काळविटांची चर-चा! (ढिंग टांग)

dhing tang
dhing tang

राजस्थानात कांकाणी गावाच्या उत्तरेला (किंवा दक्षिणेला) असेल, मोकळं माळरान होतं. तिथं काळवीट खानदान राहात होतं. सगळ्यांची आडनावं एकच होती-काळवीट. कालचीच गोष्ट. चरता चरता मेघानं मान वेळावून विचारलं, ‘‘सलमान आलाय म्हणे जोधपुरात!’’
‘‘माझीही मान अवघडलीच आहे सध्या... खाली वाकून पाला खायचा म्हटलं तरी कळ येते अशी...,’’ कृष्णराव काळवीट उगीचच बोलले. कृष्णरावांना हल्ली नीट ऐकू येत नाही. कृष्णराव सीनियर काळवीट आहेत. वीस वर्षांपूर्वी ती दुर्घटना घडली तेव्हा ते जातीने हजर होते.
‘‘कृष्णाकाका, आम्हाला सांगा ना ती स्टोरी...’’ पोरींनी म्हाताऱ्याला हरभऱ्याच्या झाडावर चढवलं. ‘‘धोनीचं काय आता?’’ कृष्णरावांचे कान म्हंजे अगदी अशक्‍य झाले आहेत.
‘‘स्टोरी स्टोरी! सलमानच्या केसची!!’’ मेघा कानाशी जाऊन ओरडली.
‘‘ओह...ती होय! त्यात काय सांगायचं? सलमाननं एका झाडाला कागद चिकटवला होता. त्यावर गोळी झाडून तो प्रॅक्‍टिस करत होता. त्यानं गोळी झाडायला आणि काळुराम काळवीट झाडाकडे जायला एक गाठ पडली. गोळी लागली, काळुराम गेला... स्टोरी काय त्यात?’’ कृष्णरावांनी वेगळीच स्टोरी लावल्यानं सगळे च्याट पडले.
‘‘खोटं बोलताय तुम्ही काका, सलमानला वाचवण्यासाठी तुम्ही खोटं बोलताय!,’’ घनश्‍याम काळवीट जोरात ओरडला. खरं तर त्याला काहीच म्हणायचं नव्हतं. पण काहीही म्हणायचं नसतानाही आपल्याला बोलता आलं पाहिजे, हा फेसबुकी संस्कार त्याच्यावरसुद्धा झाला आहे. सलमाननं काळवीट मारल्याचं प्रकरण गेली वीस वर्षे चालू आहे. ह्या जगात काळवीटांना न्याय मिळत नाही, ह्याची खंत घनश्‍यामला फार वाटते. तशी पोस्ट त्याने फेसबुकवर टाकली होती. त्याला एकशेसदतीस लाइक्‍स मिळाल्या.
‘‘टायगर जिंदा है...बघितलास का रे, श्‍याम?’’ मेघानं मान वेळावत विचारलं. त्यावर श्‍यामनं ‘हट’ अशी मान हलवली.
‘टायगर जिंदा है’मध्ये काय बॉडी दिसलीये ना त्याची!,’’ रजनी काळवीट म्हणाली. रजनी खरंच आधुनिक विचारांची आहे. म्हणजे तिला रजनी हे स्वत:चं जुनाट नाव आवडत नाही. आडनाव तर बिलकुल आवडत नाही. ‘काळवीट काय...छे! ओसो ऑडनॉव कुठं ओस्तो का?’ असं ती मघाशीच कोणालातरी सांगत होती. ‘मला रज्जो म्हणा’, असं ती सांगते. तिचं फेसबुक स्टेटस पण ‘कॉल मी रज्जो’ असंच आहे. तिला सलमान भारी आवडतो. त्यामुळे कृष्णरावांची थिअरी तिला पटते. ‘’कुणी म्हणतं सल्लूकडे खेळण्यातली बंदूक होती. त्यानं काळवीट काय मंत्रालयातला उंदीरसुद्धा मरत नाही. काळवीटानं मजबूत गवत खाल्लं. पोट फुगून गेला! बाकीचं काम रानकुत्र्यांनी केलं म्हणे!!’’ कृष्णराव सारवासारवीच्या सुरात म्हणाले. त्यांची ही थिअरीसुद्धा रज्जोला पटली.
‘‘जाऊ दे रे पोरांनो, किती चर्वितचर्वण करायचं? इतका काळ मध्ये गेलाय की वीट आलाय सगळ्याचा..,’’ कृष्णराव म्हणाले.
‘‘मी काय म्हंटे कधी आहे तो निकाल?’’ शिंगारेबाईंनी मध्येच शिंग घातले. त्या काळवीट असल्या तरी शेजारच्या रानात शिंगाऱ्यांकडे सांगून गेल्या होत्या. सध्या बाळंतपणाला परत आल्या आहेत.
‘‘निकाल लागला काकू! सलमान गिल्टी!! बाकी तब्बू, नीलम, सोनाली सगळ्या सुटल्या. त्यांच्याकडे बंदूकच नव्हती म्हणे!! जोक आहे जोक!,’’ घनश्‍यामनं बातमी दिली. तो आता कहर संतापला होता.
‘‘आणि तो सैफ अली खान? तो सैफ आहे ना?’’ शिंगारेबाईंनी विचारलं.
‘‘तोही सुटला!’’ दोन्ही शिंगं हवेत उडवत श्‍याम म्हणाला.
‘‘चला बरं झालं! सलमानचं एवढं काही नाही, तो सैफ अली सुटला ते बरं झालं!’’ शिंगारेबाईंनी सुटकेचा निःश्‍वास टाकत म्हटलं.
‘‘का, असं का?’’ मेघा ओरडली. ‘‘अगं, तैमूरला बघायला बाबा नको का त्याचा?’’ शिंगारेबाईंच्या वक्‍तव्यानंतर कोणीही काही बोललं नाही. सगळे कांकणी गावाच्या माळरानावर निमूट आणि निर्भयपणाने चरू लागले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com