वरणात खरोखर जग जगते..! (ढिंग टांग!)

editorial dhing tang
editorial dhing tang

आजची तिथी : हेमलंबीनाम संवत्सर श्रीशके 1938 वैशाख शुक्‍ल प्रतिपदा. 
आजचा वार : नमोवार...याने गुरुवार! 
आजचा सुविचार : इतुक्‍यात न येई वरणा! 

नमो नम: नमो नम: नमो नम: (108 वेळा लिहिणे) हे मी माझ्या खासगी डायरीत लिहितो आहे, पण जाहीर बोललो तर पुन्हा नागपूरला "विदर्भ एक्‍स्प्रेस'ने विनारिझर्वेशन जावे लागेल, ह्याची मला खात्री आहे. पण माझ्याविरुद्ध गेले काही महिने प्रचंड कट- कारस्थाने चालू असून, त्याचा आता कळस गाठला गेला आहे, यात शंका नाही. आमचे गुरुवर्य श्रीश्री नमोजी ह्यांच्याकडे फारशी डाळ शिजत नाही, हे बघून आमच्या विरोधकांनी चांगल्या चाललेल्या कारभारात खोडा घालण्याचे ठरवलेले दिसते. दुर्दैवाने (इलेक्‍शनबिलेक्‍शनांच्या नादात) मला ह्या कारस्थानाचा पत्ता लागला नाही. मी बेसावध होतो. पण आता त्याची खात्रीच पटली आहे. त्याचे झाले असे की... 

"सर, प्रॉब्लेम झालाय सर...तूरडाळ उरलीये जाम!'' पीए घाबऱ्याघुबऱ्या म्हणाले. 
"हात्तीच्या, मग त्याची आमटी करून द्या. चांगली लागते गा...,'' मी तोडगा सुचवला. 
वास्तविक आमटी हा माझा वीकपॉइंट आहे, पण गेल्या काही दिवसांत मी आमटीचा एकही भुरका मारलेला नाही हेही एक सत्य आहे. घरापासून पाचशे मीटरच्या आत तूरडाळच आलेली नाही, तर आमटी कुठून भुरकणार? 
"तसं नाही सर, खूपच उरली आहे..!'' पीए म्हणाले. 

"खूप म्हंजे किती? अहो, महागामोलाची वस्तू अशी उरून उरून उरणार किती?'' मी त्यांना चांगलेच झापणार होतो, पण कोणीही वरणभाताबद्दल बोलू लागले की माझे मन द्रवते. गोळाभर वरणभाताची चिंता ज्याला सतावते, त्याला आणखी काय बोलायचे? 
"पंधरा लाख टन!'' ते म्हणाले. 

"काय? पंधरा लाख?'' मी ओरडलो. पूर्वीच्या काळी महाराष्ट्र लॉटरीची एक जाहिरात दूरदर्शनवर लागत असे. ""ग्यारा लाख?'' असे तो जाहिरातीतला इसम ओरडत असे. (जणू काही अकरा लाख म्हंजे विजय मल्ल्याच्या कर्जापेक्षाही ज्यास्त!) अगदी तस्सा मी ओरडलो. 

"होय सर, पंधरा लाख टन तूरडाळ पडून आहे सर!'' पीए रडकुंडीला आले होते. 
"अहो, एवढी डाळ पिकवली कुणी?'' अवघा महाराष्ट्र डाळीचे कोठार झाला असून, डाळीच्या प्रचंड डोंगरावर आमचे डाळमंत्री गिरीशभाऊ बापटमास्तर झेंडा रोवून उभे आहेत, असे चित्र माझ्या डोळ्यांसमोर तरळले. घटकाभर निपचित पडलो. 

"सर, काही होतंय का सर?'' पीएची कढी पातळ झाली होती. 

"आमटी आणा, आमटी...आपलं ते हे...पाणी, पाणी!!'' शुद्धीवर येत मी म्हणालो. पीएने पाणी आणून दिले. का कुणास ठाऊक, मला ते तूरडाळीच्या आमटीसारखे लागले. वास्तविक डाळ महागल्यानंतर आम्ही वरण सोडले आहे. (लोक काय काय सोडतात, आम्हाला वरण सोडावे लागले! असो.) डाळ स्वस्त होईपर्यंत आमटी मिळणार नाही, असा वटहुकूमच आमच्या सैपाकघरातून निघाला होता. काय करणार? (त्यानंतरच, क्‍याबिनेट मीटिंगमध्ये एकत्र डबा खायची आयडिया मला सुचली!! असो!) खोल आवाजात मी पीएंना सांगितले, ""ताबडतोब बापटमास्तरांना फोन लावा!!'' त्यांनी फोन लावून दिला. 

""अहो, मास्तर, काय झालं डाळीचं?'' मी विचारले. त्यावर बापटमास्तरांनी "उद्या डब्यात आणतो. आज मटकीची उसळ आहे!' असे विचित्र उत्तर दिले. मी फोन ठेवून दिला. 

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला आज वरणभाताचा प्रश्‍न सोडवावा लागणार नाही. भाताचे जमवता येईल, पंधरा लाख टन डाळीचे वरण शिजवणे ही काही चेष्टा नव्हे!! पंधरा लाख टन डाळीचे काय करायचे? हा महाराष्ट्रापुढला ज्वलंत सवाल असला, तरी माझ्यापुढला सवाल "एवढी डाळ पिकलीच कशी आणि कुणाची?' हाच आहे. आमची पुढली सगळी टर्म डाळीत जाणार, असे दिसते. चालायचेच. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com