ब्लँक कॉल (ढिंग टांग)

dhing tang
dhing tang

बेटा : (उत्साहात एण्ट्री घेत) ढॅण टढॅऽऽण! मम्मा, आयॅम बॅक..!
मम्मामॅडम : (नेहमीच्या निरुत्साहात स्वागत करत) हं!
बेटा : (विजयी मुद्रेने) मम्मा, मी कुठे जाऊन आलो माहिताय?
मम्मामॅडम : (न बघताच) माझ्यासाठी तू कुठून आलायस हे महत्त्वाचं नसून कुठं चालला आहेस, हे ज्यास्त इंपॉर्टंट आहे बेटा!!
बेटा : (वकिली बाण्यानं) ओके...ऑब्जेक्‍शन सस्टेण्ड! मैं मेरा सवाल दूसरे तरीकेसे पूछता हूं...मी कुठे चाललो आहे ओळख?
मम्मामॅडम : परदेशात सुट्टीवर चाललोय, असं सोडून काहीही सांग!
बेटा : (नकारार्थी मान हलवत) मैं विदेश नही जा रहा हूं...मेरे गरीब किसान और मजदूरोंको वाऱ्यावर छोडत मी कुठेही जाणार नाही आता!! हा देश वाचवण्याची जबाबदारी माझ्या खांद्यावर आहे मम्मा!! (चुटकी वाजवत) काळजी करू नकोस! ह्या देशापुढचे सारे प्रश्‍न मी वर्षभरात सोडवून टाकणाराय! आहे काय नि नाही काय!! तुला काय वाटतं मम्मा?
मम्मामॅडम : (गंभीरपणाने तंद्रीत)...पार वाटोळं झालंय बघ!! कुणीतरी सावरायलाच हवंय आता! नाहीतर काही खरं नाही...
बेटा : (दिलासा देत) मैं हूं ना!! ह्या देशाची सारी मदार मी सांभाळीन! यू जस्ट डोण्ट वरी!!
मम्मामॅडम : मी देशाचा नाही, पक्षाचा विचार करतेय!!
बेटा : (आत्मविश्‍वासानं) पक्षात तर मी नवचैतन्य आणलंय!! आज मी अमेठीला गेलो होतो! केवढं जोरदार स्वागत झालं माझं!! मी म्हटलं, मला ओळखलं का? तर ते म्हणाले, हो तर...
मम्मामॅडम : कित्ती बोलायला लागलास रे!! जरा कमी बोलत जा!!
बेटा : (तळहातावर मूठ हापटत) ह्याला काय अर्थय? आधी मला तुम्ही लोक बोलू देत नव्हता, म्हणून मी परदेशात जाऊन बोलून यायचो! आता इथंच बोलतो, तरी तुम्हाला ते नकोय!!
मम्मामॅडम : (समजूत घालत) मला पंधरा मिनिटं द्या, तेवढ्या वेळात मी त्या नमोजींना पळून जायला लावेन, असं म्हणालास ना?
बेटा : (आश्‍चर्यानं) त्यात काय चुकीचं आहे? खरंच आहे की! मी बोलायला लागलो की ते मुळीच थांबणार नाहीत...लावतेस पैज? त्यांनी पुन्हा नोटाबंदी केली...बघितलंस ना?
मम्मामॅडम : एटीएममधली कॅश संपलीये म्हणे! नोटाबंदी नाही!!
बेटा : (युक्‍तिवाद केल्यागत) एकूण एकच ना!! वाघ म्हणा, वाघोबा म्हणा!! ही नोटाबंदीच आहे!!
मम्मामॅडम : (छद्मीपणाने) पण ते कुठे आता तोंड उघडतायत! आहे कुठे तोंड म्हणा!! हुं:!!
बेटा : (विजयी सुरात)...म्हणूनच! म्हणूनच मी इतकं बोलतो तरी ते अजिबात तोंड उघडत नाहीत!!
मम्मामॅडम : (सबुरीनं घेत) असं बोलू नये रे!! आपल्याला काय करायचंय? जो तो आपापल्या कर्मानं जातो आणि येतो!!
बेटा : (निषेधाच्या सुरात) बट व्हाय? का? क्‍यों?
मम्मामॅडम : लोक सीरिअसली घेत नाहीत अशानं...म्हणून!
बेटा : (काहीतरी आठवून) ते जाऊ दे...मी वेगळंच काही सांगायला आलो होतो!! मम्मा, मला एक सांग, तुला हल्ली ब्लॅंक कॉल्स येतात का? आय मीन, फोन करून कोणीही बोलतच नाही...असं!?
मम्मामॅडम : (प्रश्‍नार्थक) नाही बुवा! आधी यायचे, पण ते मनमोहन अंकल गप्पा मारायला करायचे!!
बेटा : परवा मी मनमोहन अंकलशी समोर बसून अघळपघळ गप्पा मारत होतो आणि तेव्हा मलाही असे सात ब्लॅंक कॉल आले!!
मम्मामॅडम : (काळजीनं) ही बाब सिक्‍युरिटीला सांगितली पाहिजे!!
बेटा : (निरागसपणे) काही गरज नाही...हल्ली असे कॉल्स नमोजी करतात, असं मला मनमोहन अंकलनं सांगितलं! हाहा!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com