धिक्‍कारमूर्ती! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
शनिवार, 10 मार्च 2018

भर माध्यान्हाच्या उन्हात
तप्त झाली होती रोमच्या
चौकातील काळीशार फरसबंदी,
इतस्तत: सांडला होता
उग्र, प्रज्वल, प्रच्छन्न संताप...
त्या भयाण झळांचा झोत अंगावर
घेत सम्राट कॉन्स्टण्टाइनने
उभवली तलवार आणि
रोखले टोक धारदारपणे
चौकाच्या मध्यभागी उभ्या
असलेल्या पुतळ्याकडे...

भर माध्यान्हाच्या उन्हात
तप्त झाली होती रोमच्या
चौकातील काळीशार फरसबंदी,
इतस्तत: सांडला होता
उग्र, प्रज्वल, प्रच्छन्न संताप...
त्या भयाण झळांचा झोत अंगावर
घेत सम्राट कॉन्स्टण्टाइनने
उभवली तलवार आणि
रोखले टोक धारदारपणे
चौकाच्या मध्यभागी उभ्या
असलेल्या पुतळ्याकडे...

गळ्याच्या शिरा ताणत ओरडला तो :
माझ्या प्राणप्रिय रोमनवासीयांनो,
खेचा हा अपशकुनी पुतळा
चौथऱ्यावरून ताबडतोब,
नष्ट करा त्याचा अणूरेणू.
हद्दपार करा तुमच्या-आमच्या
सामान्य जीवनमानातून.
नष्ट करा त्याच्या स्तुतिगाथा,
पोथ्या, पुराणे आणि नाणी वगैरे.
मिळू देत त्याची स्मरणे
...आणि त्याची विस्मरणेही!
कारण-
ह्याच नष्टनर्कं इसमाने
पेरले होते बीज कालविषाचे
ह्या रोमच्या पवित्र भूमीत...
जे उगवत राहिले आहे,
शतकानुशतके नवनव्या हंगामानिशी.
चालवा हातोडे, लावा दोरखंड
खेचा तो फत्तराचा दळभद्री ढिगारा.
चौथरा सलामत, तो पुतळे पचास...
सम्राट मॅग्झिमाइनचा धिक्‍कार असो!
‘‘डॅम्नाटियो मेमोराय! डॅम्नाटियो मेमोराय!
धिक्‍कार स्मृती! धिक्‍कार स्मृती!’’
चौकाच्या भवतालें जमलेल्या
जमावाने केला एकच हल्लाबोल

बघता बघता सम्राट मॅग्झिमाइनचा
प्राचीन पुतळा खेचला गेला
मागल्या मागे आणि
धुळीचा प्रचंड लोट उठवत
धराशायी झाला...
हातोडे चालवत थयथया
नाचत, चेकाळलेल्या
जमावाकडे विजयी मुद्रेने
पाहात राहिला विद्यमान सम्राट.

काहीशा दर्पोक्‍तीनेच स्वत:शीच
पुटपुटला तो : ‘‘इथून पुढे रोमच्या
वर्तमानातही मीच, भविष्यातही मीच,
आणि स्मरणांतही मीच..!’’
 
त्यावर शेजारीच उभा असलेल्या
वृद्ध क्‍लॉडियस किंचित हसून म्हणाला :
‘‘सारेच सम्राट अखेर मातीचेच असतात.
काही हाडामांसांनिशी मातीत जातात,
तर काही पुतळे बनून मातीत मिसळतात,
इतकेच...
...तुझं काय होणार कॉन्स्टंटाइन?’’

Web Title: editorial dhing tang british nandi article