...साथ हाथ बढाना! (ढिंग टांग!)

ब्रिटिश नंदी
गुरुवार, 8 मार्च 2018

स्थळ : मातोश्री महाल, वांद्रे.
वेळ : व्यापक राष्ट्रीय कटाची. समीप येऊन ठेपलेली.
काळ : कट झालेला.
प्रसंग : निकराचा.
पात्रे : निकराला आलेली !

स्थळ : मातोश्री महाल, वांद्रे.
वेळ : व्यापक राष्ट्रीय कटाची. समीप येऊन ठेपलेली.
काळ : कट झालेला.
प्रसंग : निकराचा.
पात्रे : निकराला आलेली !

राजाधिराज उधोजीमहाराज खलबतखान्यात अस्वस्थ येरझारा घालत आहेत. येरझारा घालून दमतात, पण खलबते करण्यासाठी कोणीही येत नाही ! शेवटी कंटाळून आपल्या लाडक्‍या फर्जंदाला बोलावतात...अब आगे.
उधोजीराजे : (वैतागून) कोण आहे रे तिकडे?
फर्जंद : (घाईघाईने येत) मुजरा महाराज ! मीच हाय !!
उधोजीराजे : (चिंतित स्वरात) खलबते करण्यासाठी आम्ही अर्जंट मीटिंग बोलावली होती ! अजून कोणीच कसं आलं नाही?
फर्जंद : (दातात काडी घालत) कुनाला ठावं, कुटं कडमडल्यात त्ये?
उधोजीराजे : (कडाडत) खामोश !! आमच्या साथीदारांबद्दल भलतेसलते आम्ही ऐकून घेणार नाही !! झाला असेल विलंब काही कारणामुळे ! कुणाचे काही निरोप?
फर्जंद : (संशयानं) कुटलं साथीदार म्हंता? हितल्या सरकारातलं की भाईरचं?
उधोजीराजे : (रागारागाने) तुला काय करायचाय हा चोंबडेपणा? (उतावळेपणाने) कान इकडे कर, कुणाला सांगू नकोस, पण कमळाबाईचा गाडा थोपवण्यासाठी आम्ही साथीदारांची मोट बांधतो आहोत ! साथ देण्याची ही साथ देशभर पसरली की कमळाबाईचा गाडा पंक्‍चर झालाच म्हणून समज !!...म्हणून विचारतोय कुणाचा निरोपबिरोप?
फर्जंद : (कान खाजवत) कुनाचाच न्हाई ! कंप्लेंटीचे फोन आले चार-पाच ! तेवढंच !!...येक बंगाली बाई सारक्‍या फोन करित्यात ! म्हंने, सायबांशी आर्जंटमध्ये आर्जंट बोलायचं हाय !! साफसफाई टायमात केली नाही तर जगनं मुस्कील व्हईल, असं कायतरी बोलत व्हत्या !!
उधोजीराजे : (तुच्छतेने) त्यांना म्हणावं साहेब बाहेरगावी गेलेत !! भयंकर बिझी आहेत म्हणावं सध्या !! दौलतीची कामं वाढली आहेत, तुमची गटारं तुम्हीच साफ करून घ्या तूर्त !! (वैतागून) हे मुंबईकर म्हंजे धन्य आहेत ! दोन दिवस कचरापेटी उचलली नाही की मुंबईतल्या आमच्या आयाबहिणी आम्हालाच डायरेक्‍ट फोन करतात ! आम्ही इथं साथीदारांची मोट बांधण्याच्या बेतात आहो !!
ंफर्जंद : (रदबदली करत) त्यांनी तरी कोनाकडं जावं, म्हाराज? तुमीच आमचं तारनहार नव्हं का?
उधोजीराजे : (प्रयत्नपूर्वक संयम पाळत) ...पण आम्ही ह्या दौलतीचे कारभारी आहोत, सफाईवाले नव्हंत !! साफसफाईसाठी मुन्सिपाल्टीत फोन करावा माणसानं ! आम्हीही तेच करतो ना?
फर्जंद : (थंडपणाने) मी बी ह्येच बोललो त्यानला ! पन बाई जाम ऐकंनात !! त्या म्हनल्या, ""ओई, फॉर्जोंदमोशाय, भॉलो !! ऑतॉ लईच साफसफाई करावी लागनार आछी !! च्यालो, शाफशाफाय कॉरबे !! बोम्बायचा कोलकाता कोरबे !!
उधोजीसाहेब : (अस्वस्थपणे) कोलकाता? बाप रे !!
फर्जंद : (थंडपणानं)...आनखी येका अप्पासाहेबांचा असाच फोन आल्ता !!
उधोजीसाहेब : (कंटाळून) आता हे कोण अप्पासाहेब?
फर्जंद : (डोकं खाजवत) कोनतरी चंद्राप्पा हायेत ! लई घाईघाईत बोलत व्हते ! निम्मंशिम्मं तर मला कळलं बी न्हाई !! मी म्हनलं, सायेब, जरा आस्ते बोहोला ! मी मांडून ठिवतो तुमची कंप्लेंट ! सायेब आल्यावर बघतील काय ते !!
उधोजीसाहेब : (उत्सुकतेनं) मग?
फर्जंद : (कोड्यात पडल्यागत) लईच वाकड्यात गेले ते अप्पासायेब ! म्हनले, अब्बी तय्यारी नै किया, तो झन्नम जाना पडेंगा !! बॉम्बे का ऐद्राबाद करनेका, तो सातसात काम करनेको होता !!
उधोजीराजे : (हादरून जात) ऐद्राबाद? अरे वेड्या, मघाशी कोलकाता म्हणालास ना? आणि आता ऐद्राबाद? मेलो, साफ मेलो !!
फर्जंद : (दातातली काडी कानात...) आता काय जहालं?
उधोजीसाहेब : (कपाळावर हात मारत) सगळं मुसळ केरात ! अरे, आमच्या साथीदारांचेच फोन होते ते !! कमळाबाईचा गाडा पंक्‍चर होता होता, आमची साथीची साथच अशी आटोक्‍यात आली तर कसं होणार? जगदंब, जगदंब !

Web Title: editorial dhing tang british nandi article