संशय का मनी आला? (ढिंग टांग)

संशय का मनी आला? (ढिंग टांग)

मतदान यंत्रात काहीतरी घोटाळा असल्याचे धादांत खोटे, मनघडंद आणि बेछूट आरोप करणाऱ्या नतद्रष्ट पक्षांचा शतप्रतिशत निषेध करुनच आम्ही सदरील मजकूर लिहावयास घेतला आहे. मतदान यंत्रात कुठलाही घोटाळा होऊ शकत नाही आणि होणारही नाही. किंबहुना हे यंत्र संपूर्णत: घोटाळाप्रूफ आहे, ह्याबद्दल आमच्या मनात आता यत्किंचितही संदेह उरलेला नाही.

काही काळापर्यंत, हातभर लांबीच्या ह्या यंत्रातून विविध आवाज येताना ऐकून आम्हीही काहीसे संशयग्रस्त झालो होतो, हे मान्य; पण आता तसे काही नाही. ईव्हीएम यंत्र हे एक आदर्श लोकशाही यंत्र आहे, ह्याची आम्हांस खातरी पटलेली आहे.

संपूर्ण देशभरातील सर्व माणसे (इतके सर्व भोगून) शेवटी कमळ पार्टीलाच का बरे मत देतात? हा मूलभूत प्रश्‍न आम्हालाही पडला होता. ‘अच्छे दिन आनेवाले है’ अशी फुकाची आवई उठवून तमाम पब्लिकला गंडविणाऱ्या, महागाईचा भस्मासूर थैमान घालत असताना नोटा रद्द करणाऱ्या ह्या सरकारबद्दल लोकांच्या मनात संताप का बरे येत नाही? हाही सवाल आमच्या मनात अधूनमधून टोचत होता. गालास खळी पडणारे, छान छान नेते उपलब्ध असताना खुळे मतदार दाढीवाल्यांना पसंती का देतात? हे कोडेही आम्हाला पडले होते. ह्यात काही काळेबेरे नाही ना? ह्या विचाराने आमची(ही) झोप उडाली होती.

योग्य ते उत्तर मिळावे, म्हणून आम्ही एक सर्व्हेदेखील केला. सर्व्हे सॅंपल दहा जणांचे होते. दहापैकी सहा लोकांनी आम्ही कमळ पार्टीला मत दिल्याचे सांगितले; पण ‘पंतप्रधान कोण व्हावेसे वाटते?’ ह्या प्रश्‍नाचे उत्तर त्यांनी ‘राहुलजी गांधी’ असे दिले!! दोन लोकांनी कांग्रेसला मत दिल्याचे कबूल केले; पण पंतप्रधान म्हणून नमोजीच ठीक असल्याचे सांगितले. एका मतदाराने आपण आम आदमी असल्याचे छातीठोकपणे सांगत कांग्रेसचा प्रचार करून झाल्यावर मत कमळ पार्टीला दिल्याचे सांगितले!!! तर एकाने आपला मतदान यंत्रावर विश्‍वास नसल्याचे सांगून आम्हाला फुटवले. (ते आम्ही स्वत:च होतो, हे मागाहून आमच्या लक्षात आले!) असो.

गेल्या अडीच वर्षांपासून अचानक ईव्हीएम यंत्रे बिघडली असून उपग्रहाद्वारे त्यात आपल्याला हवे ते मत नोंदवता येते, तसेच ते बिघडलेल्या ट्रांझिष्टरप्रमाणे खोलून त्यात हवे ते बदल करता येतात, असे आम्ही ऐकून होतो. प्राचीन काळी आमच्याकडे एक ट्रांझिष्टर होता. त्याच्या उजवीकडे असलेली एक गोल कळ फिरवल्यावर नानाविध स्टेशने लागत असत; परंतु कालांतराने काटा हलला तरी एकच एक स्टेशन लागण्याचा प्रकार सुरू झाला. भल्या भल्या रिपेरीवाल्यांना तो ट्रान्झिष्टर दुरुस्त करता आला नाही. पुढील काळात आमच्याकडील टीव्हीवरही असलेच प्रकार सुरू झाले.

कुठलेही न्यूज च्यानेल लावा, समोर आपले नमोजी!! कधी भाषणे देताहेत, कधी बोगद्याचे उद्‌घाटन करताहेत, तर कधी उपग्रह हवेत झेपावल्यावर टाळी वाजवताहेत!! जळी, स्थळी, काष्ठी आणि पाषाणी आपले नमोजीच!! हे गौडबंगालदेखील आम्हाला उमगले नाही. 

परिणामी, ईव्हीएम यंत्राच्या संशयास्पद वर्तनाने आम्ही फार्फार विचलित झालो. आमची लोकशाही खतरे में असल्याचे इशारे आम्हाला आम आदमीने आणि कांग्रेसजनांनी दिलेच होते. अखेर आम्ही एक डेमो ईव्हीएम यंत्र घेऊन थेट नमोजींच्या घरी, ‘सात, लोककल्याण मार्ग’ येथे गेलो. 

‘शुं काम?’’ त्यांनी आमच्या शतप्रतिशत प्रणामाकडे सपशेल दुर्लक्ष करत आम्हाला विचारले. 

आम्ही ईव्हीएम यंत्रातील कथित घोटाळ्याचे कोडे त्यांना विचारले. तेही चिंतित झाले. आमच्या हातातील ईव्हीएम यंत्राची चाचणी घेऊन पाहू, असे सुचवून त्यांनी ते यंत्र चालू केले.

आम्ही सटासट दोन-चार बटणे दाबून पाहिली. सरसरसरसर पावत्या बाहेर आल्या. सगळ्या पावत्यांवर कमळाचे चिन्ह पाहून नमोजी म्हणाले : ‘‘लो, पती गयो...आ ईव्हीएम मसीन तो एकदम चोक्‍कस छे! छे के नथी?’’
....अशा रितीने आमचा संशय शतप्रतिशत फिटला. साई सुट्यो!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com