महामुलाखत क्र. ३! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
गुरुवार, 12 एप्रिल 2018

सांप्रतकाळी महाराष्ट्रात महामुलाखतींचे महामूर महापीक आले असून, मुलाखतींच्या ह्या महासुगीत आम्हीही मागे राहून चालणार नव्हतेच. इजा पुण्यात जाहला, बिजा मुंबईत जाहला, तिजा आपण थेट दिल्लीतच उरकावा, ह्या इराद्याने आम्ही कंबरेचा पट्टा कसला. पूर्वीच्या काळी राजकारण्यांच्या मुलाखती पत्रकार घेत असत. हल्ली राजकारणीच एकमेकांच्या मुलाखती घेत सुटले असून, पत्रकारांच्या पोटावर हत्तीचा पाय येत आहे. पत्रकारांच्या ह्या अवहेलनेकडे कोणी लक्ष देणार आहे की नाही? सबब आम्ही तिजाची महामुलाखत घेण्याचे ठरवले. पहिल्या महामुलाखतीत थोरल्या साहेबांनी (पुण्यात) श्रीमान चुलतराज ह्यांची मुलाखत घेतली. दुसऱ्या महामुलाखतीत मा.

सांप्रतकाळी महाराष्ट्रात महामुलाखतींचे महामूर महापीक आले असून, मुलाखतींच्या ह्या महासुगीत आम्हीही मागे राहून चालणार नव्हतेच. इजा पुण्यात जाहला, बिजा मुंबईत जाहला, तिजा आपण थेट दिल्लीतच उरकावा, ह्या इराद्याने आम्ही कंबरेचा पट्टा कसला. पूर्वीच्या काळी राजकारण्यांच्या मुलाखती पत्रकार घेत असत. हल्ली राजकारणीच एकमेकांच्या मुलाखती घेत सुटले असून, पत्रकारांच्या पोटावर हत्तीचा पाय येत आहे. पत्रकारांच्या ह्या अवहेलनेकडे कोणी लक्ष देणार आहे की नाही? सबब आम्ही तिजाची महामुलाखत घेण्याचे ठरवले. पहिल्या महामुलाखतीत थोरल्या साहेबांनी (पुण्यात) श्रीमान चुलतराज ह्यांची मुलाखत घेतली. दुसऱ्या महामुलाखतीत मा. मु. फडणवीसनाना ह्यांनी संजयाजी राऊत ह्यांच्यासोबत (मुंबईत) सवालजबाब केले. तिसऱ्या महामुलाखतीसाठी कोणास बोलवावे? हा संभ्रम पडला. आमचे आधारस्तंभ उधोजीसाहेब ह्यांना सालाबाद म्यारेथॉन मुलाखतीची सवय आहे. त्यांनाच बोलवावे, असे आधी वाटले. परंतु ‘मी सध्या परदेशात असून युवराज विक्रमादित्य ह्यांची मुलाखत घ्यावी,’ असे त्यांनी सुचवले. युवराजांनी आम्हाला मुलाखतीसाठी व्यायामशाळेत येण्यास फर्मावले. व्यायामशाळेत जाणे आम्ही विविध कारणांमुळे टाळतो. त्या तपशिलात जाण्यात अर्थ नाही. सारांश इतकाच की आम्ही ती मुलाखत ‘नंतर बघू’ असे सांगून रद्द केली.

तिसरी मुलाखत ही महामुलाखतींचा शिरोमणी ठरली पाहिजे ह्या इराद्याने पेटलेले आम्ही अखेर साक्षात प्रधानसेवक श्रीश्री नमोजी ह्यांच्यासमोर जाऊन बसलो. त्या महामहामुलाखतीचा संक्षिप्त भाग येथे देत आहो. संपूर्ण मुलाखतीचा मसुदा आम्ही इस्पितळातून डिस्चार्ज मिळाल्यावर देऊ.
प्रश्‍न : सध्या काय चाल्लंय? आय मीन क्‍या चल रहा है?
नमोजी : (हाताचा पंजा उडवत) फोग चल रहा है!!
प्रश्‍न : हे काय उत्तर झालं?
नमोजी : आ कोई सवाल छे?
प्रश्‍न : आम्ही तुमची मुलाखत घेणार, असं कळल्यावर कसं वाटलं? नमोजी : कायच नाय वाटला ! हूं उपोषण मां बिझी छूं !!
प्रश्‍न : कोणाचं उपोषण?
नमोजी : आम्ही उद्या उपवास करणार हाय !
प्रश्‍न : चैत्री नवरात्र आटपलं ना?
नमोजी : (गंभीरपणाने) अपोझिशनवाळ्यांनी बध्दु सेशन बंद पाडला, एटले-
प्रश्‍न : त्यांचा काय संबंध? आम्ही मुलाखत घेतोय, त्याबद्दल बोला !!
नमोजी : (धोरणीपणाने) ढोकळा जोईए?
प्रश्‍न : नको ! मुलाखत घेताना खाणं बरं दिसतं नाही !..उचलू नका हो प्लेट लगेच !! खाऊ आम्ही !!
नमोजी : ठीकथी बैसो भाई!! असा पग उप्परथी घेऊन बैसते काय सोफामंदी? जुओ, मारा सफेद सोफानी उप्पर केटला भद्दा दाग आव्या छे !! जुओ, जुओ!!
प्रश्‍न : (गांगरून) अहो, ही सोफा सीट केवढी मोठी आहे ! ह्याच्यावर कसं बसणार आम्ही !!
नमोजी : तो पछी कुर्सी चेंज करो !!
प्रश्‍न : महामुलाखत घेताना अशाच सीटा लागतात !!
नमोजी : तमे हूं एक एडवाइज आपु छुं !! तमे पण उपवास करजो !!
प्रश्‍न : आम्ही कशाला उपाशी राहू? नमोजी : अपोझिशनचा निषेध करण्यासाठी !! त्यांनी सेशनमंदी एक मिनट काम नाय केला !!
प्रश्‍न : सगळ्या खासदारांचे पगार कापा ! इथे कामं करत नाहीत, तिथे महामुलाखती घेत नाहीतर उपोषणं करत बसतात !! (ही आमची खदखद हं !)
नमोजी : चोक्‍कस ! ढोकला खावो ने !
प्रश्‍न : आता शेवटचे दोन प्रश्‍न !!
नमोजी : पूछो !!
प्रश्‍न : अच्छे दिन कधी येणार? नोटाबंदीचं नेमकं काय झालं?
...इथून पुढचे काही आठवत नाही. इस्पितळातून डिस्चार्ज मिळेपर्यंत आठवेल कदाचित... मग बघू !! इति.

Web Title: editorial dhing tang british nandi article