धारावी नेचर पार्क! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
गुरुवार, 22 मार्च 2018

स्थळ : मातोश्री हाइट्‌स, वांद्रे बुद्रुक. वेळ : अर्ली गुड मॉर्निंग!
प्रसंग : निसर्गाच्या हाकेचा..! पात्रे : एक फुल, एक हाफ!

स्थळ : मातोश्री हाइट्‌स, वांद्रे बुद्रुक. वेळ : अर्ली गुड मॉर्निंग!
प्रसंग : निसर्गाच्या हाकेचा..! पात्रे : एक फुल, एक हाफ!

विक्रमादित्य : (दार ढकलत उत्साहात) गुड मॉर्निंग बॅब्स... उठलात ना? उठा !! जागे व्हा !!
उधोजीसाहेब : न्यम न्यम न्यम न्यम ! फ्रॉम...फ्रीक...फ्रुम..!
विक्रमादित्य : (गोंधळून) म्हंजे?
उधोजीसाहेब : (डोक्‍यावर पांघरूण घेतलेल्या अवस्थेतच) म्हंजे वाघाचे पंजे !! झोपू दे मला अजून ! ...काल रात्री जाम उशीर झालाय !!
विक्रमादित्य : (हाताची घडी घालत गंभीरपणे) ही झोपण्याची वेळ नव्हे, बॅब्स ! रात्र वैऱ्याची आहे !!
उधोजीसाहेब : (डोक्‍यावर पांघरूण ) रात्र संपली ना रे आता !
विक्रमादित्य : (हातातलं वर्तमानपत्र फडकवत आरोळी ठोकून) झोपता क्‍काय...जागे व्हा !!
उधोजीसाहेब : (दचकून उठत) काय झालं? काय झालं?
विक्रमादित्य : असेच झोपून राहिलात तर एक दिवस ह्या मुंबईत श्‍वाससुद्धा न घेता कायमचं झोपून राहावं लागेल ! झाडं वाचवा, झाडं वाचवा !!
उधोजीसाहेब : (संभ्रमात) हे काय आता नवीन काढलंस?
विक्रमादित्य : मी धारावीतल्या नेचर पार्कमध्ये चाललोय...येताय?
उधोजीसाहेब : (चक्रावून) धारावीत? आणि नेचर पार्क?
विक्रमादित्य : (एक बोट उभारून) आय ॲम हंड्रेड पर्सेंट करेक्‍ट, सर ! नेचर पार्कच...तेही धारावीतलं !!
उधोजीसाहेब : (मान हलवत) धारावी हे आशियातलं सर्वांत मोठं झोपडी पार्क आहे, हे ऐकून होतो ! तिथं नेचरचा संबंध कुठे येतो? तसा असता तर मी क्‍यामेरा घेऊन ताडोबाला जाण्याऐवजी धारावीला गेलो नसतो का? उद्या गिरगावात मोरांचं अभयारण्य आहे असं म्हणशील !!
विक्रमादित्य : (ठामपणे) आहेच ! धारावीत नेचर पार्क आहेच ! मी माझ्या डोळ्यांनी पाहून आलोय !
उधोजीसाहेब : (शंकेखोरपणानं) तुला काय ठाऊक?
विक्रमादित्य : (थंडपणानं) दर संडेला तिकडे आठवडी बाजार लागतो ! शिवाय एक लाफ्टर क्‍लबही आहे !!
उधोजीसाहेब : (एकदम आठवून) हां, हां ! अरे, ते माहीमचं वनस्पती उद्यान म्हणतोयस का तू? हॅ: !! तिथं औषधी वनस्पती आहेत असं कुणीतरी सांगितलं म्हणून मी एकदा गेलो होतो !! गवती चहा आणि तुळस सोडून कुठलंही औषध नाही तिथं !!
विक्रमादित्य : (त्वेषानं) जे काही असेल ते ! तिथलं एकही झाड मी कापू देणार नाही, सांगून ठेवतोय !! इथे आख्खं एक पार्क बिल्डरांच्या घशात चाल्लंय आणि आपण गप्प बसायचं? मुंबापुरीच्या गळ्यातील तन्मण्यासारखा चमचमणारा हा हिरवा तुकडा बघता बघता सिमेंट काँक्रीटच्या जंगलात गुदमरणार आहे !! मुंबईची फुफ्फुसं आक्रसली जात आहेत...
उधोजीसाहेब : (इंप्रेस होत) व्वा !! क्‍या बोल्या !!
विक्रमादित्य : (हट्टानं) कुठल्याही परिस्थितीत मला ते नेचर पार्क हवंच आहे, बॅब्स ! बिल्डरांच्या घशात अशी हिरवी रानं गेली तर एक दिवस-
उधोजीसाहेब : बरं बरं !!..नाही जाऊ देणार मी !! ओके? किचनमध्ये जाऊन माझा चहा टाकायला सांग ! म्हणावं, साहेब जागे झालेत !!
विक्रमादित्य : (खुशीत) ही तर ब्रेकिंग न्यूज आहे !!
उधोजीसाहेब : आम्ही जागे झालो आहोत ही ब्रेकिंग न्यूज?
विक्रमादित्य : नेचर पार्कला जाणार नाही ही ब्रेकिंग न्यूज !!
उधोजीसाहेब :हं...मग ठीक आहे ! पण मला एक सांग... तुला कशाला हवंय हे नेचर पार्क ! तुझ्या हट्टाखातर पेंग्विन आणून ठेवले जिजामाता उद्यानात... आता आणखी जंगल कशाला हवंय? तुझे हट्ट वाढत चाललेत हं !!
विक्रमादित्य : (स्वप्नाळूपणे) मला त्या नेचर पार्कमध्ये खरेखुरे वाघ सोडायचे आहेत !! मग मी तिथं पाटी लावणार... धारावी टायगर प्रोजेक्‍ट !! मस्त आहे ना आयडिया?

Web Title: editorial dhing tang british nandi article