नाणार दिग्विजय ! (ढिंग टांग)

dhing tang
dhing tang

स्थळ : मातोश्री प्यालेस, वांद्रे संस्थान.
वेळ : सुवर्णाक्षरांनी कुठेतरी लिहून ठेवण्याची.
उधोजीराजे : (दमदारपणे) कोण आहे रे तिकडे?
मिलिंदोजी फर्जंद : महाराजांचा विजय असो !! काय आनू जी?
उधोजीराजे : फुलांच्या वर्षावामुळे आमचं मस्तक हाउसफुल झालंय ! ते काढायला काहीतरी घेऊन ये झटकन !!
मिलिंदोजी : कंगवा आनू की जळमटं काढायचा लांबडा झाडू?
उधोजीराजे : (उसळून) खामोश ! जीभ हासडीन पुन्हा असं काही बोललास तर !! अरे, कोकणातल्या लोकांनी प्रेमादरानं आमच्यावर फुलांचा वर्षाव केला ! गुलाल उधळला !! त्यांना जळमटं काढायच्या झाडूनं साफ करणार? छे, छे !!...कंगवाच घेऊन ये कसा !
मिलिंदोजी : (खिश्‍यातून कंगवा काढून देत) घ्या जी !! नाणार मोहीम फत्ते झाली म्हनायची का?
उधोजीराजे : (अभिमानाने) अलबत ! दुश्‍मनाला चारी मुंड्या चीत करोन आम्ही परतलो आहो !! नाणारची एक इंचही जमीन आम्ही धनदांडग्यांच्या घशात जाऊ दिली नाही ! एक गंडांतर आलं होतं, गेलं !! ही घटना सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्यासाठी इंतजाम करा ताबडतोब !!
मिलिंदोजी : (डोकं खाजवत) कशावर लिवनार पन?
उधोजीराजे : जा ! एक दौत, कागद आणि पॅड घेऊन ये!
मिलिंदोजी : (निरागसपणाने) निळी शाई आनू की काळी?
उधोजीराजे : (खवळून) सोनेरी शाई आण, सोनेरी !! लिही त्या कागदावर- नाणार नाणारच राहणार ! तेल कंपनी गेली तेल लावत !!
मिलिंदोजी : (गोंधळून) सुवर्नाक्षेरात कशानं लिवावं महाराज?
उधोजीराजे : (डोळा मारत) अरे, असं म्हणायची पद्धत असते ! साधी दौत-कागद घेऊन ये झालं !!
मिलिंदोजी : (कागद- दौत मांडत) सांगा, काय लिहू?
उधोजीराजे : (गर्वाने छाती फुगवत) लिहा- नाणार नाही घशात जाणार !  नाणार नाणारच राहणार ! नाही होणार तेलाचा घाणार !! (जीभ चावत) नकळत आम्ही काव्य करून गेलो की काय फर्जंदा?
मिलिंदोजी : तर तर..! अशी भारी कविता आजपोत्तर कुनीच केलेली नाही, महाराज ! अजून चार लाइनी सांगा, साइजमधी बसंल बरुब्बर !!
उधोजीराजे : छे, कविता बिविता नको आता ! आम्ही जाम थकलोय!
मिलिंदोजी : (शंका काढत) नाणार आता खरंच व्हणार नाही?
उधोजीराजे : (तलवारीने हवेत कोरल्यासारखे करत) काळ्या दगडावरची रेघ ! नाणारला आता फक्‍त माडबनं, सुपाऱ्या... बास्स !! नो तेल !! मी क्‍यान्सल केला तो प्रकल्प !!
मिलिंदोजी : (निरागसपणाने) पण आपल्याला हाय का पावर तेवढी?
उधोजीराजे : महाराष्ट्रात आम्हाला पॉवर नाही तर मग आहे कोणाला अं? आम्ही आमच्या अधिकारात नाणार प्रकल्प रद्द केला आहे ! म्हटलं, हवं तर घेऊन जा तुमचा तेलाचा घाणा विदर्भात नाहीतर गुजराथेत !! आमच्या कोकणात नको !!
मिलिंदोजी : पन आपलं ऐकलं पाहिजे ना कारभाऱ्यांनी ! हल्ली लई आडेबाजी चालवली आहे त्यांनी !!
उधोजीराजे : नाणार होणार नाही ! नाणार जाणार ! नाणार नाणारच राहणार ! तू हे लिहिणार की माझ्या तलवारीचं पाणी चाखणार? (पुन्हा जीभ चावत) पुन्हा काव्य झाले की काय? मिलिंदोजी : (दातात काडी घालून) पन काय तरी क्‍नफ्यूजन आहे महाराज ! नाणार नोटिफिकेशन क्‍यान्सल केलेलं नाही, असं सीएमसाहेबांनी सपष्ट सांगिटलं आहे !!
उधोजीराजे : अस्सं? मग ती दौत कपाटात ठेवून दे...
मिलिंदोजी : कागदाचं काय करू?
उधोजीराजे : (दातओठ खात) आण, आण तो कागद इकडे ! बघतोच त्याचं काय करायचं ते !! हर हर हर हर महादेव !!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com