युद्धरंग! (ढिंग टांग)

- ब्रिटिश नंदी
गुरुवार, 2 फेब्रुवारी 2017

भल्या पहाटे-
उपप्लव्य नगरीतून रातोरात
दाखल झालेल्या वासुदेव कृष्णाने
विदुराघरीच किंचित विश्राम घेण्याचे
ठरवले खरे, पण
समय वाया न दवडता तो थेट
धृतराष्ट्राच्या महालातच गेला...

भल्या पहाटे-
उपप्लव्य नगरीतून रातोरात
दाखल झालेल्या वासुदेव कृष्णाने
विदुराघरीच किंचित विश्राम घेण्याचे
ठरवले खरे, पण
समय वाया न दवडता तो थेट
धृतराष्ट्राच्या महालातच गेला...

माध्यान्ही-
‘‘यादवा, माझा पिता दृष्टिहीन असला,
तरी मी आंधळा नाही!
सुईच्या अग्रावर मावेल, इतकी
भूमीदेखील देणार नाही... जा,
सांग त्या फुसक्‍या युधिष्ठिराला,
नाचऱ्या पार्थाला आणि बैलबुद्धीच्या
भीमाला...,’’ थय थय पाय आपटत
ताडताड बोलला दुर्योधन.
आंधळ्या धृतराष्ट्राला ऐकू आले नाही,
आणि बहिऱ्या भीष्माला दिसले नाही!
विदुराची तर जन्मादारभ्य दांतखीळ
बसलेली... कर्ण तेवढा भीषण हसला. 

सायंकाळी-
‘‘शिष्टाई फोल गेली, कुंतीमाते.
आता युद्ध अटळ आहे...’’
गळ्यावरचे घर्मबिंदू उपरण्याने
टिपत वासुदेव कृष्ण उद्‌गारला.
कुंतीमातेने पुढे केलेला
दुधात शिजवलेल्या भाताचा द्रोण
दूर सारत तो किंचित हळहळला.

‘‘ह्यात नवे वृत्त काय वासुदेवा?
द्रौपदीच्या वस्त्राला दुर्योधनाने
भर सभेत घातला हात, तेव्हाच
युद्धाची ठिणगी पडली होती ना?’’
‘‘काय मागत होती माझी मुलं?
काय मागत होती, अं?
पाच खेडी दिलीत, तरी
चालेल, असंच म्हणत होती ना?
दुर्योधनाच्यानं तीही सुटली नाहीत...,’’
कुंती हताशेने म्हणाली.

‘‘युद्ध अटळ आहे, हे मलाही
होतेच ठाऊक, पण तरीही
आपला विवेक निर्मळ ठेवण्यासाठी
केला मी हा शिष्टाईचा खटाटोप...’’
किंचित पडलेल्या स्वरात
म्हणाला वासुदेव.

‘‘खटाटोप केलास की नाटक?’’
कडवटपणाने विचारलेच कुंतीने.
तुला युद्ध नको असतं, तर
तू नियतीदेखील बदलली असतीस,
युगंधरा! 
पांडुची मुले आणि कुरुंची पिलावळ
दोन्ही तुझ्यालेखी निव्वळ दोन पक्ष!
त्यातील नात्यागोत्यांचे पदर
बंधुत्वभाव ह्याला तुझ्यालेखी
काहीच नव्हते मूल्य. 
युद्ध तुला हवं होतं वासुदेवा,
दुर्योधन किंवा भीमापेक्षाही
अधिक ते तुला हवं होतं... तुला.’’

खाली मान घालून बसलेला
वासुदेव कृष्ण काही बोलला नाही,
पण त्याच्या मौनात होते
काही अटळ आसवे. 
दबलेली वेदना.
रात्रीचा प्रथम प्रहर-
अश्रूंचा प्रपात न थांबवता
शेवटी कुंती म्हणाली,
‘‘विधवेने पसरलेल्या पदरात
फारसे काही पडत नाही,
हे ठाऊक आहे मला... पण
तरीही, अटळ अशा या युद्धात
सख्खी भावंडे तरी एकमेकांच्या
छातीचा वेध घेणार नाहीत,
असं बघ... बघशील का?’’
अश्रूंचा प्रपात रोखण्याचा
प्रयत्न सोडून कुंती म्हणाली.

उत्तररात्री-
मूकपणे मान डोलावून
वासुदेवाने उपरणे उचलले,
तो निघाला.
द्वाराशीच थबकून तो म्हणाला :
‘‘माते, ज्या बंधुत्वाचा बडिवार
मला सांगते आहेस, ते बंधुत्व
येथे होतेच कुठे?
होती ती निव्वळ 
जन्मजात जळजळ,
कुलीन कपट आणि 
स्वार्थी साठमारी.

थोडं थांबून तो म्हणाला :
होय, युद्ध हवं होतं कारण...
राजकारणात आणि युद्धात
बंधूच्या भूमिकेतील शत्रूपेक्षा
शत्रूच्या भूमिकेतला बंधू
केव्हाही लढायला सोपा असतो..
केव्हाही.’’

...एवढे बोलून तो युगंधर 
त्वरेने रथाकडे निघाला.
तेव्हा नवा सूर्य उगवत होता.

Web Title: editorial dhing tang artical