पुस्तकांच्या गावा जावे; पण..! (ढिंग टांग)

पुस्तकांच्या गावा जावे; पण..! (ढिंग टांग)

महाबळेश्‍वराच्या डोंगरात पाचगणी रोडवरील भिलार नावाच्या स्ट्रॉबेरीएवढ्या गावात ‘पुस्तकांचे गाव’ वसवून आमचे ग्रंथमित्र मंत्री (किंवा ग्रंथमंत्री मित्र!) जे की मा. विनोदवीर तावडेजी ह्यांनी मराठी सारस्वतावर मोठेच उपकार करून ठेविले आहेत. येथील घरोघरी पुस्तकांचे गठ्ठे टाकून विनोदवीर ह्यांनी संपूर्ण गावाचा कायापालट (कापडी बांधणी) साधला असून, तो अत्यंत अभिनंदनीय आणि स्तुत्य आणि कौतुकास्पद असा उपक्रम आहे, ह्यात प्रत्यवाय नाही. वाचकहो, हा दुग्धशर्करा किंवा मणिकांचन योग म्हणावा लागेल. स्ट्राबेऱ्यांच्या मागावर (महाबळेश्‍वरी) आलेल्या पर्यटकाच्या हाती पुस्तके ठेवावीत आणि पुस्तके बघावयाच्या मिषाने डोकावणाऱ्या ग्रंथप्रेमीसमोर ताज्या स्ट्राबेऱ्या याव्यात, हा मराठी सारस्वताच्या अंगणातील एक दुर्मिळ योग नव्हे तर काय आहे? असो. 
‘पुस्तकांचे गाव’ ह्या उपक्रमात सहभागी होऊन एकादे फक्‍कडसे पुस्तक हाती घेऊन महाबळेश्‍वरच्या कडेकपारीत बसून छानपैकी वाचन करावे, हे आमचे फारा दिवसांपासूनचे स्वप्न होते. मा. विनोदवीरांच्या प्रयत्नामुळे ते आता साध्य होईल. पाय सोडून पुस्तक वाचत बसावे, असा कडा आम्ही सध्या महाबळेश्‍वरात शोधत आहो. सापडल्यास पुढेमागे त्याचे नाव ‘विनोदवीर पॉईंट’ असे ठेवावे, ही सूचना आम्ही आत्ताच करून ठेवीत आहो. पुन्हा असो.

आम्ही स्वत: एक निस्सीम ग्रंथप्रेमी असून, ग्रंथवाचन हे आमच्या आणि मा. विनोदवीर ह्यांच्यातील स्नेहाचे एकमेव सूत्र आहे, ह्याची वाचकांना नम्र जाणीव करून देणेही येथे सयुक्‍तिक ठरावे. मा. विनोदवीर ह्यांना आम्ही बालपणापासून वळखतो. किंबहुना बालभारतीच्या पुस्तकावरील पुस्तक वाचनात गढलेला एक अभ्यासू विद्यार्थी आणि विद्यार्थिनी (दोन वेण्या) सर्वांच्याच परिचयाच्या असतील. त्यातील अभ्यासू विद्यार्थी हे दुसरे तिसरे कोणीही नसून आपल्या विनोदवीरांचेच छायाचित्र असल्याचे आम्हास कळले आहे!! सदर विद्यार्थिनीचा (दोन वेण्या) शोध अद्याप सुरू आहे. तेही एक असो.

वास्तविक भिलार हे गावाचे नाव नसून ख्यातकीर्त उत्खननकार आणि इतिहासकार आणि टीकाकार रा. सर भालचंद्र नेमाडे ह्यांच्याच कादंब्रीचे नाव असावे, असा आमचा प्रारंभी गैरसमज होता. (वाचा : बिढार, जरीला, झूल इ.) त्यांच्या सुप्रसिद्ध चांगदेव चतुष्टयातील ही पाचवी कादंब्री असल्याच्या समजुतीत आम्ही सदतीस पानी समीक्षा लिहून तयारही ठेविली होती. ‘हिंदू’प्रमाणेच ‘भिलार’ (वीसेक वर्षात) येईल तेव्हा येईल, असा त्यामागील आमचा विचार होता. तथापि, ते गावाचे नाव निघाले! आमचा नाही म्हटले तरी हिरमोड झाला.

आम्ही प्रारंभीच म्हटल्याप्रमाणे, पुस्तकांचे दुकान ही वस्तू नामशेष होत असतानाच आख्खे गावच्या गाव पुस्तकांचे गावावे, हा योगायोग साधा मानता येणार नाही. हे म्हंजे रा. सर नेमाडे ह्यांनी खान्देशी घंगाळ शोधावयास जावे आणि हाती हराप्पा-मोहंजोदारोसारखे गावच उत्खननात सांपडावे, त्यापैकी झाले. पण ते जाऊ दे. काहीही ‘हिंदु’ म्हटले की आम्ही (न वाचताच) नाक मुरडणारे, म्हंजे कांग्रेसवाले! त्यामुळे सदर योजनेस प्रारंभी आम्ही सामूहिक नाके मुरडली होती. किंबहुना, ही आमच्या राजवटीतील योजनाच होती, (गांधी किताबग्राम योजना) पण कमळवाल्यांनी ढापली असाही आरोप करण्याच्या बेतात होतो. पण वेळीच गप्प राहिलो! अखेर आम्ही स्वत:च त्या गावास भेट देण्याचे ठरवले. मजल दरमजल करीत तेथे पोचलो...

छान रंगवलेली घरे. त्यावर विविध लेखकांची गंमतीदार चित्रे. घराच्या आत पुस्तकवाचनाची ओवरी. पुस्तकांनी भरलेली कपाटे...आणि (मागितल्यास) स्ट्राबेरी असा सारा माहौल होता. उदा. एका घरावर ‘पुलं’चे चित्र बघून आम्ही आत गेलो, तर आतून ‘खो खो खो’ असे सातमजली आवाज!! एका आनंदओवरीतून तुकोबाचे अभंग ऐकू येत होते!! दुज्या एका घरातून हुंदका आल्याने तेथे काव्यसंग्रह ठेवलेले असावेत, असा आमचा ग्रह झाला!! अखेर दमून भागून आम्ही एका चित्रविरहित घरात डोकावलो. तेथे अपार शांतता होती. एक गृहस्थ हातातील पुस्तकाने स्वत:स वारा घालत निवांत बसला होता. आम्हाला बघून तो थंडपणाने म्हणाला : स्ट्राबेऱ्या संपल्या...उद्या या!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com