गुप्तहेर! (ढिंग टांग)

गुप्तहेर! (ढिंग टांग)

प्रहर रात्रीचा होता...
दशकभराचे प्राणांतिक युद्ध
सहणारी वेशीवरली कवाडे
कडेकोट होती बंद. 
-पलीकडल्या खंदकात 
भुकेल्या मगरींचे थवे,
-खंदकाच्या गडग्यावर
हिंडणारे लांडग्यांचे कळप,
-गडग्यावर बसून घूत्कार
करणारी काही घुबडे,
-बुरुज-कमानींमधून फडफडणारी 
निशाचर वटवाघळे
एवढे सोडले तर
अवघे ट्रॉय सावध झोपले होते...
हेलनचे अपहरण करणाऱ्या
राजपुत्र पॅरिससकट.

‘जागते रहोऽऽऽ’च्या 
आरोळ्या ठोकत
पहारेकऱ्याने पलिता पुढे केला :
‘‘कोण रे तू? इथे कसा आलास?’’
मंद उजेडात क्षीण स्वरात
तो म्हणाला : सरदार, मी
सिनॉन...घोडे विकणारा व्यापारी!’’

‘‘मग तुझे घोडे कुठायत? इथे
धर्मशाळेत काय करतो
आहेस, अपरात्री?’’
पहारेकरी फिस्कारला.

‘‘किल्ल्याबाहेर 
पसरलेल्या ग्रीकांच्या
वेढ्यात काही घोडे मारले गेले,
काही लुबाडले गेले... आणि
काही खाल्ले गेले, सरदार!
ट्रॉयच्या आश्रयाला आलो आहे!’’
व्यापाऱ्याने मनधरणी केली.

हा लेकाचा हेर असावा! 
असलाच पाहिजे... अन्यथा
घनघोर युद्धकाळात 
अभेद्य ट्रॉयच्या दगडी चिऱ्यांच्या
सांदीफटीतून हा आत
आलाच कसा?
पहारेकऱ्याने त्याच्या
मुसक्‍या आवळल्या,
आणि त्यास उभे केले,
राजपुत्र पॅरिससमोर.
‘‘महाराज, मी एक साधासुधा
घोड्यांचा व्यापारी आहे. ग्रीकांनी 
फसविले..,’’ तो
म्हणाला कमालीच्या अजीजीने.

‘‘तू सिनॉन...नाही का? कुटिल
सिसिफसचा तू पुत्र तर नव्हेस?
कातडे पांघरून
लांडग्यांच्या कळपात
राहणारा बहुरूपी आहेस तू. 
तुला ओळखले आहे, गुप्तहेरा!’’
राजपुत्र पॅरिस कुत्सित
हसत म्हणाला.

‘‘गैरसमज महाराज, गैरसमज.
ट्रॉयच्या हितासाठी आपल्याला
एक गुप्त खबर देतो...
आपल्या पाडावासाठी ग्रीकांनी
एक गगनभेदी लाकडी घोडा
बनवला असून तो ते
देवादिकांना अर्पण करणार आहेत.
देवादिकांना काष्ठाश्‍वाची
आहुती दिली,
की ट्रॉयचा पाडाव होईल, अशी
त्यांची श्रद्धा आहे...’’
सिनॉन खालमानेने म्हणाला.
‘‘अस्सं? मग तो घोडा
ट्रॉयच्या मुख्य चौकातच
शोभून दिसेल... नाही का?’’
छद्‌मी हसत राजपुत्र पॅरिसने
लागलीच सैन्य दौडविले,
ग्रीकांच्या गोटात.
उडवली उरल्यासुरल्या
ग्रीक फौजांची दाणादाण,
आणि अजस्र चाकांवर 
स्वत: ओढून आणला तो
गगनचुंबी काष्ठाश्‍व.
‘‘व्हिक्‍टरी, 
व्हिक्‍टरी...ब्लड ब्लड!’’
आरोळ्या दुमदुमल्या
 ट्रॉयच्या किल्ल्यात.
 
‘‘हे गुप्तहेरा! देवादिकांचा अश्‍व
आणला आहे मी ओढून इथं.
तुझी फंदफितुरी तुलाच लखलाभ.
ट्रॉयच्या विजयोत्सवातच
तुला देत आहे...
मृत्यूदंडाचं बक्षीस!!’’
खदाखदा हसत राजपुत्र पॅरिसने
सर्रकन उपसली अजेय तलवार...

तेव्हा, एकाचवेळी
 दोन गोष्टी घडल्या...

‘‘ग्रीक साम्राज्य चिरायु होवो!’’
असे पुटपुटत सिनॉन वाकला,
आणि-
त्या प्रचंड घोड्याच्या पोटातून
अग्निलोळासारखे उतरलेले
झुंजार ग्रीक सैनिक 
ट्रॉयच्या गंडस्थळावर तुटून पडले.

...बेचिराख ट्रॉयचे भग्नावशेष
हल्ली पर्यटकांना दाखवले
 जातात म्हणे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com