सफेद कमीज की केस! (ढिंग टांग)

सफेद कमीज की केस! (ढिंग टांग)

आरोपी - (पिंजऱ्यात उभे राहून गरीब आवाजात)...ईश्‍वराला स्मरून मी शपथ घेतो की जे काही सांगेन, ते सत्यच सांगेन. खोटे सांगणार नाही. मी एक अत्यंत साधाभोळा आम आदमी आहे... 

फिर्यादी वकील : (टेबलावर मूठ आदळत) ऑब्जेक्‍शन माय लॉर्ड, पहिल्याच वाक्‍याला आरोपी शपथेवर खोटे बोलला आहे!!

जज्जसाहेब : (‘चला, हवा येऊ द्या’ स्टायलीत) काह्याचं ऑब्जेक्‍शन भाऊ. चालू तं होऊ दे नं केस!! ओव्हररूल्ड!! तुम्ही बोला हो!! 

आरोपी : (दुप्पट गरीब आवाजात) तर मी एक अत्यंत साधाभोळा आम आदमी असून, मी प्रचंड गरीबसुद्धा आहे!! ह्या खोट्या गुन्ह्यात मला हकनाक अडकविण्यात आले. माझे कुटुंब उघड्यावर पडले आहे, माय लॉर्ड! 
फिर्यादी वकील : (पुन्हा उसळून उठत) सरासर झूट, न्यायमूर्ती महाराज!! सदर आरोपी क्र. एक हा एका सुस्थितीतील कुटुंबाचा सदस्य असून, काही काळ महसूल खात्यात चाकरी करत होता, असे पुरावे आहेत!! महसूल खाते, माय लॉर्ड!! (दात ओठ खात) वकिलाचे पैसे बुडविण्यासाठी हा त्याचा कांगावा आहे, ह्याची माननीय कोर्टाने दखल घ्यावी!! वकिलाचे पैसे बुडविण्याइतका मोठा गुन्हा असूच शकत नाही, न्यायमूर्ती महाराज! अशा प्रवृत्तींना... अशा प्रवृत्तींना पोकळ बांबूचे-

जज्जसाहेब : (हातोडा हापटत) ऑर्डर ऑर्डर!! काहीही बोलून ऱ्हायले तुम्ही तं! ये कोर्ट है, तुम्हारे बाप की जागीर नहीं...आइकला होता ना ‘जंजीर’ पिच्चरचा डायलॉग? हितं फिट्ट बसला, टाकून देला!! हाहा!! (मवाळ सुरात) कडकीवाल्याले असं टाकून बोलू नै हो! तुम्हाले काय म्हाईत कडकी म्हंजे काय अस्ते ते!! बरं, काय केलं म्हणून हे आले हितं?

फिर्यादी वकील : (चित्रपटातील वकिलाप्रमाणे) ह्यांच्यावर अतिशय गंभीर आरोप आहे माय लॉर्ड! माझ्या सभ्य आणि सुसंस्कृत आणि सुविद्य अशा अशिलाच्या पाठीवर फाऊंटन पेनची शाई उडवून सदर आरोपीने पळ काढला!!

जज्जसाहेब : (खुदुखुुदु हसत) लाल शाई की काळी?

फिर्यादी वकील : (निर्विकारपणाने) निळी!! त्यामुळे माझ्या अशिलास नव्याकोऱ्या शर्टाचा खर्च करावा लागला, शिवाय त्याच्या निष्कलंक सदऱ्यावरील डाग धुण्यासाठी साबणही आणावा लागला!! शिवाय सदर घटना घडली, त्या दिवशी माझ्या अशिलास दिवसभर गंजीफ्राकावर बसून राहावे लागले!!

जज्जसाहेब : (बुचकळ्यात पडत) असं? का बरं?

फिर्यादी वकील : (खुलासा करत) शाईवाला सदरा धुवायला गेला होता ना!! 
जज्जसाहेब : (तंद्रीत) हांहां!! लेकिन दाग अच्छे होते है ना? बरं ते असू द्या- (आरोपीकडे पाहात) तुम्हाले आरोप मान्य आहे का भाऊ?

आरोपी : (मान हलवत) छे!! मी एक साधाभोळा सिंपल आम आदमी आहे!! मी कसा गुन्हा करणार? घडले एवढेच की पेनामध्ये शाई आहे की नाही, हे मी तपासून बघत होतो. आता पेनात शाई आहे की नाही, हे बघण्यासाठी आपण समोर येतो तो कागद ओढतो की नाही? 

जज्जसाहेब : (निरागसपणाने कबूल करत) मी तं सोळा सह्या मारून बघतो मोजून!! वढ कागद आणि हाण सह्या, असा खाक्‍या ऱ्हातो आमचा!! हाओ, चेक तं करावंच लागते जी पेन!!

आरोपी : (तितक्‍याच निरागसपणाने) मीही तेच केलं, न्यायमूर्ती महाराज!! मीसुद्धा सोळा वेळा सही केली!! फक्‍त माझ्यासमोर कागदाऐवजी माणूस आला, इतकंच!!

जज्जसाहेब : (दाद देत) काय आर्ग्युमेंट आहे, राजेहो!! मान लिया!! तुम्हाले सांगतो, तुमच्या वकिलाले द्या तुम्ही ठेंगा!! म्हणावं, काई गरज नै तुह्यावाल्या वकिलीची!! त्याले बसून ठन ठन गोपाळ करत! तुम्हीच आरोपी आणि वकील पण तुम्हीच ऱ्हायजो!!  (फिर्यादी वकिलाकडे बघत) तुमचं अशील कुटंशी आहे भाऊ?

फिर्यादी वकील : (खोल आवाजात) मीच फिर्यादी आणि मीच वकील आहे, माय लॉर्ड!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com