नाणारचे आंबे! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
बुधवार, 25 एप्रिल 2018

आजची तिथी : विलंबी नाम संवत्सरे श्रीशके १९४० वैशाख शु. नवमी.
आजचा वार : क्‍याबिनेटवार !
आजचा सुविचार : नाही म्या खाणार । न खाऊ देणार ।
जिवाचे नाणार । करीन मी !!
.....................................

आजची तिथी : विलंबी नाम संवत्सरे श्रीशके १९४० वैशाख शु. नवमी.
आजचा वार : क्‍याबिनेटवार !
आजचा सुविचार : नाही म्या खाणार । न खाऊ देणार ।
जिवाचे नाणार । करीन मी !!
.....................................
नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे.) बहुतेक माणसे सकाळी उठून उशीखालचा मोबाइल काढून स्विच ऑन करतात. चार्जिंगला वगैरे लावतात. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला नेमके ह्याच्या उलट करावे लागते. आमचे परममित्र मा. उधोजीसाहेबांचे काल संध्याकाळी तीन मिस्ड कॉल दिसले, तेव्हाच मी फोन बंद करून टाकला. ते काय बोलणार, हे माहीत होते. फोन उचलला की पहिली दहा मिनिटे नुसत्या डरकाळ्या ऐकायच्या. कुणी सांगितलेय? फोन बंदच ठेवलेला बरा. नाणारचे प्रकरण जरा जडच जाणार, अशी चिन्हे दिसत आहेत.

आमचे मित्र (काहीही कारण नसताना) काल कोकणात जाऊन आले. मी त्यांना म्हटलेही होते, की ‘‘कशाला जाता? नाणारचं काहीही होणार नाही,’’ पण ‘जातोच’ असा हट्ट धरून बसले. घरी आंब्याची पेटी न्यायची असेल असे समजून मीदेखील फार विरोध केला नाही. पण तिथे नको ते घडले ! ‘नाणार होणार नाही’ एवढे सांगून ते थांबले नाहीत. नाणारची अधिसूचना रद्द केल्याची घोषणाही करून टाकली. मी लगोलग इथे ‘अधिसूचना रद्द करण्याची कुणाला पॉवरच नाही’, असे स्पष्ट केले. ह्यावरून रण माजणार असे दिसते.

...आज नेमका क्‍याबिनेटचा दिवस ! आमच्या मित्रपक्षाचे मंत्रीसहकारी भडकूनच येणार, असे वाटत होते. धीर करून निघालो. पीएला आधी अंदाज घ्यायला मंत्रालयात पुढे पाठवले. घाईघाईने परत येऊन ते सांगू लागले, ‘‘साहेब, एकनाथजी शिंदेजी, दिवाकरजी रावतेजी आणि सुभाषजी देसाईजी हे तिघेही तुमच्या क्‍याबिनच्या बाहेरच उभे आहेत, तुम्ही आल्याशिवाय मीटिंगला आत जायचे नाही, असं म्हणतात.’’ मनात म्हणालो, ‘‘वाघ म्हटले तरी खातो, वाघोबा म्हटले तरी तेच... मग थेट वाघ्याच म्हटलेले काय वाईट? चला, जाऊन पाहू या!’’
...लांबूनच बघितले, एकनाथजी गंभीरपणे दाढी खाजवत उभे होते. दिवाकरजी रावते ‘आपल्यालाही दाढी असती तर टाइमपास झाला असता’ अशा विचारात नुसतेच उभे होते आणि त्यांच्या शेजारी नाकाला रुमाल लावून सुभाषजी !! हे गृहस्थ कायम कोकणातली एष्टी बस ‘लागल्या’सारखा चेहरा करून उभे कां असतात? कुणास ठाऊक.
पुढे होऊन मी म्हणालो, ‘‘जय महाराष्ट्र ! अरे व्वा, आज इकडे कुठे?’’
कुणीच काही बोललो नाही. एकमेकांकडे बघून ‘तुम्ही बोला, तुम्ही बोला’ अशा खुणा तेवढ्या करत होते.
‘‘देसाईसाहेब, आमच्यासाठी आणली नाही आणली का आंब्याची पेटी?’’ मी खेळकरपणाने विचारले. महाराष्ट्रात काहीही उल्टेपाल्टे होवो, आपली क्‍याबिनेट मीटिंग खेळीमेळीतच व्हायला हवी, असा मी दंडकच घालून दिला आहे. ‘‘तुम्हीच घोळ घातलाय, तुम्हीच निस्तरा... बोला की त्यांच्याशी!’’ रावतेजी सुभाषजींना म्हणाले.
‘‘मी घोळ घातलेला नाही हो !... नाणारची अधिसूचना रद्द करू, एवढंच म्हणालो होतो मी ! रद्द केली असं नाही... रेकॉर्ड काढून बघा !’’ सुभाषजी कळवळून म्हणाले. ही अधिसूचना रद्द करण्याची आपल्याला पॉवरच नाही हे कळल्याने ते आधीच खचले होते. त्यात हे !!
‘‘आमचे साहेब जाम रागावलेत... नाणार प्रकल्पाची अधिसूचना रद्द होत नाही, तोवर आंबा खाणार नाही, अशी प्रतिज्ञा घेतली आहे त्यांनी !’’ आवंढा गिळत सुभाषजींनी त्यांचा प्रॉब्लेम सांगितला. अवाक झालो. ऐन सीझनमध्ये माणूस आंबा खाणे कसे काय सोडू शकतो? ऐकावे ते नवलच.
‘‘ठीक आहे... मीदेखील खाणार नाही!!’’ निर्धाराने मी म्हणालो, ‘‘मी आंबा खाणार नाही, खाऊ देणार नाही...’’
...मग क्‍याबिनेट मीटिंग सुरळीत झाली. इति.

Web Title: editorial dhing tang british nandi article