नाणार जाणार की होणार? (ढिंग टांग)

dhing tang
dhing tang

सौ. कमळाबाई हीस-
बरे नाही केलेत, बाईसाहेब, बरे नाही केलेत ! खाणावळीच्या मालकाची पाठ वळली रे वळली की मुदपाकखान्यातील आचाऱ्याने जिलब्यांची एक चळत हलकेच घरच्या पिशवीत घालावी, तद्वत वागलात !! बापाची पाठ वळताच त्याच्याच खिश्‍यातील विडीचे बंडल उपसोन पोराने विडी पळवावी, तद्वत वागलात !! भल्या स्वभावाच्या साहेबाच्या टेबलावर कार्कुनाने आजारपणाच्या रजेचा अर्ज टाकोन आयपीएल म्याच बघायला जावे, तद्वत वागलात !! बाई, असे कां केलेत?
चार-सहा फोटो काढण्याच्या मिषाने आम्ही परदेशात आलो काय आणि तुम्ही तिथे नाणार प्रकल्पाचा कट तडीला नेलात काय... मराठी भाषेत ह्यालाच पाठीत खंजीर खुपसणे असे म्हणतात. वास्तविक आम्ही समक्ष भेटोन ‘प्रकल्पाची थेरं आमच्या कोकणप्रांती चालणार नाहीत’ असे आपणाला बजावले होते. ‘आपला विरोध असेल तर नाणार होणार नाही, कदापि होणार नाही,’ असा शब्द आपण बेलभंडार उचलोन दिला होता. तुमच्या शब्दावरी विसंबलो. ‘जो कमळाबाईवरी विसंबला, त्याचा कार्यभाग बुडाला’ हे आम्हास आंध्रनरेश चंद्राबाबू नायुडु ह्यांनी मध्यंतरी सांगितले होते, त्यांचा सल्ला आम्ही कानाआड केला, हेच चुकले !!
आपल्या संगे पंचवीस वर्षे सडली म्हणोन आम्ही रागेजून बोलिलो होतो. तेव्हा अश्रूपात करोन आपण आमची मनधरणी केलीत. आमचे मन द्रवले, हेच चुकले. पुन्हा एकवार नव्हे त्रिवार म्हणतो, की आमची पंचवीस वर्षे सडली ! सडली !! सडली !!!
सौदीतील अरबांशी तुम्ही सला काय निमित्त्यें केला?
...तुम्ही कितीही फंदफितुरी केलीत तरी नाणार प्रकल्पाची कुदळ आम्ही पडू देणार नाही, हे बरे समजोन असा !!
जय महाराष्ट्र. (हा अखेरचा..) कळावे. उधोजी.
* * *
प्रिय अहो,
जय महाराष्ट्र ! आपण रागेजून पाठवलेले पत्र मिळाले. वाचून वईट्ट वाटले ! इतकी काही डोक्‍यात राख घालायला नको ! कोकणात नाणार प्रकल्प येणार की जाणार, ह्यावर अजून कुणाचेच काही ठरलेले नाही. चार कागदांवर सह्या झाल्या की करार होतात का? त्यासाठी मने जुळावी लागतात. एकदा मने जुळली की कराराबिरारांच्या कागदांची गरज पडत नाही. उधारणार्थ, आपल्या पंचवीस वर्षांच्या काळात आपण किती कागदांवर सह्या केल्या? एकाही नाही !! परंतु सहीशिवाय सारे काही बैजवार झाले ना?
नाणारचे काय होईल ते होवो, आपण आपले संबंध चांगले ठेवले पाहिजेत. नाणारचे काय मेले एवढे? प्रकल्प आला काय नि गेला काय... तुम्हाला आवडत नसेल तर आपण नाणार आख्खे उचलून गुजराथेत नेऊन ठेऊ !!
सौदीवाल्यांशी सला काय निमित्यें केला? असे आपण विचारता ! आता ऐकाच... त्याचे असे झाले की आम्ही आपल्याला शब्द दिला की ‘नाणार जाणारच !’ तुम्ही प्रेमभराने आमचा गालगुच्चा घेऊन फोटो काढण्याच्या मोहिमेवर परदेशी रवाना झालात... आणि त्याचवेळी सात अरबांचा तांडा विमानतळावर उतरला. आम्हाला भेटून म्हणाले, ‘‘हबीबी !’’ आम्ही लाजून ‘इश्‍श’ म्हटले. ते गोंधळले. मग ‘आम्ही आरामको कंपनीची माणसे आहोत’, असे त्यांनी सांगितले. आरामको हे नाव आम्हाला भारी आवडले. आम्ही खरे तर ‘आराम करो’ असेच ऐकले होते. आराम करण्याच्या दृष्टीने कोकणासारखा प्रांत नाही. हो की नाही? त्या अरबांनी सात खजुराची पाकिटे आणि बदाम-जर्दाळूची प्रत्येकी तीन पाकिटे नजर केली. हल्ली आम्हाला डागतरांनी खजूर खायला सांगितला आहे. शरीरातील आयर्न कमी झाले आहे म्हणे ! म्हटले, फुकट्यात औषध मिळाले, कशाला सोडा?
अखेर त्यांना आम्ही ‘नाणार होणार’ असे सांगितले.
ज्याला पाहिजे ते द्यावे. तुम्हाला सांगितले ‘नाणार जाणार’. त्यांना सांगितले ‘नाणार होणार !’..ह्याला म्हंटात राजकारण ! कळले? बाकी भेटीअंती.
सदैव तुमचीच. कमळा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com