नवे बालगंधर्व! (ढिंग टांग)

dhing tang
dhing tang

ब ने, बने, किती वेंधळ्यासारखी वागतेस. तू पुण्यात आहेस हे विसरू नकोस. इथं हुशार माणसासारखं जगावं लागतं. हे हेल्मेट घाल आणि चालू लाग बरं! इथं पादचारी हेल्मेट घालतात, वाहनधारक नाही. त्यातून हा आहे सुप्रसिद्ध जंगली महाराज रोड. इथे हेल्मेट अगदी मस्ट असतं हं! इथे काय मिळत नाही? बुद्धिमान, रसिक, परिपक्‍व, सुजाण आणि जागरूक अशा नागरिकांचा हा रस्ता आहे. पलीकडल्या फर्गसन रस्त्यावर जमणारी काही चुकार टाळकी टाळायची असतील, तर सुजाण पुणेकर ह्या रस्त्यावर आपोआप सांडतात...असा आहे हा रस्ता.

बने, इथं पाय जपून टाक...हा रस्ता प्रचंड ऐतिहासिक आहे. काय म्हणालीस? पुण्यात सगळंच ऐतिहासिक आहे? बरोबर, अगदी बरोबर! पण हा रस्ता काहीच्या काहीच ऐतिहासिक आहे. इतका की...जाऊ दे. बने, आता किनई मी तुला एक सुपरऐतिहासिक वास्तू दाखवणार आहे. मनाची तयारी ठेव हं!! डोळे मिट पाहू? हंऽऽ...आता उघड! समोर बघ, काय दिसतंय...ती पहा! बघितलीस? छे, छे, अगं हा काही मॉल नाहीए! मल्टिप्लेक्‍ससुद्धा नाही...हे आहे एक छानसं थिएटर. चल, आपण आत जाऊन पाहू या!!

मल्टिप्लेक्‍ससारखं हे नाट्यगृह बघून चाट पडलीस ना? साहजिकच आहे. इथं एकाच वेळी चार-चार नाटकं चालू शकतात. काय म्हणालीस? इतकी नाटकं एकाचवेळी कशी बघायची? त्यासाठी तुला पुणेकर व्हावं लागेल!! पुणेकर रसिकांची बौद्धिक आणि कलात्मक भूकच इतकी जबरदस्त आहे की विचारू नकोस. नाट्यगृहाच्या बाहेर एक शानदार मंडईदेखील आहे. म्हंजे नाटकाला आल्यावर इथंच पटकन अर्धा लिटर दूध, दोन लिंबं, मिरच्या-कोथंबिर, पाव...असं काहीबाही घेऊनच घरी जायचं किंवा उलटंसुद्ध चालेल!! मटार घ्यायला यायचं आणि लगेहाथ नाटकाचा प्रयोग बघून परत जायचं. आहे की नाही आयडिया?
कोपऱ्यात दिसतंय, ते मॅक्‍डोनाल्ड वाटलं ना तुला? खुळीच आहेस. पुण्यात ‘मिसळ जॉइण्ट’ कमी पडतात हल्ली. शिवाय ह्या कोपऱ्यात आपले सुप्रसिद्ध चितळे बंधू आहेतच. बाहेरगावचा पाहुणा नाटक बघायला चुकून आलाच, तर इथूनच त्यानं बाकरवडी न्यायची असते. नाही, नाही, भलते गैरसमज करून घेऊ नकोस. खरा पुणेकर कधीही बाकरवडी आवडीने घरी नेत नाही.

बने, जरा जपून...इथं खूप ओळखीचे चेहरे भेटतात...बने, बने, पटकन दिशा बदल बघू...आपण त्या गावचेच नाही, असा चेहरा कर. कारण समोरून साक्षात अमोल पालेकर येत आहेत. त्यांनी आपल्याला बघितले की आपण संपलोच. माणूस सज्जन आहे, पण टफ हं! ते पहा, त्यांनी एकाचं बखोट धरलंच. आता मेला तो माणूस! ‘‘आम्हा कलावंतांना विचारून, चर्चा करून हे थेटर का बांधलं नाहीत?’’ असा सूर त्यांनी लावला आहे. नाही, त्याला निषेधाचा सूर म्हणत नाहीत, तो त्यांचा ओरिजिनलच सूर आहे. वास्तविक नवं ‘बालगंधर्व’ बांधताना मुन्शिपाल्टीचे लोक डॉ. लागूंना विचारायला गेले होते म्हणे. पण ते म्हणाले, ‘मी आता रिटायर झालो!’ चालायचंच. बाकी नाट्यगृहं ही कलावंतांना विचारूनच बांधायला काढावीत, हा त्यांचा आग्रह मात्र अगदी बरोबर आहे. ह्या ठिकाणी कलावंतांचाच वावर अधिक असतो ना! काय म्हणालीस? कलावंतांपेक्षा प्रेक्षकांचा वावर महत्त्वाचा असतो? वेडी आहेस का तू? प्रेक्षकांचा इथं काय संबंध?
जाऊ दे. हे बघ, हे इथं काय लिहिलंय...
जुन्या थेटराच्या नव्या चार भिंती
वैरी न चिंती, ते पुणेचि चिंती
नव्या पुण्यनगरीत नवेचि सर्व
म्हणोनी उभारु नवे बालगंधर्व!
...असोच. आता पळ काढ...समोरून नव्या दमाचे प्रयोगवादी नाटककार अतुल पेठे येताहेत! बाप रे!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com