा डायलॉग बरोबर आहे ना?) कौरव-पांडवांमध्ये काय फ्रेंडली म्याच होते? नॉन्सेन्स. धनुर्धर पार्थाने मारलेला बाण चपळाईने हुकवून दानशूर कर्णाने तरी दाद दिल्याचे तुम्ही वाचले आहे का? दिलदारीलासुद्धा काही लिमिट असते. तरीही तुमच्यात-आमच्यात फ्रेंडली म्याच आहे, असे तुमच्यापैकी कोणीतरी म्हणालेच. तुम्ही-आम्ही फ्रेंड आहोत, हे जर खरे असले तर सध्या "अच्छे दिन' आले आहेत, हेसुद्धा मी मान्य करीन. फ्रेंडली-बिंडली काही नाही. मैदानात आल्यानंतर तुम्हाला दिसेलच कोण किती तयारीत आहे ते...भलते सलते खपवून घेणार नाही. पंचवीस वर्षे आम्ही तुमच्या कुसंगतीत वाया घालवली, ह्याचा पश्‍चात्ताप होतो आहे. वाटले होते, एका गावातल्या दोन टीम्स. ज्या गावच्या बोरी, त्याच गावच्या बाभळी. एकत्र खेळलो तर कुठे बिघडले? पण दरवेळी आम्ही सेंच्युऱ्या करायच्या, म्याच खेचून आणायची आणि कपसकट इनामाची रक्‍कम तुम्ही घेऊन जायची, हा कुठला न्याय? तुमच्यामुळे गेली पंचवीस वर्षे आम्ही वडापावावर काढली आहेत. तुम्ही पुरणपोळ्या खायच्या, आणि आम्ही वडापाव, ह्याला काय अर्थ आहे? 
आमची औकात काढलीत!! आता तुमची औकात दाखवतो. या, असे मैदानात या!! या वेळी होमपिच आमचे. ब्याटबॉल आमचे आणि कपसहीत इनामाची रक्‍कमही आमचीच. जय महाराष्ट्र. तुमचा (अजिबात नसलेला) उधोजी. 
 
Web Title: Editorial Dhing tang