चक्‍का जाम! (ढिंग टांग)

dhing tang
dhing tang

स्थळ : मातोश्री प्यालेस, वांद्रे.
वेळ : गुढीची तयारी !
प्रसंग : स्टुलावर चढण्याचा.
पात्रे : सकल सालंकृत सौभाग्यवती कमळाबाई आणि राजाधिराज उधोजी महाराज.
सौभाग्यवती कमळाबाईंची लगबग चालू आहे. दासदास्यांना इथे तिथे पिटाळून त्यांचा जीव दमून गेला आहे. तेवढ्यात उधोजीराजे प्रविष्ट होतात. अब आगे...
कमळाबाई : (स्वत:शीच पुटपुटत)...अरे, कुणी आहे की नाही तिकडे? एक मेली वस्तू धड सापडत नाही ह्या महालात! बघावं तेव्हा दुसरंच काही हाती लागतं! अशानं कसा चालवणार आम्ही कारभार? हाताशी विश्‍वासाची माणसं असली की किती बरं पडतं, मेलं!! छे, इथं काही राम उरला नाही...
उधोजीराजे : (बराच वेळ कौतुकानं ही लगबग पाहात असलेले) एक माणूस भलतंच गडबडीत दिसतंय जणू! हहह!! आम्ही आहोत नं मदतीला... आम्हाला सांगायचं ! हहह !!
कमळाबाई : (लाजून मुरकत) इश्‍श !! घरच्या धन्याला का घरगड्याची कामं सांगायची? शेवटी मालक तो मालक, चाकर तो चाकर!! तुम्ही कधी आलात, मेलं कळलंदेखील नाही!!
उधोजीराजे : (हात उडवत) आम्हाला येऊन संवत्सर उलटोन गेले!! मघापासून पाहातो आहो तुमची गडबड!
कमळाबाई : (डोळ्यात पाणी आणत) हाताशी विश्‍वासाची माणसं उरली नाहीत, की असंच एकाकी पडायला होतं!
उधोजीराजे : (हळुवारपणे) आम्ही आहोत नं... आम्ही आहोत! एकाकी कशाला पडाल?
कमळाबाई : (उसासा सोडत) तुमचा काय भरवसा? आज आहात, उद्या नाही!! बघावं तेव्हा तुमचं ‘हा चाललो सोडून, हा चाललो सोडून’ अशा धमक्‍या सुरू असतात! कंटाळा आलाय त्या दरडावण्या ऐकून!
उधोजीराजे : (चुळबुळत) काही गोष्टी नाही पटत आम्हाला! मग आमच्या रागाचा पारा चढतो!! अधिकउणं बोलणं होतं! मनास लावोन घेवो नका!!
कमळाबाई : (स्फुंदत) ज्याचं जळतं, त्याला कळतं !
उधोजीराजे : (दिलासा देत) धमक्‍या दिल्या, तरी गेलो का सोडून? नाही ना? मग झालं तर!!
कमळाबाई : (खिडकीशी उभ्या राहात) ते आंध्राचे चंद्राबाबू बघा... जातो जातो, म्हणताना खरंच गेले की निघून!
उधोजीराजे : (गंभीर होत) सुटले बिचारे!
कमळाबाई : (चमकून) काय म्हणालात?
उधोजीराजे : (सारवासारव करत) फुटले बिचारे म्हटलं मी!!
कमळाबाई : (नाक मुरडत) आम्हालाही जनता लौकरच ‘चल फूट’ म्हणणार आहे, असं म्हणालात तुम्ही!! खरं का?
उधोजीराजे : (सारवासारव करत) अहो, जोक केला आम्ही! आमचा विनोदी स्वभाव माहीत आहे ना तुम्हाला? आम्ही तुमच्या साथीला आहोत बरं ! काही काळजी करू नका!
कमळाबाई : (हळव्या सुरात) नाही ना सोडणार आमची साथ? प्रॉमिस?
उधोजीराजे : (घाईघाईने विषय बदलत) बरं ते जाऊ दे ! गडबड कसली चालू आहे तुमच्या महालात, ते सांगा आधी !! आम्ही करतो मदत !!
कमळाबाई : (खुशीत येत) अहो, गुढीपाडवा तोंडावर आला ना! त्याची गडबड राहातेच!! गुढी उभारायची, बत्तासे, गाठ्या, कडुनिंब... (चमकून) कडुनिंबावरून आठवण झाली! एक मोळीभर कडुनिंबाचा पाला आणून द्या ना आम्हाला! तुमच्याकडे खूप असेल !!
उधोजीराजे : (डोळे फिरवत) कळतात बरं आम्हालाही टोमणे !! आम्हाला शोभेलसं काम सांगा !!
कमळाबाई : (गोड गोड बोलत) पाडव्याला श्रीखंड करायचा बेत आहे! चक्‍का टांगायचा होता... याल ना?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com