डाळ : एक शिजणे! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी | Wednesday, 3 May 2017

हवामानाचा अंदाज आला नाही की अनर्थ होतो. ह्या बेभरवशी हवामानामुळेच आज महाराष्ट्रातील शेतकरी हवालदिल झाला आहे. सुगीच्या दिवसात थोडे उगी बसावे, त्या काळात महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांना आज तुरीच्या पोत्यांवर पहारे देत बसावे लागत आहे, ह्या परिस्थितीला कोण जबाबदार आहे? ये जालीम हवा!! हवेसारखी घातकी गोष्ट दुनियेत नाही. ऐनवेळी तिची मान कुठल्या दिशेने वळेल, सांगता येणे कठीण. परंतु, अहह! त्याचे खापर आमचे तारणहार आणि अखिल शेतकऱ्यांचे परममित्र जे की श्रीमंत नानासाहेब फडणवीस ह्यांच्यावर फोडण्यात येत आहे.

हवामानाचा अंदाज आला नाही की अनर्थ होतो. ह्या बेभरवशी हवामानामुळेच आज महाराष्ट्रातील शेतकरी हवालदिल झाला आहे. सुगीच्या दिवसात थोडे उगी बसावे, त्या काळात महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांना आज तुरीच्या पोत्यांवर पहारे देत बसावे लागत आहे, ह्या परिस्थितीला कोण जबाबदार आहे? ये जालीम हवा!! हवेसारखी घातकी गोष्ट दुनियेत नाही. ऐनवेळी तिची मान कुठल्या दिशेने वळेल, सांगता येणे कठीण. परंतु, अहह! त्याचे खापर आमचे तारणहार आणि अखिल शेतकऱ्यांचे परममित्र जे की श्रीमंत नानासाहेब फडणवीस ह्यांच्यावर फोडण्यात येत आहे. आम्ही येथे निक्षून सांगतो की महाराष्ट्रातील शेतकरी तूरडाळीच्या पोत्यांवर तिष्ठत बसून राहण्याला श्रीमंतनाना जबाबदार नाहीत! नाहीत!! नाहीत!! इनफ इज इनफ. तूरडाळीच्या समस्येवर समाधान काढण्यासाठी आम्ही तांतडीने ‘वर्षा’ बंगल्यावर जाऊन श्रीमंतनानांना भेटलो. सदरेवर बसून ते पोत्यांची आकडेमोड करीत होते...

‘‘शतप्रतिशत प्रणाम, नानासाहेब!,’’ विनम्रतेने आम्ही.
...पण नानासाहेबांचे अज्जिबात लक्ष नव्हते. कागदावर गिचमीड करत, बोटे मोडत त्यांचा कसला तरी हिशेब चालला होता. ‘‘कसला हिशेब मांडताय, नानासाहेब? महाराष्ट्राचे गणित तर आपण फक्‍कड जमवत आणले आहे...,’’ आम्ही पुनःश्‍च मखलाशी केली. अचानक पुढ्यातील नस्तीतून डोके वर काढून त्यांनी आमच्याकडे रडतमुखाने पाहियले.

‘‘वीस लाख टन तूरडाळ पिकवली हो ह्यांनीऽऽऽ! वीस लाख!! असं कुणी करतं काऽऽऽ?,’’ डबडबलेल्या डोळ्यांनी नानासाहेब म्हणाले. आम्ही त्यांना कनवटीचा रुमाल दिला. तो निरखून त्यांनी नाक मुरडत परत केला. प्रकर्ण गंभीर आहे, हे आम्ही तात्काळ वळखले. 

‘‘गुदस्ता तूरडाळ कमी पडली म्हणोन आम्ही साधे वरण सोडले. पिठल्यावर भागवलें!! आता नुसते वरण ओरपावें लागणार!!’’ नानासाहेबांना भविष्य दिसू लागले असावे. शेतकऱ्यांच्या तूरडाळीच्या शेवटच्या दाण्यापर्यंत खरेदी करू, असे त्यांनी आधीच जाहीर करून ठेवले होते. तिथेच गोची जाहली होती!  ‘‘ महाराष्ट्रातला शेतकरी आज डाळीच्या पोत्यांवर बसून आपल्याकडे दृष्टी लावून बसला आहे, नानासाहेब!’’ आम्ही म्हणालो. 

‘‘आज शेतकरी डाळीच्या पोत्यांवर बसला आहे, महिनाभराने आम्हाला बसावे लागणार आहे, त्याचे काय?’’ नानासाहेबांनी प्रतिप्रश्‍न केला.

आमच्यापाशीं त्याचे उत्तर नव्हते. महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी वीस लाख टन तूरडाळ पिकवून ठेवली. आता इतक्‍या तूरडाळीचे काय करायचे? 
‘‘आपल्या शेतकऱ्यांचे नाही म्हटले तरी चुकलेच!,’’ आम्ही नानासाहेबांच्या बाजूने थोडके सहानुभूतीने बोललो. 

‘‘आम्हांला किंचित डोळा लागला, तेवढ्यात काही व्यापाऱ्यांनी चारशे कोटींचा डाळघोटाळा केलान..!,’’ दातओठ खात नानासाहेब म्हणाले. आम्ही म्हटले, आता ह्या व्यापाऱ्यांची डाळ शिजणे अशक्‍यच. बराच वेळ शांततेत गेला. डाळ शिजल्यासारखी कुकरची शिट्टी वाजल्यासारखा आवाज करत नानासाहेब उपरणे सावरत ताडकन उठले. खिडकीशी जात गर्रकन वळले. म्हणाले- ‘‘ठरलें! ना रहेंगा बांस, ना बजेंगी बांसुरी!! येत्या पावसकाळात शेतकऱ्यांना एवढी तूर पिकवू देणार नाही! गावोगाव आम्ही हवामान खात्याचे खांब उभे करू. गारपीट, अवकाळी, वादळवारे, पाऊस...हवामानाचे झाडून सारे अंदाज आधीच घेवोन, मोजकें पीक घ्यावयाचे धोरण आम्ही राबवू! ह्या बेभरवशी हवामानाची हवा टाइट करणे, हे फक्‍त ह्या नानासाहेबालाच जमेंल! कळलें?’’ 

शेतकऱ्यांसाठी येवढे कोण करते? केवळ शेतकऱ्यांसाठी पंचमहाभूतांना खांबाला बांधण्याचे हे अचाट कर्म कुणाला साधते? हवेची मान कोण पकडते? अर्थात श्रीमंत नानासाहेब! 

‘‘महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी किती किती करतां, नानासाहेब! किती कळवळा आहे, तुमच्या मनात! किती कोमल हृदय तुमचे!,’’ सद्‌गदित स्वरात आम्ही म्हणालो. 

‘‘शेतकऱ्यांसाठी नव्हे, हे आमच्यासाठी आहे...,’’ नानासाहेब गरजले; ‘‘ अन्यथा, पुढल्या खेपेला पुन्हा कोण वीस लाख टन तूरडाळीच्या पोत्यांवर बसेल.?’’