टायगर अँथम! (ढिंग टांग!)

dhing tang
dhing tang

प्रिन्स विक्रमादित्य : (दार ढकलत) हाय देअर बॅब्स...मे आय कम इन?
उधोजीसाहेब : (जड अंत:करणाने) कशाला? नको!
विक्रमादित्य : (उजळलेल्या चेहऱ्यानं) एक गुड न्यूज द्यायची होती!!
उधोजीसाहेब : (कटवत) ही गुड न्यूज ऐकायची वेळ नाही! आम्ही ऑलरेडी दु:खात आहोत!!
विक्रमादित्य : (कुतूहलानं) तुमच्याकडे बॅड न्यूज आहे?
उधोजीसाहेब : (दु:खी सुरात) होय! अगदीच वाईट बातमी!
विक्रमादित्य : (खोलीत शिरत) मग तुम्ही आधी बॅड न्यूज सांगा! आपल्या दोघांचाही मूड गेला की मी गुड न्यूज सांगीन! मग आपला मूड परत येईल!! करेक्‍ट ना?
उधोजीसाहेब : (दु:खभराने आवंढा गिळत) आपल्या महाराष्ट्रात किनई...किनई...गेल्या अठ्ठेचाळीस तासांत...सात वाघ मेले! (कपाळाला हात लावत) हे दिवस येतील, असं वाटलं नव्हतं!!
विक्रमादित्य : (गंभीर होत) ओह...सो सॉरी टु हिअर! आता मी गुड न्यूज सांगू?
उधोजीसाहेब : (खवळून) सात वाघ मेले, सात!! ह्यानंतर कुठली गुड न्यूज सांगणार आहात? इथं आमचं हृदय पिळवटून निघालं आहे! वाघासारखे वाघ असे टपाटप जात असताना हे राज्यकर्ते काय करत आहेत? असा आमचा सवाल आहे!!
विक्रमादित्य : (निरागसपणाने) आपणच राज्यकर्ते आहोत ना पण?
उधोजीसाहेब : (गडबडून) नाही...म्हंजे टेक्‍निकली आहोत, पण बायोलजिकली नाही!!
विक्रमादित्य : (आणखी निरागसपणाने) म्हंजे आपण अपोझिशनवाले आहोत?
उधोजीसाहेब : (आणखी गडबडून) छे, छे...भलतंच! म्हंजे टेक्‍निकली नाहीओत, पण बायोलजिकली...
विक्रमादित्य : (दुर्लक्ष करत) हंऽऽ...गॉट युअर पॉइण्ट!
उधोजीसाहेब : (विचारात मग्न होत) काहीही करून वाघ वाचवले पाहिजेत!
विक्रमादित्य : (चुटकी वाजवत) आयडिया! मी मुनगंटीवारअंकलना फोन करून टायगर बचाव कॅम्पेन सुरू करायला सांगतो! त्यांनी आपल्याला भलामोठा टायगर गिफ्ट केला होता गेल्या वर्षी...पण तो फायबरचा होता!!
उधोजीसाहेब : (कडवटपणाने) काही नको सांगायला त्यांना!!
विक्रमादित्य : (दोन चुटक्‍या वाजवत) मग देवेनअंकलना सांगतो!
उधोजीसाहेब : (अजीजीने) त्यांना सांगून कामं झाली असती तर ही वेळ कशाला आली असती आपल्यावर? महाराष्ट्राच्या जंगलात वाघ सुरक्षित नाही! जंगलाबाहेर गावात शेतकरी सुरक्षित नाही! गावाबाहेर शहरात मध्यमवर्गीय माणूस सुरक्षित नाही!!..इथं वाघ मरताहेत, आणि हे गाणीबिणी म्हणून नद्या वाचवताहेत! अरे, वाघ वाचवा म्हणावं!! नद्या कसल्या वाचवता?
विक्रमादित्य : (आश्‍चर्यानं) गाणी म्हणून? कोणी म्हटलं गाणं?
उधोजीसाहेब : (दुप्पट आश्‍चर्यानं) तुला माहीत नाही? तुझ्या देवेनअंकल आणि मुनगंटीवार अंकलनी एका व्हिडिओमध्ये गाणं म्हटलंय...चल चल मुंबई संग चल, हु:!! अशी गाणी म्हणून नद्या वाचल्या असत्या तर सिंचन घोटाळा झालाच नसता!!
विक्रमादित्य : (बुचकळ्यात पडत) तरीच!
उधोजीसाहेब : (वैतागून) तरीच काय तरीच?
विक्रमादित्य : (खुलासा करत) तीच गुड न्यूज देणार होतो!! टी-सीरिजमधून मला फोन आला होता!! तुम्हाला शेतकरी अँथम करायचं आहे का? असं ते विचारत होते! महाराष्ट्रात ज्या ज्या गोष्टी उद्‌ध्वस्त होतायत, त्यांच्याबद्दल एकेक अँथम करायची त्यांची ऑफर आहे! शेतकरी अँथम, बॅंका अँथम, मिडल क्‍लास अँथम, बेरोजगार अँथम, एसटी अँथम...झालंच तर...
उधोजीसाहेब : (संयम पाळत) गप्प बस...नाही तर..!!
विक्रमादित्य : (खुल्ली ऑफर देत) तुम्हाला टायगर अँथम करायचं आहे का? बोला, गाण्याचे बोल मीच लिहिलेत! (गाणं म्हणत) चल, चल जंगल में चल, टायगर को ढूंढने चल, फोटो खींचके आयेंगे, किसने देखा है कल....
उधोजीसाहेब : (संतापून चाल करत) हर हर हर हर महादेऽऽव!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com