चुकलेली गळाभेट! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
शुक्रवार, 30 मार्च 2018

नानासाहेब, जय महाराष्ट्र,

नानासाहेब, जय महाराष्ट्र,
सारे मार्ग खुंटले म्हणून पत्र लिहीत आहे. काल रोजी चैत्र शुद्ध द्वादशीच्या दिवशी सायंकाळी आम्ही आपल्या सदरेवर येऊन गेलो. उगीच आलो, असे केलेत ! दोन-अडीच तास वाट पाहून शेवटी निघून आलो. आपण (दर्शनाला) आला नाहीत ! ह्याची नोंद घेण्यात आली आहे, वेळ येताच परतफेड होईल, ह्याबद्दल खातरी बाळगावी. वास्तविक तुम्ही आमच्या भेटीसाठी ‘मातोश्री’वर येणे, हा परिपाठ. पण आम्ही (स्वत:शीच) म्हटले की कारभाऱ्यास प्रत्येक्ष कारभार करताना पाहणे, हे राजाचे कर्तव्यच होय. पण बघितले ते वेगळेच... कारभार सोडोन कारभारी दुसरीकडेच रमला होता, हे बघावे लागले. काळ मोठा कठीण आला ! राजालाच भेटण्यासाठी कारभाऱ्याकडे समय नसेल, तर तो प्रजेसाठी कोठोन वेळ आणणार? प्रजेला न्याय कोठोन देणार? प्रजेला असे वाऱ्यावर सोडोन दिलेत, तर एक दिवस प्रजा आपली वाऱ्यावर वरात काढल्याशिवाय राहणार नाही, हे वाक्‍य लिहून ठेवावे! (भविष्यात कामी येईल!!) असो.
आम्हास पुढील दरवाजातून येताना बघोन तुम्ही मागल्या दाराने पसार झाल्याचा आम्हाला संशय येतो आहे. पुढल्या वेळी आम्ही मागील दाराशीच उभे राहू !! कळावे. उधोजी.
ता.क. : बाजारात आंबे आले आहेत. आम्ही आणले होते... परत नेले ! आज तुमच्या नावाने आमरस खाऊ !! कळावे. उ. ठा.
* * *
प्रिय आदरणीय, सन्माननीय उधोजीसाहेब, साष्टांग प्रणिपात व मानाचा मुजरा, आपण येऊन तिष्ठून गेलात हे मागाहून कळले ! झाल्या प्रकाराबद्दल अत्यंत दिलगीर आहे. आपण मोठ्या मनाचे आहात, आमचे शंभर आप्राध आजवेरी पोटात घेतलेत, हा एकशेएकावा जड जाऊ नये !! (कोकम सोडा पाठवत आहे...) पण झाला प्रकार शतप्रतिशत गैरसमजुतीतून झाला, हे सत्य आहे. म्हंजे आम्ही वाट वेगळ्या ठिकाणी पाहिली, आपण दुसऱ्या ठिकाणी उभे राहिलात, असे झाले.
त्याचे झाले असे की वाघ भेटीस येतो आहे, असा संदेश दुपारीच आम्हाला प्राप्त झाला होता. कचेरीत बसलो असता श्रीयुत प्रसाद लाड नामे सद्‌गृहस्थांनी गुप्त संदेशाची चिठ्‌ठी हातात ठेवली. त्यात लिहिले होते :
येतोय वाघ, सज्ज ठेवा चहा
नाहीतर शंभर फटके पडतील पहा
पुष्पगुच्छ घेऊन फाटकात उभे रहा
चुकलात तर मग विसरा त्याची गुहा!
(सायंकाळी ठीक सहा वाजता.)
...चिठ्‌ठी मिळताक्षणी मी जय्यत तयारी केली. (काव्य भिक्‍कार होते, पण मजकूर कळला!) पुष्पगुच्छ, चहा सगळे रेडी ठेवले. बरोब्बर सहा वाजता गेटशी माणूस पाठवला. म्हटले, साहेब आले की लागलीच आत घेऊन या! ठरल्याप्रमाणे ठीक सहा वाजता गेटमधून मर्सिडिझ गाडी शिरली. सगळे गाडीशी धावले. आतून उतरले आमचे कोकणचे मित्र नारोबादादा राणे!! विजेच्या वेगाने सारे मागल्या मागे पळाले. खुद्द नारोबादादांना काय झाले हे समजेना! गेल्या काही वर्षांत त्यांना कोणी पुष्पगुच्छ दिलेला नाही. त्यामुळे त्यांनाही संकोचल्यासारखे झाले. आल्या आल्या त्यांनी विचारले : ‘माय**नी माका फुलां कित्यांक दिली?’ मागाहून सारा प्रकार कळेपर्यंत खूप उशीर झाला होता.
दक्षिण मुंबईपर्यंत प्रवास करून आपण परत गेलात, ह्याचे खूप वाईट वाटते आहे. पण काय करू? आपल्या भेटीचा योग नव्हता हेच खरे !! पुढल्या वेळी मी स्वत: ‘मातोश्री’वर सकाळी सहा वाजता येऊन सायंकाळपर्यंत तिष्ठत उभा राहीन. सहानंतरच प्रवेश करीन !! हीच माझी शिक्षा आणि हेच माझे प्रायश्‍चित्त !!  पुन्हा क्षमस्व. लोभ भयंकर आहेच, तो वृद्धिंगत व्हावा, हीच श्रींच्या चरणी प्रार्थना. बहुत काय लिहू? शब्दच संपले. आपला आज्ञाधारक. फडणवीसनाना.
ता. क. : आपण परत गेलात ते गेलात, आंब्याची पेटी ठेवून तरी जायची? असो. नाना.

Web Title: editorial dhing tang british nandi article