अग्निपरीक्षा! (ढिंग टांग)

dhing tang
dhing tang

‘‘हा  अन्याय आहे अन्याय!... सरकारच्या नालायकीची शिक्षा विद्यार्थ्यांनी का भोगायची अं?,’’ राजियांनी चवताळून सवाल केला. सारी बैठक स्तंभित झाली. बैठकीच्या खोलीत परीक्षा हॉलमध्ये पसरावा, तसा सन्नाटा पसरला. राजियांचे खरेच होते. वर्षभर मेहनत करून मुलांनी गणिते सोडवावीत आणि पेपरला बसल्यानंतर कळावे की पेपर फुटला आहे!! अशा वेळी काय करणार? फुटका पेपर गुंडाळून नवाकोरा लीकप्रूफ पेपर पुन्हा द्यावा, असा मोगलाईला शोभेलसा फतवा सरकारने जारी केला. ह्या परीक्षापद्धतीच्या गळक्‍या भेगा, चिरा बुजवण्यासाठी लांबी भरणारे समर्थ हात कोणाचे? असा सवाल समस्त पालकांच्या मनात उभा राहिला. उत्तर येकच होते- लांबी भरण्याइतके लांब हात फक्‍त राजियांचे! राजियांचे! राजियांचे!!
परिणामी, गणिताचा पेपर फुटला म्हणून काही मुले (हसत हसत) आणि त्यांची पालके (रडत रडत) राजेसाहेबांच्या भेटीला ‘कृष्णकुंज’गडावर आली होती.
‘‘तुम्ही... तुम्ही ह्या नाकर्त्या राज्यकर्त्यांना निवडोन दिलेत...आता भोगा फळे...’’ पालकांच्या दिशेने बोट रोखून राजे ओरडले. राजे भडकले की जाम भडकतात. पालकवर्गाने माना खाली घातल्या. राजियांचे खरे होते. चार वर्षांपूर्वी आपणच कौतुकाने मतदान करून आलो आणि हे सरकार ओढवून घेतले!! आता गणिताचे पेपर दोन-दोनदा सोडवणे नशिबी आले!!

‘‘आम्ही कानीकपाळी ओरडत होतो... अरे आमच्याकडे एकहाती सत्ता द्या... मग बघा, कसे प्रश्‍न सोडवितो, पण आमचे ऐकतो कोण? आता आली ना रडावयाची पाळी?’’ राजे बोल लावत होते. पालकवर्गाला हळूहळू घाम फुटत होता. विद्यार्थ्यांना मनातून बरे वाटत होते. ह्याच गणिताच्या पेपरासाठी ही पालक-मंडळी आम्हाला मारून मुटकून अभ्यासाला बसवत होती. आता खा बोलणी म्हणावे!!
‘‘पण आम्हाला वाटलं की...,’‘ एका पालकाने गुळमुळीत खुलासा करण्याचा दुबळा प्रयत्न केला.

‘‘खामोश... एकदम खामोश! अरे, गरीब मुले ती... उन्हाळ्याच्या सुटीचे बेत करावेत, त्या काळात त्यांना पुन्हा एकदा गणितं सोडवावी लागणार! का?, तर गणिताचा पेपर फुटला!! अरे आम्ही विचारतो की फुटलाच कसा? तो काय गडकरीसाहेबांच्या आश्‍वासनांसारखा फुगा आहे का?,’’ राजे भडकलेलेच होते.
‘‘काका, इतकी गणितं करून करून डोळे फुटले... क्‍लासमध्ये तेच, वर्गात तेच, घरीही तेच... पुन्हा तेवढीच गणितं करायची म्हटलं तर...तर...तर...काकाऽऽ...आम्हाला वाचवा...,’’ एका निरागस विद्यार्थ्याने ओठांची असहाय्य थर्थर करत टाहो फोडला. वातावरण तंग झाले. राजियांचा तर दिल हलून गेला. संबंधित निरागस विद्यार्थ्याच्या पालकाने विद्यार्थ्याचा गुडघा जोरात दाबून ‘घरी चल, मग बघतो तुला’ अशा आशयाचा मूक संदेश संक्रमित केला. ‘ओय’ असे विव्हळत निरासग विद्यार्थ्याने संदेश पोचल्याचे कळवले. इतक्‍यात...
ताड ताड पावले टाकत राजे निरागस विद्यार्थ्याच्या जवळ आले. दोन्ही खांदे गदागदा हलवून (खुलासा : विद्यार्थ्याचे) भावभऱ्या घोगऱ्या आवाजात म्हणाले : ‘‘क्‍काय?‘‘ काका म्हणालास मला? काका?’’
‘‘लोकांसाठी तुम्ही राजे असला तर तरी माझ्यासाठी तुम्ही काकाच आहा...काकाऽऽ..!!,’’ निरागस विद्यार्थ्याने राजियांच्या अंगरख्यालाच डोळे पुसत म्हटले. पोरगे पुढे नाकाशी अंगरखा नेणार, हे वळखून धोरणीपणाने राजियांनी दोन पावले माघार घेतली. पोरगे गणिताचा नाद सोडून नाटकांकडे वळले तर नाव काढील, असे त्याच्या पालकाच्या मनात डोकावून गेले.

‘‘कोणीही परीक्षा द्यायची नाही!! नाही म्हंजे नाही!! ठरलं म्हंजे ठरलं!! पुन्हा परीक्षा म्हंजे काय मोगलाई आहे? एकजुटीनं लढा द्या, आम्ही पाठीशी आहोत!!,’’ राजे निर्धारपूर्वक म्हणाले. मुले खुश...पालक खुश...‘राजांचा विजय असो!’ अशा घोषणा झाल्या. राजियांना ‘थॅंक्‍यू’ म्हणून सारे कृष्णकुंजगडावरून निघाले. ‘‘बाबा, रिझर्ल्ट घ्यायलासुद्धा इकडेच यावं लागणार आपल्याला?’’ ‘त्या’ निरागस विद्यार्थ्याने पालकाला रस्त्यात विचारले, तेव्हा काय बोलावे हे त्यास कळेना! ‘घरी चल, मग बघतो तुला’ एवढेच तो म्हणाला. इति.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com