खंयसर गेले दादा? (ढिंग टांग)

खंयसर गेले दादा? (ढिंग टांग)

पोलिटिकल जासुसीच्या धंद्यात आमचे नाव पहिल्यापासूनच फार्फार प्रसिद्ध आहे. त्याचे झाले असे, की मंगळवारी रात्री आमच्याकडे एक ‘क्ष’ व्यक्‍ती आली. तिने घाम पुसत आम्हाला विनंती केली, की आमचे नारोबादादा राणे ह्यांच्या हालचाली फार संशयास्पद वाटत असून, त्यांचे नेमके काय चालले आहे, ह्याची माहिती काढून पुरावा दिल्यास आभारी राहू. ती ‘क्ष’ व्यक्‍ती नांदेडला राहाणारी होती, एवढाच क्‍लू देतो. त्यांच्यासोबत जे गृहस्थ होते, ते दमलेल्या बाबासारखे दिसत होते. आम्ही शेरलॉक होम्सच्या शैलीत त्यांना थेट म्हटले, ‘‘ज्याअर्थी तुम्ही दमलेल्या बाबासारखे दिसत आहात, त्या अर्थी तुम्ही कराडला राहाता. हो ना?’’ गृहस्थाला घाम फुटला! पण ते असो. आम्ही मोहिमेला लागलो.

आमच्या एका खबरीने माहिती दिली, की इंडिगो कंपनीच्या एका विमानाचे तिकीट राणेदादा ह्यांनी काढले असून, विमान मुंबईहून अहमदाबादेत जाणारे आहे. आम्ही चपळाईने विमानात शिरलो. हवाईसुंदरीने आम्ही पायात बूट घातले आहेत की सॅंडल, तेवढे पाहून घेत ‘नअस्कार’ केला.

आम्ही कोल्हापुरी पायताण घातले होते. विमानात खायला-प्यायला काहीही नव्हते. अहमदाबाद विमानतळावर त्यांना घेण्यासाठी एक ‘मर्चिडिझ’ मोटार आली होती. आम्ही चपळाईने मोटारीच्या डिकीत जाऊन बसलो.
‘‘हयात कू लेना!’’ अशी आज्ञा दादांनी चालकाला दिली असावी! उभ्या हयातीत आम्ही पहिल्यांदाच मर्चिडिझमध्ये बसलो होतो. मांडी घालून बसता येईल, अशी ऐसपैस डिकी आहे; तसेच उभ्या हयातीत आम्ही पहिल्यांदाच ‘हयात’मध्ये चाल्लो होतो. आवळीत कावळो!! दुसरे काय?
रात्री साधारणत: नऊ वाजून ५५ मिनिटांनी आम्हाला एक इनोव्हा मोटार दिसली. त्या मोटारीच्या मागील बाजूच्या शिटेवर राणेदादा (कोटवाले) आणि देवेंद्रनाना (जाकिटवाले) बसलेले आम्ही प्रत्यक्ष ह्या डोळ्यांनी पाहिले.

आश्‍चर्य म्हणजे समोरच्या शिटेवर खुदबखुद नितेशजी राणे बसलेले आम्ही बघितले. त्याहून मोठे आश्‍चर्य म्हणजे त्यांच्या शेजारी आणखी एक इसम बसलेला होता, ज्यास आम्ही ओळखले नाही. तो बहुधा गाडीचा चालक असावा!! महाराष्ट्राचा मुख्यमंत्री अहमदाबादेत काय करीत आहे? कणकवलीचे नारोबादादा राणे अहमदाबादेच्या हयात हॉटेलात का उतरले आहेत? एक दणदणीत, सनसनाटी दृश्‍य आम्हाला मिळाले असून, ही उद्याची ब्रेकिंग न्यूज ठरेल, हे ओळखायला आम्हाला वेळ लागला नाही. आमच्याकडे एक सेकंड हॅंड मोबाइल फोन आहे. त्याने आम्ही ही चौकडी अचूक टिपली...आम्ही झटकन (ह्याही) गाडीच्या डिकीत शिरलो. (डिकीत शिरण्यात आमचा हात कोणीही धरणार नाही!! काय?) इनोव्हा गाडीला डिकी नसतेच, असे कोणी म्हणेल, पण अ-स-ते!! काय म्हणणे आहे?
कान देऊन आम्ही गाडीतील संभाषण ऐकू लागलो.

‘‘आवशीक खाव...गेल्या हप्त्यात दिल्लीक गेलो होतो! क्‍येवडो उकाडो! कपाळ नीसता उसाळला!!’’ दादा कोणाला तरी सांगत होते.
‘‘ त्यांना भेटलात? ते...तुमचे कांग्रेसवाले?’’ देवेंद्रनानांचा आवाज.
‘‘ कसले मेले ते कांग्रेसवाले? नावाचो शिलेदार, नशिबात दळिदार!!’’ दादांचा आवाज आला, ‘‘नितग्या रे, फुडसून लेफ्ट घे!!’’

शेवटचे वाक्‍य नितेशजींसाठी असावे. कारण गाडी डावीकडे वळल्याचे आम्हाला उजवीकडे कपाळ हापटल्यामुळे कळाले!! डाव्या दिशेला अमितशहाजींचे घर आहे, एवढे आम्हाला माहीत होते. आमच्या मनातील होकायंत्र जबर्दस्त क्षमतेचे आहे...

बराच वेळ गाडी पुढे जात राहिली. जात राहिली. जात राहिली...गाडीत शांतता होती. बऱ्याच वेळाने आम्ही डिकीतून बाहेर येऊन पाहिले तो काय! गाडी मंत्रालयाबाहेरच्या पार्किंगमध्ये उभी होती, आम्ही मुंबईत होतो. इथे कसे आलो, कळलेदेखील नाही...

पत्रकारांशी बोलताना राणेदादा तावातावाने ओरडले, की मेल्यांनू, शिरा पडो तुमच्या तोंडार...कर नाही त्येका डर कित्याक? आम्ही अहमदाबादेत अमितशहाजींना भेटलंय, ह्येका पुरावो काय?’’

...आम्ही ‘क्ष’ व्यक्‍तीची वाट पाहात बसलो आहे. पुरावा द्यायचा आहे ना!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com