भिलार - काही सूचना! (ढिंग टांग)

भिलार - काही सूचना! (ढिंग टांग)

महाबळेश्‍वराच्या कुशीतील जेमतेम साडेतीनशे उंबरा भिलार गावातील पंचवीस उंबऱ्यांआड काही पुस्तके ठेविली असून, ती वाचनासाठी आहेत, ह्याची पर्यटकांनी कृपया नोंद घ्यावी. पर्यटकांनी येथे यावे, स्ट्रॉबेऱ्यांसमवेत पुस्तक-वाचनाचा आनंदही लुटावा, अशी यामागील कल्पना आहे. (स्ट्राबेऱ्या विकत घ्याव्यात!) तथापि, येथे येणाऱ्या पुस्तकप्रेमी पर्यटकांसाठी (किंवा पर्यटनप्रेमी वाचकांसाठी) काही मौलिक सूचना करीत आहो. त्या लक्षपूर्वक येथेच वाचाव्यात, आणि मगच भिलारला जाण्यासाठी ब्याग भरावी, ही विनंती.

१. येथील सर्वच्या सर्व (वट्‌ट पंधरा हज्जार) पुस्तके मराठी आहेत. (खुलासा : हा इशारा अथवा धमकी मानू नये! निव्वळ इन्फर्मेशन आहे...) इंग्रजी पुस्तके नाहीत का? असे (उगाचच) विचारून यजमानांची कुचंबणा करू नये. अपमान होईल!

२. यजमान यजमान आहेत, ग्रंथपाल नाहीत, हे समजून असावे. ‘जरा एक विश्‍वास पाटील घ्या’ किंवा ‘दोन मिरासदार काढा’ अशा ऑर्डरी सोडू नयेत. हे हॉटेल नाही, पुस्तकांचे गाव आहे!

३. वाचून झाल्यावर पुस्तके जिथल्या तिथेच ठेवावीत. तसेच पुस्तकांचे कोपरे दुमडू नयेत. ती वाईट सवय आहे! 

४. पुस्तके वाचण्यासाठी असतात. पेन्सिलीने त्यावर ‘सपना आय लौयू’ किंवा तत्सम शृंगारिक मजकूर लिहिल्यास पोकळ बांबूचे फटके मिळतील!

५. पुस्तके पाडल्यावर नायिका भेटते, हे हिंदी चित्रपटातील दृश्‍य येथे वास्तवात उतरू शकेल, हा भ्रम बाळगू नये. पुस्तके पाडल्यास क्र. चारच्या सूचनेचाच अवलंब होईल!

६. पुस्तकांच्या गावात सर्वत्र सीसीटीव्ही लावण्याची योजना आहे. तेव्हा पुस्तके चोरू नयेत!! चोरल्यास पुस्तकाची किंमत आणि दुप्पट दंड आकारण्यात येईल!!

७. पुस्तके चोरण्यापेक्षाही भयंकर गुन्हे ह्या गावात घडू शकतात, ह्याची सरकारी यंत्रणेला जाणीव आहे. काही प्रकाशक आपापली (न खपणारी) पुस्तके येथील कपाटांमध्ये चोरून ठेवून पळून जाण्याच्या प्रयत्नात आहेत, असा गुप्त पोलिसांचा अहवाल प्राप्त झाला असून, ही बाब मराठी साहित्याच्या मुळावर येणारी आहे!! सबब, अशा गुन्हेगारास पुस्तकाची किंमत आणि वीसपट दंड आकारला जाईल!! शिवाय क्र. चारच्या सूचनेतील शिक्षा ठोठावण्यात येईल.

८. भिलार गावामध्ये हिंडणाऱ्या पर्यटकांस काही कविप्रकृतीचे इसम त्रास देत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. भर चौकात पर्यटकाच्या शर्टाचे कोपर ओढून आपली कविता ऐकवण्याचा आग्रह धरणाऱ्या कविमंडळींवर भा. द. वि. ४२० कलमानुसार चाप्टर केस लावण्यात येईल.

९. संशयित कवींची यादी तयार करण्यात येत असून, दाखलेबाज कवींची छायाचित्रे (फ्रंट आणि साइड पोज) भिलार पोलिस चौकीत लावण्यात येतील!

१०. प्रकाशकास सूचना : भिलार गावातील प्रमुख रस्त्यांवर ‘नो हॉकर्स झोन‘ घोषित करण्यात आला आहे. उगीच टेंपो आणू नयेत!

११. लेखकांस सूचना : हे पुस्तकांचे गाव आहे. लेखकांचे नाही!! तेव्हा ‘होल वावर इज आवर’ ह्या तोऱ्यात वावरू नये! कुठल्याही घरात शिरले तरी आपल्याला चहा फुकट मिळेल, अशा समजात राहू नये. बिल हातात ठेवले जाईल.

१२. पत्रकारांस सूचना : आपल्या जमातीचा जरा प्रॉब्लेमच आहे, साहेब! तुम्ही स्तंभ लिहून त्याची पुस्तके करता, आणि लेखक म्हणवता. पुरस्कारसुद्धा मिळवता!! तुम्ही स्वत:ला लेखक समजता, पण लोक समजत नाहीत, हे जरा समजून घ्या, साहेब! आपली पुस्तके ह्या गावात घुसवता येतील का, ह्यासाठी मंत्रालयात फेऱ्या मारू नयेत! थॅंक्‍यू!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com